Tuesday, November 22, 2011

'काहीतरी नविन' येतंय.... !


|| श्री ||

सप्रेम नमस्कार !

'काहीतरी नविन' या माझ्या सदरास आपण जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.
माझे हे लेख इमेल, फेसबुक यांच्या माध्यमातून अक्षरशः जगभर फिरले.
सर्वात जास्त प्रतिसाद मला तरुण मित्र-मैत्रिणींकडून मिळाला ही गोष्ट मला मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते.
कमी वाचणारे किंवा कधीही न वाचणारे या सदरामुळे मराठी 'वाचते' झाले असतील तर ही माझ्या लेखी समाधानाची बाब आहे.

माझ्या या लेखन वाटचालीत आता आणखी एक अभिमानास्पद पाऊल पडते आहे आणि त्यासाठी आपल्या शुभेच्छांची गरज आहे !

२७ नोव्हेंबर २०११ रोजी 'काहीतरी नविन' या माझ्या पुस्तकाचं 'राफ्टर पब्लिकेशन्स'तर्फे प्रकाशन होतंय !

पुस्तकाच्या माध्यमातून एकत्र केलेले माझे निवडक तीस लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
त्यास तुम्ही सर्वजण उत्तम प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

आणखी एक आनंदाची आणि गौरवाची बाब नोंदवावीशी वाटते.
आपल्या अंध मित्रांना 'काहीतरी नविन' वाचता यावे म्हणून संपूर्ण पुस्तकाचे 'ब्रेल' लिपीत रुपांतर केले जाणार आहे.
या कामात पुण्याच्या ‘निवांत' संस्थेचे आनंद बडवे-मीरा बडवे मदत करणार आहेत. ब्रेल लिपीतील पुस्तक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'राफ्टर पब्लिकेशन्स’ प्रयत्नशील असणार आहे.
या कार्यात तुमचाही सहभाग असेल तर दुधात साखर !

एका खाजगी समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन होईल.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे पुस्तक बाजारात विविध माध्यमातून उपलब्ध होईल.
हे पुस्तक फक्त भारतातच नाही तर परदेशातील वाचकांना वाचता यावं यासाठी देखील काही उपाययोजना असणार आहेत.
आपली प्रत राखून ठेवण्यासाठी तसेच पुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया इथे संपर्क साधावा:
rafterpublications@gmail.com
उमेश: 98205 27619 / रोहन: 98209 89320 / रोहन: 98200 80081

आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय.
लोभ आहेच, तो अधिक वृद्धिंगत व्हावा ही विनंती !

आपला
नविन

Wednesday, August 10, 2011

लवकरच..........

ध्यानीमनी नसताना कुठूनतरी एक गाणं कानावर पडतं आणि आपलं बोट धरून आपल्याला आठवणींच्या प्रदेशात घेऊन जातं.
अमुक गाणं ऐकल्याशिवाय आपण लहानपणी घास घेत नव्हतो असं आई सांगते...
तमुक गाण्याने आपल्याला प्रेम करायला शिकवलेलं असतं...
निराशेच्या काळात अमुक गाण्याने आपले डोळे पुसलेले असतात... तमुक गाण्यावर नाचता नाचता घामाबरोबर आपल्या विवंचनाही वाहून गेलेल्या असतात...
मनातल्या मनात लिंबू पिळून देखील तोंडाला पाणी सुटावं तसं एखादं गाणं ऐकताच मेंदूत आठवणींचा एक चित्रपट सुरु होतो.
आणि मग श्वास घ्यावा पण तो समजू नये इतक्या सहजपणे आपण ते गाणं अख्खा दिवस गुणगुणत राहतो.
आपण दिवसभर आनंदी का होतो हेही विसरायला लावणारं - साँग ऑफ द डे !

ही गाणी तुम्ही एका ठराविक काळात बांधू शकणार नाही. म्हणूनच ती गाणी 'अमर' असतात.
अशा 'अमर' झालेल्या गाण्यांचेही दोन प्रकार असतात.
'चोली की पीछे क्या है' सारखी गाणी लौकिकार्थाने 'अमर’ गाणी असतीलही. परंतु अशी गाणी अश्वत्थाम्याप्रमाणे
आपल्या कपाळावर जखम बाळगून मोक्षासाठी वणवण भटकत असतात. त्यांचं चिरंजीवित्व हे शापित असतं.
पण 'आयेगा आनेवाला' सारख्या गाण्यांचं चिरंजीवित्व हे 'हनुमाना'सारखं असतं.
त्यांना मोक्षाचा हव्यास नसतो. त्यांच्या जीवनाविषयीच्या श्रद्धेमध्येच त्यांचा मोक्ष असतो.

ज्या गाण्यांनी मला घडवलं आणि रडवलं...
ज्या गाण्यांनी मला हसवलं आणि फसवलं...
ज्या गाण्यांमध्ये मी स्वतःला हरवलं आणि मलाच पुन्हा पुन्हा मिळवलं...
अशा 'तृप्त चिरंजीव' गाण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेऊन येतो आहे -
माझी पुढील लेखमाला - साँग ऑफ द डे !


ही संगीत समीक्षा नाही. या गाण्यांनी मला जे दिलं ते मी फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे.
एखादं गाणं जसं अवचितपणे कानी येतं तशीच ही लेखमाला असणार आहे.
यातील एखादा लेख कधी तीन-चार दिवसांनी येईल तर कधी दहा-बारा दिवसांनी देखील.
या लेखांच्या 'अनियमित' असण्यातच खरी मजा आहे, हे तुम्हालाही हळूहळू पटेल !


http://navinsong.blogspot.com/

Thursday, July 28, 2011

सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे !

नमस्कार मंडळी,

आज कुठला लेख नाही कारण 'काहीतरी नविन' ही मालिका मागच्या गुरुवारीच संपली आहे.
आज थोडं मन मोकळं करणार आहे.

'काहीतरी नविन' या मालिकेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे तो निव्वळ शब्दातीत आहे.
या मालिकेत केवळ वीस लेख होते. या लेखांचे विषय, लेखाची भाषा, मांडणी आणि त्यांचा आकार यावर खूप विचार केला गेला होता.
आज जो-तो कशाना कशाच्या मागे धावतो आहे. कामधंदे सांभाळून घर सांभाळताना "वाचन -चिंतन" ही चैन वाटावी अशी आज परिस्थिती आहे.
म्हणून लेखाचे विषय रोजच्या जगण्याशी निगडीत राहतील याची काळजी घेतलीच, पण त्याचा आकारही इतकाच ठेवला की ते पाच ते सात मिनिटात वाचून होतील आणि 'आणखी काही हवं होतं' असं वाटत असतानाच ते संपतील !
प्रत्येक लेख वाचून हे जग बदलेल इतका भाबडा मी नक्कीच नाही परंतु लेख वाचून झाल्यावर वाचकाला काही वेळ 'फ्रेश' वाटावं इतकी साधी अपेक्षा आहे.
माझी ही अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असावी अशी आशा आहे.

हा लेख कुठल्याही वर्तमानपत्रात वा मासिकात छापून येत नसे. तरीही दर गुरुवारी एक नवा लेख लिहून मी तो काही लोकांना इमेलने पाठवत असे, फेसबुक वर टाकत असे आणि या ब्लॉगवर टाकत असे.
यातील नियमितपणामुळे वाचकांना या लेखांची सवय लागली होती.
मला शेकडो इमेल्स येत होते परंतु ब्लॉगवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांकडे माझं लक्षच नव्हते.
आज पाहतोय तर हा ब्लॉग ३६,००० (छत्तीस हजार) हून जास्त वेळा वाचला गेला (Page views) अशी माझ्याकडे याघडीला लेखी नोंद आहे. इतकंच नव्हे तर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. (या सर्व प्रतिक्रिया तुम्ही देखील वाचू शकाल.) कोणत्याही वर्तमानपत्राच्या वा मासिकाच्या पाठबळाशिवाय एखादे सदर वाचकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचू शकते याचा हा जर पुरावा असेल तर नव्या लेखकांसाठी हे एक उदाहरण ठरू शकेल. आजची पिढी मराठी वाचत नाही या आरोपाला हे सणसणीत उत्तर असू शकेल.

या फक्त तुमच्या प्रतिक्रियाच नाहीत तर समाजमन अजूनही संवेदनशील आणि जिवंत असल्याची ही खूण आहे असं मी मानतो.
प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणे शक्य नाही म्हणून आज या मनोगताद्वारे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. 'त्या पाच-सात मिनिटांत' माझ्या लेखांनी तुम्हाला काही आनंद दिला असेल तर माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे.

मी एका लेखन-विषयक प्रकल्पात व्यग्र आहे त्यामुळे यापुढे काही दिवस या ब्लॉगवर लेख नसतील.
माझ्या नव्या प्रकल्पाची घोषणा मी लवकरच करेन.
आपणास विनंती आहे की आपण navin.kale@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधलात तर यापुढे मला तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल. आपल्याशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे.

असाच लोभ राहो ही विनंती,

आपला
नविन

Thursday, July 21, 2011

'काहीतरी नविन' - २१ जुलै २०११

खूप दिवसांनी (म्हणजे दोन दिवसांनी!) इमेल्स बघत होतो. इनबॉक्समध्ये इमेल्सचा ढीग.
एका इमेलने लक्ष वेधून घेतलं. इमेलचा विषय होता - 'काहीतरी नविन'.
एका वाचकाने forwarded इमेल म्हणून माझा एक लेख मलाच पाठवला होता. लेखाच्या वर-खाली लेखकाचे नाव कुठेच नाही.
असा प्रसंग आधीही दोन-तीनदा घडला होता. त्यावेळी जे केलं होतं तेच आत्ताही पट्कन मनात आलं -
'Reply all' करून सांगून टाकावं का, या लेखाचा लेखक मीच आहे म्हणून ?
माझ्या आतल्या अहंकाराने माझा हात माउसशी नेला आणि मी 'reply all' लिंकवर जाऊन क्लिक केलं.
शब्द टाईप केले आणि पुन्हा डिलीट केले. पण आतल्या अहंकाराला भूक लागली होती. मी पुन्हा शब्द टाईप केले.
मनाची ही घालमेल चालू असतानाच एका मित्राचा मोबाईलवर फोन आला.
'अरे, एक तातडीची मदत हवी आहे.'
'बोल.'
'कुहू कुहू बोले कोयलिया' या गाण्याचा संगीतकार कोण आहे ?'
'आत्ता आठवत नाहीये. पटकन नाव आठवणार नाही असा कोणीतरी आहे.'
'जरा गुगल वर बघून सांग !'
'केबीसी मध्ये अमिताभच्या समोर बसलायस का तू ? थोड्या वेळाने फोन कर. मी बघून सांगतो.'
' जाऊ दे, तुझा मूड ठीक दिसत नाहीये. जाऊ दे, मरू दे तो संगीतकार ! मला हे गाणं खूप आवडतं म्हणून उत्सुकता होती बाकी काही नाही. नंतर फोन करतो.' मित्राने फोन ठेवला.
मरू दे तो संगीतकार ? मित्राचे शब्द पेटत्या बाणासारखे मनात आरपार घुसले.
ते गाणे जन्माला येण्यासाठी त्या संगीतकाराने केवढी मेहनत घेतली असेल ! स्वतःची तहान- भूक - झोप विसरला असेल, कदाचित त्या दरम्यान बायको-मुलांकडे दुर्लक्ष देखील झालं असेल.
त्याचं या निर्मितीत काहीच योगदान नाही ? तो आज कोणाच्याच लक्षात नाही ?
मनाला चटका बसल्यासारखं झालं आणि त्याच वेळी आत उसळी मारणाऱ्या अहंकाराला एक चपराक देखील बसली.
'कुहू कुहू बोले कोयलिया' ची ही अवस्था तर 'काहीतरी नविन' बद्दल विचार न केलेलाच चांगला.
कलाकारापेक्षा 'कलाकृती' मोठी हे अगदी मान्य !
म्हणजे माणसाच्या सर्जनशीलतेला, मेहनतीला, कलाकृती उत्तम करण्याच्या ध्यासाला काहीच किंमत नाही?
याची अर्थातच दोन परस्परविरोधी उत्तरे असतील. परंतु माझ्या आजतागायतच्या अनुभवाने जे उत्तर दिलं त्याने माझ्या आत उसळी मारणाऱ्या अहंकाराला नक्कीच एक चपराक बसली.
कलाकाराची सर्जनशीलता, त्याची मेहनत, त्याचा ध्यास हे सगळं मान्य ! पण एखादी कलाकृती घडण्यासाठी तो कलाकार केवळ एक instrument म्हणून वापरला जात असतो.
हा दुर्मिळ अनुभव आलेले कलाकाराच ही गोष्ट समजू शकतात.

मुळात एखादी गोष्ट ‘सुचते’ याला कुठलंच logical explanation नसतं. ए.आर. रेहमान झोपलेला असताना त्याला ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ या सुफी रचनेची चाल सुचते. रेहमान स्वप्नातून जागा झाल्यासारखा पियानोवर बसतो आणि ते गाणं पूर्ण करतो. याचा अर्थ इतकाच असतो की ती कलाकृती घडण्याची जबाबदारी रेहमानवर टाकण्यात आलेली असते. यशाच्या शिखरावर असलेला रेहमानसारखा प्रतिभावंत कलाकार देखील हे खुल्या मनाने मान्य करतो याचं कारण अशा माणसांचा त्यांच्या कलेच्या रियाझाबरोबर ‘जगण्याचा’ रियाझ देखील तितक्याच प्रामाणिकपणे चालू असतो. आणि म्हणूनच अशा अलौकिक अनुभवांचे अत्तरथेंब त्यांच्या हृदयात झिरपतील इतकी त्यांच्या आत्म्याची मशागत सतत चालू असते. खरं तर माणूस सोडून सगळेच जीव एक ‘अ-नाम’ आयुष्य जगत असतात. आपल्या सुवासाने झिंग आणणाऱ्या रातराणीच्या फुलांवर कधी तुम्ही नाव लिहिलेलं पाहिलंय ? ओंजळीत साठवलेल्या झऱ्याच्या पाण्यावर त्या पाण्याचं नाव तरंगताना कधी पाहिलंय ? खिडकीतून भिंतीवर पडलेल्या कवडश्यावर तुम्ही कधी नेम-प्लेट लटकलेली पाहिल्येत? हे अशक्य आहे कारण खरा आनंद देणाऱ्या (सुख नव्हे) सर्व गोष्टी, व्यक्ती एका self-less व्यवस्थेचा भाग बनून आपलं काम निमुटपणे करत असतात. कदाचित म्हणूनच, संगीतातील सात सूर ज्यांनी शोधले त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात. आपल्या बोली भाषांचे जनक, अजंठा वेरूळ सारख्या कलाकृती घडवणारे जादुगार, निरनिराळे खाण्याचे पदार्थ शोधून काढणारे अवलीये आपल्यासाठी ‘अज्ञातच’ राहतात. आपल्याला हे सगळं पचवणं जड जातं कारण आपण अशा एका जगात राहतो की जिथे स्वतःचं नाव सतत झळकण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या ‘जागा’ इंचात आणि ‘वेळा’ सेकंदात विकत घेतल्या जात आहेत. आपण अशा एका जगात राहतो जिथे घरातून बाहेर पडताच आपल्याला ‘स्वतःचीच पाठ थोपटून घेणारी’ राजकारणी मंडळीची ओंगळवाणी पोस्टर्स बघावी लागतात. माणसं गड किल्ल्यावर जाऊन आपली स्वतःची नावे कोरून येतात यावर आमची मित्रांची चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, कुठल्यातरी गडावर म्हणे एक पाटी लावली आहे – ‘कृपया आपली नावे गडाच्या भिंतीवर लिहू नका. शिवाजी महाराजांनी इतके गड किल्ले जिंकले-बांधले पण कुठल्याच गड-किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही लिहिलं !’ मला हे नुसतं ऐकूनच गहिवरून आलं. आपल्या कामात आपला ‘स्व’ इतका विरघळवून टाकायचा की ते काम आणि त्या कामातून मिळणारे फळ वेगळे राहूच नयेत – काम हेच त्या कामाचे फळ. हाच कर्मयोग ! सकाळी जागं झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत - म्हणजे टूथब्रशपासून टूथपिकपर्यंत - असंख्य वस्तू आपण वापरतो ! कोण कुठले अज्ञात हात माझ्यासाठी राबतात आणि माझ्या आयुष्यात आनंद, आराम आणि समृद्धी आणतात ! पण मीही कुठेतरी-काहीतरी काम करतो. याचा अर्थ माझ्या हाताने बनवलेल्या वस्तू किंवा मी देत असलेल्या सेवा हजारो अज्ञात व्यक्तींच्या आयुष्यात आनंद, आराम आणि समृद्धी आणत असतील ! एकदा ही मेख लक्षात आली की सगळ्या गोष्टींकडे बघायचा दृष्टीकोनच बदलून जातो. मग घरातला साधा केर काढण्यापासून ते देशासाठी उपग्रह बनविण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ‘कलाकृती’ समजून घडवल्या जातात आणि त्या कलाकृतीला घडविणारा कलाकार स्वतःच्या अस्तित्वाची एकही निशाणी मागे न सोडता त्या कलाकृतीमध्ये विरघळून जातो. गुलजार साहेब म्हणतात त्याप्रमाणे -
‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा,
मेरी आवाजही पेहचान है – (अ)गर याद रहे !’
एका कलाकृतीचा जन्म होईल. काळाच्या ओघात कधी कुणाला आठवण आलीच तर त्या कलाकृतीचा निर्माता लुप्त झाला असेल – पण ती कलाकृती जिवंत असेल.
कारण कलाकृती हीच त्या कलाकाराची खरी ओळख असेल !

‘तो लेख माझा आहे’ हे शब्द मी अर्धवट लिहून सोडलेल्या इमेलमधून कायमचे पुसून टाकले आहेत.
मी लिहितो तेव्हा ते शब्द 'माझे' नसतात, I am a mere 'trustee' of those words !
कोणी हे मान्य करेल वा न करेल.
पण मला विचाराल, तर हेच अंतिम सत्य आहे !

Thursday, July 14, 2011

काहीतरी नविन ! - १४ जुलै २०११

I remind myself every morning: Nothing I say this day will teach me anything.
So if I'm going to learn, I must do it by listening.
- Larry King



रामभाऊ आमच्या सोसायटीत राहतात.
आमच्या सोसायटीत काही कमी म्हातारी माणसं नाहीत. पण रामभाऊ त्या लोकांमध्ये जास्त रमत नाहीत. बघावं तेव्हा रामभाऊ तरुण पोरांच्या घोळक्यात. त्यातल्या त्यात, माझं आणि त्यांचं जरा बरं जमतं.
वय वर्ष बहात्तर. वयोपरत्वे केसांची सुतरफेणी झालेली पण मन पिस्ता बर्फीसारखं - हिरवंगार !

परवा रामभाऊ गेटवर उभे असलेले दिसले. त्यांना लांबून हात केला आणि त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो.
'काय म्हणताय रामभाऊ ?'
'.............' रामभाऊंनी मुक्यानेच हात मिळवला, हसले आणि डोळे मिटून घेतले.
'झाला का फुटबॉल खेळून? आज कोण जिंकलं?' रामभाऊंना बोलतं करायचं म्हणून मी काहीतरी विचारलं.
रामभाऊ गप्पच.
रामभाऊंना काय झालंय समजेना. 'उद्या भेटू' म्हणत मी तिथून पळ काढला.

काल रामभाऊ पुन्हा भेटले ते सोसायटीतल्या शाळकरी मुलांच्या घोळक्यात. पोरांना भोवरा फिरवण्याचे प्रशिक्षण देणे चालू होते. मी आल्याचं रामभाऊंना समजलं असावं. मुलांना भोवरा फिरवायचा एक 'गृहपाठ' देऊन रामभाऊ माझ्यासमोर उभे राहिले.
'आलात खर्डेघाशी करून ?' चुना आणि तंबाखू मळून-मळून ब्राऊन झालेला हाताचा पंजा टाळीसाठी पुढे करत रामभाऊंनी विचारलं.
'रामभाऊ, गरीबाच्या जखमेवर मीठ चोळू नका.' मी टाळी न देत म्हटलं. रामभाऊ एकटेच मोठ्यांदा हसले.
'ते जाऊ दे ! काल काय झालेलं तुम्हाला ?' मी विषयाला थेट हात घालत म्हटलं.
'अरे काल माझा उपास होता.' काहीतरी आठवल्यासारखं करत रामभाऊ म्हणाले.
'तुमचा मंगळवारी उपास असतो ते माहित आहे मला. पण त्या उपासाचा आणि तुमच्या न बोलण्याचा काय संबंध ?'
'सांगतो. मी दर मंगळवारी 'बोलण्याचा' उपास करतो.' रामभाऊ म्हणाले.
'काय सांगताय रामभाऊ ! आणि अगदीच बोलायची वेळ आली तर ?'
'बोलण्यावाचून गत्यंतर नाही अशी वेळ आली तरच बोलतो.'
'म्हणजे तेवढ्यापुरता उपास मोडता.' मी रामभाऊंना पेचात घेत म्हटलं.
'नाही. माझ्या उपासातली ती 'साबुदाण्याची खिचडी' आहे असं मानतो.’ रामभाऊ माझ्याकडे शांतपणे बघत म्हणाले.
‘रामभाऊ, हे सगळं कशासाठी ?’
'तुला ती गणपतीच्या देवळातली गोष्ट सांगितली का ? सांगतो. गेली साठ वर्ष दर मंगळवारी उपास करतोय. मंगळवारी मी गणपतीच्या देवळांत गेलो नाही तर उद्याचा बुधवार पाहू शकणार नाही, इतकी नियमितता.
दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. गणपतीसमोर मांडी घालून बसलो होतो. गणपतीच्या मूर्तीचं निरीक्षण करत होतो. काय विचार असेल या गणपतीच्या प्रतीकामागे? आणि अचानक नजरेत भरले गणपतीचे सुपाएवढे कान! गणपती म्हणजे ‘गणांचा पती’. आताच्या भाषेत 'लीडर' ! लीडरने ‘बोलण्या’हून अधिक 'ऐकायचं' असतं हेच सुचवायचं असेल का यातून ?
मनात हजार विचार. मग लक्षात आलं की मनात येणारे विचार मी कुठेतरी 'ऐकतो' आहे. हे इतकी वर्ष सुचलं कसं नाही?
मग सकाळी उठून 'आवाज ऐकत’ बसायचा छंदच जडला.
भिंतीवरून टिक-टिक ऐकू आली. पाहिलं तर घड्याळाचा आवाज! शेजारच्या घरातून कुकरची शिट्टी ऐकू आली. लांबवर कुठूनतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. कुणाच्या तरी घरात गजर झाला. कुणाच्या घरात बादली पाण्याने भरत होती. एखादा आंघोळ करता करता रफी-किशोर झाला होता !
तेव्हा लक्षात आलं की आपल्या सभोवतालचे आवाज मी 'ऐकत' नव्हतो. न 'चावता गिळत' होतो. तर अशी ही गंमत !'

'म्हणजे दर मंगळवारी आता 'दूरदर्शन' ऐवजी 'आकाशवाणी' का ?' मी मस्करीच्या स्वरात विचारलं.
'नाही. दर मंगळवारी मी फक्त 'माणसं' ऐकतो. आपल्या भोवतालची माणसं बोलण्यासाठी किती आसुसलेली आहेत ! Everyone has story to tell ! भाजीवाले, रिक्षावाले, पोस्टमन, इस्त्रीवाले, बस कंडक्टर, पोलीस वगैरेंशी एकदा कधीतरी कामाव्यतिरिक्त बोलून बघ. सोडावॉंटरचं झाकण ओपनरने उघडावं तशी ही माणसं फसफसून बोलायला लागतील की नाही ते बघ. त्यांच्या रोजच्या समस्या नुसत्या ऐकल्यास तरी तू थकशील, पण ते तसेच बोलत राहतील. एक सांगू ? त्यांच्या समस्या तू सोडवणार नाहीस हे त्यांनाही माहित असतं. त्यांची तशी अपेक्षाच नसते मुळी. त्यांचं एकच अपेक्षा असते - आम्हाला ऐका !’

बराच वेळ आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. शांतता ऐकण्यात हरवून गेलेल्या रामभाऊंच्या पाठीवर हलकेच थोपटून मी घराच्या दिशेने चालू लागलो.

न्यूज चैनल्स, नेते, टीव्हीवरील परीक्षक, धर्मगुरू, ज्योतिषी, तुम्ही, मी.... जो तो बोलतोय !
मग ऐकतंय कोण ?
चेकौव्ह्ची 'द ग्रीफ' नावाची एक अप्रतिम लघुकथा आहे.
या कथेचा नायक एक गरीब टांगेवाला आहे. ज्या दिवशी कथा घडते त्याच्या आदल्या दिवशीच टांगेवाल्याचा तरुण मुलगा मरण पावला आहे. परंतु पोटात लागलेल्या भुकेमुळे टांगेवाल्याला दुःख करत बसायला वेळ नाही. टांगा घेऊन तो कडाक्याच्या थंडीत धंदा करायला बाहेर पडला आहे. त्या दिवशी टांग्यात बसणाऱ्या प्रत्येकाला टांगेवाला त्याच्या मुलाच्या मृत्यूबद्दल काही सांगू पाहतो. पण त्या टांग्यात बसणारे प्रवासी त्याला काही बोलू देतील तर ना !
प्रत्येक प्रवासी स्वतःचं वैयक्तिक दुःख पुढे रेटून टांगेवाल्याला काही बोलूच देत नाहीत. कथेच्या शेवटी -
टांगेवाला जड मनाने आपल्या घरी परतला आहे आणि आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूची कहाणी आपल्या घोड्याला सांगत बसला आहे !

आजची सद्यस्थिती पाहता, लोकांचे एकमेकांशी असलेले तुटक संबंध पाहता, वो दिन दूर नही की नाक्यानाक्यांवर माणसांना फक्त 'ऐकून घेणारी' आणि मिनिटांचे पैसे आकारणारी 'लिसनिंग स्टोअर्स' उघडावी लागणार आहेत.
...आपण ती वेळ नको आणूया.
सोडावॉंटरच्या बाटलीप्रमाणे ती 'फसफस' मनात दाबून कितीतरी जण आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. त्या बाटलीचं झाकण उघडायला आपण त्यांना फक्त मदत करायची आहे, इतकंच. आपण त्यांना ऐकू लागलो की आपल्यालाच लक्षात येईल की इतके दिवस त्यांना कुणी ऐकून घेतलं नाही हीच त्यांची खरी समस्या होती !

असं नाही झालं तर रामभाऊंना उपासासाठी आठवड्याचा एक मंगळवार देखील कमी पडणार आहे.
रामभाऊंचं आता वय झालंय. त्यांच्यावरचा ताण आपण जमेल तसा कमी करूया.
एवढं तरी 'ऐकाल' ना माझं ?

Thursday, July 7, 2011

काहीतरी नविन ! - ७ जुलै २०११

I cried because I had no shoes until I saw a man who had no feet.
- Unknown


बीईएसटीच्या बसमध्ये गर्दीत उभा होतो. ऑफिस मधून घरी चाललो होतो.
पावसामुळे रस्त्यावरच्या ट्राफिकचा चोथा झालेला.
गाड्यांच्या मागून बाहेर पडणारे वायू अश्रुधुराचं काम करत होते.
आपण का राहतोय या शहरात ?
सो कॉल्ड 'यशस्वी' होण्यासाठी जर हा विषारी धूर खाऊनच मरायचं असेल तर कशाला हा सगळा आटापिटा?
मग हे सगळं सोडून गावाला जायचं? पण गावाला जाऊन नक्की करायचं? शेती करायची?
आपण नक्की जगतोय कशासाठी ? कोणासाठी ?......
डोक्यात विचारांचा ट्राफिक जाम !
‘काहीतरी वाचुया तरी’ म्हणून खांद्यावरच्या बॅगमध्ये कसाबसा हात घालून एक पुस्तक बाहेर काढलं.
पुस्तक चाळता चाळता एका पानावर नजर थबकली.
आत्महत्या करण्यासाठी एक माणूस कड्यावरून खाली उडी मारणार तेवढ्यात एक साधू त्याला अडवतो.
साधू म्हणतो, 'आयुष्याला इतका वैतागला आहेस तर एक काम कर. माझ्याबरोबर इथल्या राजाकडे चल. तो आपल्या दोघांना 'मालामाल' करेल.'
दोघेजण राजासमोर उभे राहतात. साधू राजाला सगळी हकीगत सांगतो.
राजा त्या माणसाला म्हणतो, ' तू तुझे डोळे काढून दे, मी तुला पन्नास हजार रुपये देईन. तुझे दोन हात तोडून दे, मी तुला पंचवीस हजार रुपये देईन. पाय, मूत्रपिंड, हृदय, आतडी, किडनी, जठर या सगळ्याचे मिळून एक लाख रुपये !
माणूस चिडून म्हणतो, 'माझ्या अमुल्य अवयवांची किंमत करताना तुम्हाला लाज नाही वाटत ? मी माझा एकही अवयव विकणार नाही.'
राजा हसून म्हणतो, 'इतक्या 'अमुल्य' गोष्टी जवळ आहेत हे माहित असून तुला तुझ्या आयुष्याचा कंटाळा आला?'
माणसाला त्याची चूक समजते आणि तो रडू लागतो.
साधू म्हणतो, 'तू कुठल्या कारणासाठी आत्महत्या करणार होतास ते मला माहित नाही. पण तुझ्याजवळ ज्या अमुल्य गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर करून एक नवं आयुष्य सुरु कर.'
ही कथा संपल्यावर पुस्तकात ओळी होत्या -

When wealth is lost, something is lost.
When health is lost, everything is lost.
When everything is lost….. Future still remains !

क्षणभर वाटलं की माझ्या आजूबाजूचं सगळं जग थांबलंय. मनातला कोलाहल शांत शांत होत गेला.
कान बंद झाले. शून्यात नजर गेली. कितीतरी वेळ मी तसाच लोंबकळत उभा राहिलो.
मला वाटतं 'साक्षात्काराचा क्षण' याहून वेगळा नसेल !
यापूर्वीही असे 'साक्षात्कारी क्षण' येऊन गेले, पण आजच्यासारखं त्यांना चिमटीत पकडू शकलो नव्हतो !
सायकल शिकताना एकशे चौतीसवेळा पडून जेव्हा पहिल्यांदा 'बॅलंस' साधता आला तो 'साक्षात्कार' नव्हता ?
पोहता पोहता पाण्यावर पहिल्यांदा तरंगलो तो 'साक्षात्कार' नव्हता ?
ओठांनी शिट्टी वाजवता-वाजवता जेव्हा पहिली 'फ्लॉव-लेस' शिट्टी वाजली तो 'साक्षात्कार' नव्हता?

मनात उसळलेला विचारांचा पूर शांत झाला होता. आता विचारांचे तरंग उमटू लागले.



आपण झोपतो म्हणजे तसं पाहिलं तर काही काळासाठी 'मरतोच'. सकाळी जिवंत झाल्यासारखे जागे होतो.
घड्याळाचा गजर जरी उठवत असला तरी मुळात 'जागे होऊ शकतो' म्हणून उठतो.
आज सकाळी मी जागा झालो. याबद्दल 'त्याचे' आभार !

तालिबान राजवटीत जन्माला आलो नाही आणि जिथे जन्माला आलो तिथे तालिबान राजवट नाही.
याबद्दल 'त्याचे' आभार !

जगात काही दुर्दैवी लोकांना सूर्यप्रकाशाची अलर्जी असते. ही माणसे दिवसा घराबाहेर पडू शकत नाहीत. या लोकांना वर्षानुवर्षे घरामधेच बसून राहावं लागतं. मला सूर्यप्रकाशाची अलर्जी नाही. याबद्दल 'त्याचे' आभार !

शेणातलं अन्न वेचून खाणारी गरिबी अजूनही या पृथ्वीवर आहे. पानात गुळगुळीत भेंडीची भाजी वाढली म्हणून मी बायकोवर रागावू शकतो. याबद्दल 'त्याचे' आभार !

आज घातलेला शर्ट धुवून उद्या वापरावा लागत नाही. बोवारणीला कपडे देऊन भांडी घेण्याइतपत कपडे आहेत.
‘आज हा शर्ट घालू की तो शर्ट घालू’ ही निवड करण्यात वेळ फुकट जातो याबद्दल 'त्याचे' आभार !

दोन्ही पाय लांब पसरून झोपण्यासाठी घरात पुरेशी जागा आहे. थंडीच्या दिवसात अंगावर पांघरूण आहे.
उकाड्यात पंख्याचा वारा आहे. साखरझोपेत असताना अंगावर पाऊस पडून झोपमोड होत नाही. याबद्दल 'त्याचे आभार' !

माझं उतरायचं ठिकाण आलं तरी 'ब्लेसिंग्स'ची ही यादी संपत नव्हती. एका वेगळ्याच तंद्रीत बसमधून उतरलो.
किती गोष्टी गृहीत धरून जगत होतो आपण ! तक्रार करायला जागाच नाही अशी खरं तर परिस्थिती.
इतकं असून तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय आपला दिवस सरत नाही.
परंतु अशा तक्रारी करणाऱ्या आणि निराशावादी लोकांना इतिहासात स्थान नसतं.
कारण इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जी माणसं स्वाभाविक मानवी मर्यादांच्या पलीकडे जातात.
इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जे आपल्या समृद्ध विचारांनी आणि कृतीने संकटांचे रुपांतर एका नव्या संधीत करतात.
या बाबतीत डॉ. चिंतामणराव देशमुखांची एक गोष्ट आठवली.
चिंतामणरावांनी ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यासमोर मोठ्या कष्टाने बाग फुलवली होती. रोज सकाळी चार वाजता उठून ते झाडांना पाणी-बिणी घालून त्यांची निगा राखत असत. काही वर्षांनी त्यांना तो बंगला काही कारणास्तव सोडावा लागला. त्या बागेकडे बघून त्यांचे एक स्नेही हळहळून म्हणाले, 'तुमचे कष्ट वाया गेले. एवढ्या प्रेमाने वाढवलेली बाग तुम्हाला इथेच सोडून जावी लागणार.'
चिंतामणराव म्हणाले, 'असं कसं म्हणता तुम्ही? झाडं वाढवायची किमया 'माझ्या' हातात आहे. मी जिथे जाईन तिथे एक नवीन बाग निर्माण करू शकेन !’

डोक्यात हे सगळे विचार घोळवतच घरी पोहोचलो. जेवायला बसलो. पानात भेंडीची भाजी !
काहीही न बोलता पानात वाढलेली भेंडीची भाजी संपवली.
'आज आवडली वाटतं - माझ्या हातची 'भेंडीची भाज्जी !' बायकोने टोमणा मारला.
'अं..हो.. हो..छान करतेस तू ही भाजी !' मी तंद्रीत म्हणून गेलो.
' मी छान स्वयंपाक करते याचा आज झाला का - 'साक्षात्कार' ?' बायकोने थट्टेच्या स्वरात विचारलं.
मी हसलो. तीही हसली.
काही गोष्टी न बोलूनही एकमेकांना बरोब्बर समजतात अशा घरात मी राहतो - याबद्दल 'त्याचे' आभार !

Thursday, June 30, 2011

काहीतरी नविन ! ३० जून २०११

You live life only once. But if you live it right, once is enough.
- Unknown


फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घ्यायच्या आधी फोनमधल्याच घडाळ्यात पाहिलं. सव्वा पाच वाजले होते. इतक्या अवेळी फोन आला होता की ज्यांच्याबद्दल ‘वाईट’ बातमी ऐकू येऊ शकते अशी नावं झर्रकन स्मरून गेली. (अशा वेळी ‘अपराधी’ वाटून घ्यायचं नसतं. सनईचे सूर ऐकून मेंदू मंगल प्रसंगच डोळ्यासमोर आणतो, इतकं सहज असतं हे.) मी धडधडत्या छातीने फोन घेतला. खरं तर “कोण?” असंच विचारणार होतो पण सवयीने ‘हॅलो’ म्हणून गेलो.
‘नविन, अंशुमान बोलतोय....अंशुमान गुप्ते....’
‘हां हां....बोल रे...काय झालं ?’
‘अरे आपले समेळ सर गेले.’
हे नाव मघाशी सुचलेल्या यादीत नव्हतं.
‘काय सांगतोस? कधी?’ .
‘काल रात्री. ब्लाब्ला ब्लाब्ला....ब्लाब्ला ब्लाब्ला...
‘ओके. पोचतो मी.’

डोक्यात समेळ सरांच्या आठवणींचा बॅकग्राउंड ट्रॅक चालू ठेवत सगळे प्रातर्विधी यंत्रवत पार पाडले. सवयीने गिझर ऑन केला. मग आठवलं, आंघोळ ‘आल्यावर’ करायची असते. गिझर बंद करून बेडरूममधे आलो. वॉर्डरोब उघडला. इस्त्री केलेल्या शर्ट्समधून एक पांढऱ्याच्या जवळपास शर्ट निवडला. (हे संस्कार हिंदी सिनेमाचे !) माझ्या या खुडबुडीने अर्धवट जागी झालेल्या बायकोला कुठे जातोय ते सांगितलं आणि घराबाहेर पडलो. आठवणीच्या पसाऱ्यातले फक्त समेळ सरांच्या मालकीचे क्षण मृत्यू नावाच्या चुंबकाला चिकटत होते. सरांचा चेहरा, त्यांचा आवाज डोक्यात भुंगा घालत होते. मृत माणसाच्या आठवणी Recycle Bin मध्ये फेकायच्या आधीची मेंदूची ही यंत्रणा असावी.

सरांच्या बिल्डिंगपाशी गुप्ते उभाच होता. थोड्या थोड्या अंतराने माणसं घोळके करून उभी होती. गुप्ते बरोबर सरांच्या घरी गेलो. उदबत्तीच्या एका गोडसर वासाने आणि काही स्त्रियांच्या अस्फुट हुंदक्यांनी खोली भरून गेली होती. समेळ सर आम्हाला पीटी शिकवायचे. त्यांना नेहमी आमच्या बरोबर खेळताना बघायची सवय. शांतपणे पहुडलेल्या अवस्थेत सरांना प्रथमच पहात होतो. शाळेत असताना समेळ सर कर्दनकाळ वाटायचे. क्षणभर वाटलं, आत्ता उठतील सर आणि म्हणतील, ‘काळे, पंचवीस सूर्यनमस्कार घातल्याशिवाय घरी गेलास तर उल्टा टांगेन उद्या !’ अश्रुपिंड डचमळण्यासाठी एवढा विचार पुरेसा होता. मी सरांकडे बघत तसाच उभा होतो.
‘बॉडी कधी न्यायच्ये? कोणीतरी विचारलं.
‘नागपूरहून शकुताई आली की निघू.’ ज्याला प्रश्न विचारला होता तो म्हणाला.
एक एक काडी जमवून स्वतःचं घर घ्यायचं. घराबाहेर अभिमानाने स्वतःच्या नावाची पाटी लावायची. मिशीला तूप लावून ‘माझं घर माझं घर’ करत आयुष्यभर चारचौघात मिरवायचं आणि मेल्यावार आपल्याच घरात आपली ओळख काय ? – बॉडी ! मान गये यमराज !
सरांना नमस्कार करून खाली आलो.

गुप्ते बरोबर एका कडेला उभा राहिलो. शाळेतली आणखीही काही मुले आली होती. बिल्डींगच्या प्रवेशाजवळच ‘दुःखद निधन’ हेडिंगचा हार लटकवलेला एक फळा उभा केलं होता. जाणारे येणारे क्षणभर थबकत, फळा वाचत आणि पुढे जात. तिरडी बांधणे हा जणू पिढीजात व्यवसाय असल्याच्या उत्साहात काही माणसं अशा ठिकाणी वावरत असतात. गीतेमध्ये सांगितलेली स्थितप्रज्ञ माणसाची सगळी लक्षणं मला या माणसांमध्ये दिसतात. मला या माणसांचं प्रचंड कौतुक वाटतं. चेहऱ्यावर दुःखाची एक रेष उमटू न देता ही माणसं खाली मान घालून आपलं काम करत असतात. त्या पंथाची काही माणसं इथेही होती. बाकीचे घोळके करून उभे होते. गप्पांना ऊत आला होता.

‘परवा भेटलेले हो, जराही वाटलं नाही की आज अशी बातमी ऐकू येईल. चौधरी, तुम्हाला सांगतो, हल्लीच्या जगात माणसाचा काही भरवसा राहिलेला नाही.’
‘बाकी माणूस छान ! सकाळी मला हाक मारल्याशिवाय दिवस सुरु होत नसे यांचा ! प्रत्येक गोष्ट करताना मला विचारणार म्हणजे विचारणार. घरात काहीही नवीन गोष्ट घ्यायची म्हटली की माझा सल्ला घेणार म्हणजे घेणार. किती वेळा त्यांना सांगितलं माझ्याबरोबर ब्रह्मविद्येला चला. पण शेवटी तशी बुद्धी व्हावी लागते हो !’
‘आज आमच्या लाफ्टर क्लब मध्ये समेळ गेल्याचं समजलं. मग आम्ही काय केलं, समेळ काकांना आवडणारा लाफ्टर एक्सरसाइज करून त्यांना श्रध्दांजली वाहिली !’
‘पाणी आणायला म्हणून सुनबाई आत गेली आणि बाहेर यांनी प्राण सोडला. म्हणजे बघा ठाकूर, आपण दहा वर्षांनी अमुक होणार तमुक होणार वगैरे गप्पा मारतो पण (आकाशाकडे बोट दाखवत) ‘तिथून’ आमंत्रण आलं की त्याला अपील नाही. बाय द वे, ते म्युचल फंडाचे फॉर्म्स सह्या करून ठेवलेत. तुमच्या माणसाला सांगून ते कलेक्ट करा जरा.’
‘बरं झालं आज पाऊस नाहीये. नाहीतर च्यायला ती एक कटकट असते.’
‘त्यांचा भाऊ पाहिलात ? हां तोच हिरव्या शर्टातला. डोळ्यात पाण्याचा टिपूस नाहीये. त्याचं फार बरं नव्हतंच म्हणा ! आपल्या मराठी लोकांना भाऊबंदकीचा शापच आहे साला !’
‘बरं झालं स्वतःच्या पक्षातच राहिले. बाहेर कुत्रं विचारणार नाही, म्हणावं !’
‘मी सरळ सांगितलं अमोलला. या रद्दी परीक्षा देत राहिलास तर जास्तीत उत्तम दर्जाचा कारकून होशील. सरळ मला बिझनेसमध्ये जॉईन हो !’
गप्पा ऐकून उबायला झालं. जवळची चहाची टपरी शोधली आणि कटिंग पीत उभा राहिलो.

तसं पाहिलं तर जन्माला आलो तेव्हाच मृत्यू निश्चित झाला होता. म्हणजे, जन्मापेक्षा मृत्यूच अटळ.
निश्चित येणार पण कधी येणार हे अनिश्चित ! मृत्यू ही संकल्पना या दृष्टीने फारच थ्रिलिंग आहे. परीक्षेचा पेपर आपण घाईघाईने लिहित असावं, आणि 'टाईम आउट' म्हणत कुणीतरी खस्स्कन् पेपर खेचून घ्यावा तसाच मृत्यू येत असावा. पेपर किती लिहिला यापेक्षाही पेपर अपुरा राहिला याचीच बोच जास्त !
अशा प्रसंगी हटकून आठवणारी म्हाताऱ्या सुताराची गोष्ट आत्ताही आठवली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका सुताराला त्याच्या मालकाने एक घर बांधायचं काम दिलं. सुतार आधीच कामाला कंटाळला होता, त्यात आणखी एका कामाची भर ! अनेक दोषांकडे दुर्लक्ष करत त्याने ते घर कसंतरी बांधून पूर्ण केलं. त्या घराच्या बांधकामात खूप दोष होते पण ते फक्त सुतारालाच माहित होते. निवृत्तीच्या दिवशी सुतार मालकाचा निरोप घ्यायला गेला. सुताराने बांधलेल्या त्या ‘शेवटच्या घराची’ चावी मालकाने सुतारासमोर ठेवली आणि म्हणाला – ‘तुमच्या निवृत्तीनिमित्त ही माझ्याकडून भेट !’ सुताराच्या पायाखालची जमीन सरकली. सुतार मनात म्हणाला, ‘हे घर मी माझ्यासाठी बांधतोय हे जर आधी माहिती असतं तर मी ते जास्त छान आणि मजबूत बांधलं असतं !'

माझा फोन वाजला. 'हां बोल गुप्ते ! बॉडी नेतायत्? आलो दोन मिनटात !'

हे दरवेळचं आहे.
कोणीतरी मरणार-आपल्याला विरक्ती येणार-सुताराची गोष्ट आठवणार-मग समरसून वगैरे जगावंसं वाटणार.
त्या दिवशी घरी जाताना बायकोला गजरा घेऊन जाणार, घरी जाऊन मुलाच्या केसातून हात-बीत फिरवणार.
दुसरा दिवस उजाडणार. नीट घडी करून ठेवलेला 'अमरपट्टा' आपण पुन्हा बाहेर काढणार आणि पुढची ‘बातमी’ ऐकू येईपर्यंत आपल्या अंगावर मिरवत राहणार.
आपला स्वतःचा पेपर खस्स्कन् खेचून घेतला जात नाही तोवर हे असंच चालणार !

Thursday, June 23, 2011

काहीतरी नविन ! - २३ जून २०११

The best vitamin to be a happy person is B1.
- Unknown


बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
'साहेब, जरा काम होतं.'
'पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?'
'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.'
'अरे व्वा ! या आत या.'
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
'किती मार्क मिळाले मुलाला ?'
'बासट टक्के.'
'अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.
'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !'
'अच्छा, म्हणून पेढे वगैरे !'
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, 'साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते - शांत वातावरन ! - आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.'
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको - सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब - हा माझा आनंद आहे !'
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, 'शिवराम, मुलाचं नाव काय?'
'विशाल.' बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं -
प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन !
नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा !

'शिवराम हे घ्या.'
'साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.'
'हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.'
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
'चहा वगैरे घेणार का ?'
'नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...’
‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. ! या 'आणखी'च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान लिहून ठेवलंय –

सबका ख़ुशीसे फासला एक कदम है
हर घर में बस एक ही कमरा कम है !

शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर कदाचित भरून निघालं नसतं.

Thursday, June 16, 2011

काहीतरी नविन ! १६ जून २०११

Wednesday 15 June

कसा आहेस? मी ठीक.
सॉरी, काल लिहू शकले नाही.
काल आपल्या पियुची शाळा सुरु झाली. मागच्या आठवड्यात जमलं नाही, म्हणून काल रात्री तिच्या वह्या पुस्तकांना कव्हर्स घालण्याचा 'सोहळा’ पार पडला.
'सोहळा’च तो. कोऱ्या करकरीत पुस्तकांच्या सुवासाचं अत्तर शिंपडून पार पडणारा !
थोडक्यात...म्हणून काल लिहिणं जमलं नाही.

आज वटपौर्णिमा होती. तू 'गेल्या'नंतरची पहिली....
काल लोकलच्या डब्यात कुणीतरी विषय काढला.
मी गप्पांमधून अंग काढत ट्रेनच्या खिडकीतून दिसणाऱ्या काळोखात बघत बसले.
आपल्या लग्नापूर्वी तू सांगितलेला जोक आठवला - वटपौर्णिमेला बायका वडाजवळ काय मागतात ? - 'वडा-पाव' !
तुझ्या तोंडून प्रथम ऐकला तेव्हा केव्हढी हसले होते मी ! आठवतंय नं ?
आणखी एक प्रसंग आठवला.
आपलं नुकतंच लग्न झालं होतं. माझ्या एकंदरीत 'उत्साहावरून' सासुबाईंनी माझं मन ओळखलं असावं. माझा हात धरून मला सोसायटीतल्या वडाजवळ घेऊन गेल्या. मला म्हणाल्या उद्या सकाळी आपल्याला इथे येऊन पूजा करायची आहे. मी म्हटलं 'माझा विश्वासc नाही'. तर म्हणाल्या,’या निमित्ताने वडाला नमस्कार करायचा. इतकी वर्ष इथे उभा राहून तो आपल्याला सावली देतोय त्याबद्दल त्याचे आभार मानायचे.’
परंपरेपेक्षा मला ही कृतज्ञतेची भावना जास्त भावली. मी सासूबाईंबरोबर दर वर्षी पूजा करू लागले.
आज सकाळी पुजेची थाळी घेऊन वडाजवळ गेले. सोबत सासूबाई होत्या.
वडाजवळ उभी राहिले. बराच वेळ निःशब्द ! अचानक काय वाटलं माहित नाही -भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी वडाला एक salute ठोकला !
Afterall, तू मेजर होतास, विक्रांत !
सासूबाई मला सावरायला म्हणून आल्या होत्या, पण आता त्यांचाच बांध फुटला.
आधीच सोसायटीतल्या बायकांनी मी तिथे गेल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या.
आता तर मला ऐकू जाईल अशी कुजबुज सुरु झाली.
'हिला आणायचं का इथे ? सबनीस काकींना तरी कळायला हवं होतं!' गर्दीतून कोणीतरी हळूच म्हणालं.
माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या त्या बायकांशी मला हुज्जत घालायची नव्हती कारण मी काय करत होते याबद्दल मला विश्वास होता.
विक्रांत, आपण या जन्मात भेटलो खरे - पण तू 'मला असा' किती मिळालास?
पुढचे सात जन्मच काय- सगळे जन्म तू मला हवा आहेस... हे, खरं तर, घरी बसून देखील मागता आलं असतं. पण का कोणास ठाऊक, मला वडाजवळ जावसं वाटलं. घरातल्या एखाद्या आजोबांसारखा असलेला तो वड माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल असं वाटलं.
त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की परंपरा-रूढी, प्रतीकं तुम्ही माना किंवा मानू नका पण तुमच्या एकूण 'असण्याला'च या सगळ्या गोष्टी चिकटलेल्या असतात.
तू असतास तर मला वेड्यात काढलं असतंस कारण तुझा या कशावर विश्वास नव्हता.
पण एक सांगू ? विश्वास-अविश्वास या सगळ्याच्या पलीकडे एक प्रांत असतो. मी त्याला 'instinct' म्हणते.
भिकाऱ्याला कधीही भीक न देणारे आपण एखादवेळी पट्कन कुणालातरी भीक देऊन मोकळे का होतो, याला जसं लॉजिक नसतं तसंच काहीसं. अशावेळी आपण फक्त आपल्या 'instinct' ने दिलेली आज्ञा पाळत असतो.
सोळा डिसेंबरच्या रात्री बॉर्डरवर शत्रूशी चकमक झाली. फारशी कुमक जवळ नसताना तू कोणाच्या आज्ञेने लढलास आणि शहीद झालास? Vikrant, you just followed your instinct !

वटपौर्णिमेला मला वडाजवळ पूजा करताना पाहून शेरे मारणाऱ्या समाजाबद्दल मला राग नाही, पण गंमत वाटते.
सो कॉल्ड प्रगतीच्या नावाखाली स्त्रियांच्या हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास खपवून घेणारा समाज विधवा स्त्रीचा वड पुजण्याचा हक्क नाकारतो. आपल्या मुलीबाळी गणेशोत्सवात 'शीला की जवानी' म्हणत नाचलेल्या चालतात, पण पिरियड्स चालू असलेल्या स्त्रीला देवघरात यायचा मज्जाव असतो !
हा paradox मला मान्य करावा लागतो.
तुम्ही ढीग शिका, पदव्या मिळवा, जग जिंका - माझ्यासारख्या एकट्या बाईला समाजात राहायचं असेल तर जगण्यातल्या या विसंगतीला पर्याय नाही.
आर्मीत गेल्यानंतर तू आम्हा सिविलीयन्सना नेहमी नावं ठेवायचास. 'तुम्हाला जगण्याची शिस्त नाही' म्हणायचास.
नसेल आम्हाला शिस्त. पण इथेही कुठलीही गोष्ट लढूनच मिळवावी लागते.
मी ही रोज लढते....
भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाचं रक्षण करण्यासाठी माझ्या नवऱ्याने रक्त सांडलं या जाणीवेसह जगत राहण्याबद्दल कुठलं शौर्यचक्र मिळणार नाही हे माहित असून लढते.
पियु, सासूबाई आणि बाबांसमोर कणखर राहण्याचा जो मी 'अभिनय' करते त्याबद्दल कुठलंही award मिळणार नाही हे माहित असून लढते.
आपल्या पियुच्या न संपणाऱ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देण्याबद्दल कुणी पाठ थोपटणार नाही हे माहित असून लढते.

I am a soldier, I fight where I am told, and I win where I fight ! - तूच म्हणायचास ना?

थांबते. पियुला गोष्ट सांगायची वेळ झाली.
उद्या भेटू. बाय.

Thursday, June 9, 2011

काहीतरी नविन! - ९ जून

When the last tree is cut down, the last river poisoned, and the last fish caught,
Will we realize that we can't eat money?


तो 'एन्ट्री' घेणार म्हणून सगळा रंगमंच सजून तयार असतो.
सगळे प्रेक्षक अक्षरशः घामाघूम होऊन त्याच्या 'एन्ट्रीची' वाट पहात असतात.
प्रेक्षागृहात अचानक काळोख होतो.
प्रेक्षागृहात गार वाऱ्याची एक झुळूक येते. घामाघूम झालेले प्रेक्षक थोडे सुखावतात.
वावटळ झाल्याप्रमाणे रंगमंचावर धुरळा उठतो तशी सगळे म्हणतात - 'आता तो नक्की येणार'.
काही मिनिटं विलक्षण शांततेत जातात. प्रेक्षकांची उत्सुकता थोssडीशी ताणून अखेर तो 'एन्ट्री' घेतोच.
'तो' येतो. त्याला हात मिळवण्यासाठी मी माझा हात पुढे नेतो आणि मागून आवाज येतो,
'खिडकी बंद करा नाहीतर बसमध्ये पाणी येईल.'
मुंबईत पहिल्या पावसाचं स्वागत हे असं होतं !
--------------

पावसाबद्दल लिहिताना मेंदूला कितीही ताण दिला तरीही मला इंद्रधनूची कमान, हिरवीगार (डोलणारी) शेतं,
खळाळते निर्झर असे शब्द सुचतच नाहीत.
कारण मी माळशेज घाटात लहानाचा मोठा नाही झालोय.
कवितेतला पाऊस आमच्या शहरात भेटणं अशक्य.
शहरातला पाऊस शाम बेनेगलांच्या आर्टफिल्म सारखा पडतो – गद्य !
आपल्या जेवणात आपण जे गहू, तांदूळ, भाज्या वगैरे खातो ते आधी शेतात उगवतात आणि मग दुकानात येतात हे आम्ही एव्हाना विसरलो आहोत. घराच्या नळातून जे (काही थोडं फार) पाणी येतं ते कुठल्यातरी तलावात आधी आकाशातून पडतं हेही आम्ही विसरलो आहोत.
आमच्यासाठी पाऊस म्हणजे ब्राऊन रंगाच्या पाण्याने साचलेली डबकी, ट्राफिक जाम, छत्रीची अडगळ,
बुटाच्या आत पाणी जाऊन भिजलेले मोजे, गर्दी, पायाच्या मागच्या बाजूस उमटलेले चिखलाचे नक्षीकाम.
आमच्यासाठी पाऊस म्हणजे हेडेक. पाऊस म्हणजे मेस्स !
आणि तसंही मल्टीप्लेक्स, मॉल्स, मोबाईल फोन्स, केबल टीव्ही, डिश एंटेना, कम्प्युटर्स, एसी वगैरे पावसाच्या पाण्यावर कुठे चालतात ?
नाही पडला पाऊस, काय फरक पडतो ?

होल्ड ऑन. एका गोष्टीसाठी मात्र आम्हाला पाऊस हवा असतो.
आमच्यातली 'वाइल्ड साईड' जागी करायला आम्हाला पाऊस हवा असतो.
काळ्या प्लास्टिक पिशवीच्या आड स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी, आमच्या इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी
आम्हाला पाऊस हवा असतो.
आम्हाला पाऊस यासाठीही हवा असतो की जेणे करून
आम्ही ऑफिसला दांड्या मारण्याची अभिनव कारणं शोधून काढू शकु.


आम्हाला पाऊस यासाठीही हवा असतो की जेणे करून
आम्ही निसर्गाच्या कुशीत-बिशीत जात गोंगाट करून तिथली शांतता बिघडवू शकु.
तिथल्या हिरव्यागार गवतावर फ्रुटी आणि लेजच्या पाकिटांची रांगोळी काढू शकु.
निदान हे करण्याइतपतच पाऊस पडला पाहिजे.

आम्हाला हवा तेव्हाच पडेल आणि नको तेव्हा बंद होईल असा पाऊस
कुठल्या मॉलमध्ये मिळतो का याचा शोध आम्ही सगळेच शहरवासी घेत आहोत.
कुणाला यासंबंधी अधिक माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.
प्रत्यक्ष भेटून नको. इमेल किंवा एसेमेसने कळवा.
उगाच भेटण्यात वेळ कशाला खर्च करा !

इतकं सगळं असून....पाऊस कोडग्यासारखा पुन्हा पुन्हा शहरात येत राहतो.
आमच्या घराच्या छपरावरून ओघळत खिडकीशी येतो.
खूप जोराने खिडकी वाजवत-भिजवत राहतो.
त्याच्या आवाजामुळे टीव्ही सिरीयलमधील आमच्या लाडक्या कलाकारांचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
मग आम्ही खिडक्या बंद करतो.
एकेकाळी पाण्यात कागदी होड्या सोडणारं बालपण आता ‘पोगो’ चॅनल बघण्यात दंग असतं.
पण तरीही तो आमच्या रस्त्यांवर साचत राहतो.
सिमेंटच्या रस्त्यातून आत मुरायला ‘स्कोप’ नाही म्हणून आमच्या थुंक्यांशी, पानाच्या लालभडक पिचकारींशी, पिचलेल्या प्लास्टिक पिशव्यांशी अगतिकपणे खेळत राहतो.
गेट वे ऑफ इंडिया, मरीनलाईन्सजवळ पावसाचा ‘सवाई गंधर्व’ महोत्सव सुरु असतो पण
त्याचा ‘मझा’ घ्यायला मात्र मोजकेच चोखंदळ रसिक उपस्थित असतात.

उपरेपणाच्या या भावनेतून मग त्याचा ‘इगो’ दुखावतो. तो थैमान घालतो.
आमची रेल्वे, बस सेवा बंद पाडतो. आम्हाला गुडघाभर पाण्यात बुडवतो.
ध्यानीमनी नसताना आम्हाला सुट्टी मिळाली या आनंदापुढे हा त्रास गौण असतो.
सर्व सोयींनी सुसज्ज शहरात गैरसोयीला सरावलेले आम्ही या सगळ्याला हसत हसत तोंड देतो.
'खूप काही सांगायचं राहून गेलं' असं दरवर्षी म्हणत पाऊस हलक्या पावलाने निघूनही जातो.
--------------

एखाद्या घरातील अडगळीत पडलेल्या दुर्लक्षित वृद्धाकडे बघून यावी तशी मला पावसाची कणव येते.
मागच्या सीटवर बसलेला माणूस काय म्हणेल याची पर्वा न करता मी बसची खिडकी उघडतो.
माझा हात खिडकीबाहेर नेतो आणि ओंजळीत त्याच्या सरी साठवू पहातो.
माझ्या ओंजळीत आलेला त्या अनादी वृद्धाचा 'गार पडत जाणारा हात'
मला माणूस जातीच्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जातो !

Thursday, June 2, 2011

काहीतरी नविन ! - २ जून २०११

You don't have to burn books to destroy a culture. Just get people to stop reading them.
-Ray Bradbury



'लिमोझोन'.
बरोब्बर! हेच नाव. मी पत्ता लिहिलेला कागद खिशात ठेवला आणि दरवाजा उघडून आत गेलो.
चिक्कार गर्दी. मी एकवेळ शांत बसलेली दहा लाख माणसं सहन करेन. पण मचमच करणारी दहा डोकीसुद्धा माझ्या डोक्यात जातात.जिभेला खाज सुटली म्हणून इतक्या लांब आलो होतो. वाट पाहण्यावाचून आता पर्याय नव्हता.
एक रिकामा कोपरा निवडला. माझ्या घामेजलेल्या अंगावर एसीचा झोत येत राहील अशा बेताने उभा राहिलो. काउंटरवर बसलेल्या माणसाने माझं नाव लिहून घेतलं. मला दहा मिनिटं थांबायची विनंती केली. माझ्या समोरून वेटर्स लगबगीने खाण्याच्या प्लेट्स घेऊन जात येत होते. त्यांच्या हातात जे पदार्थ दिसत होते ते काही अनोळखी वाटत नव्हते. माणसं मिटक्या मारत खात होती.
सगळ्या पदार्थांचा मिळून एक सामाईक वास त्या बंद-एसी जागेत भरून राहिला होता.
पाच मिनिटं वाट बघून निघायचं असं मनात म्हणतोय न म्हणतोय, तोच पाठीवर कुणीतरी हलकेच थोपटलं.
मी मागे वळून पाहिलं. तो लिमये होता. माझा कॉलेज-मित्र. जराही बदलला नव्हता. मी त्याला तसंही विसरणं शक्य नव्हतं. कारण तो नेहमी माझ्याकडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये खायचा. महत्वाचं म्हणजे त्याने मला बरेच पैसे देणं होतं.
रिझल्ट लागला आणि तो कुठेतरी लांब शिकायला गेला इतकंच माहित होतं.
.......'लिम्या तू ? कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस?' मी एका दमात विचारलं.
'मी मजेत. तू कसा आहेस ? काय करतोस ?' लिमयेने हसत विचारलं.
मी विचारलेल्या चार प्रश्नांपैकी त्याने एकाच प्रश्नाचं उत्तर देऊन बाकीचे प्रश्न टाळले हे विसरून मी माझ्याबद्दल सांगत राहिलो. लिमये माझं ऐकता ऐकता तिथे बसलेल्या लोकांना हात-बीत करत होता.
माझं पुराण संपल्यावर मी मस्करीच्या स्वरात विचारलं, 'लिम्या, तुझी ही रोजची जागा दिसत्ये. अजूनही उधारीवर खातोस?'
मला जोरदार टाळी देत लिमये हसुन म्हणाला, 'देवाच्या कृपेने आता उधारीवर खात नाही. मीच या हॉटेलचा मालक आहे ! चल माझ्याबरोबर !'

मी आता लिम्याच्या एसी केबिनमध्ये होतो. माझ्यासमोर एका ग्लासात थंड कोकम सरबत आणि बाजूला मेन्यू कार्ड.
'काय खाणार साहेब ? फक्त हुकुम करा.'
मी मेन्यू कार्ड उघडलं. एकही पदार्थ ओळखीचा वाटत नव्हता.
मेन्यू कार्ड लिम्या समोर फेकत मी म्हटलं 'लिम्या हे काय आहे? एकही पदार्थ ओळखीचा नाही. इसापनीतीच्या गोष्टीतला तू करकोचा आणि मी कोल्हा आहे का ?'
लिम्या जोरात हसला आणि म्हणाला, ‘मला माहित्ये तुला साबुदाण्याची खिचडी जाम आवडते. आधी ती खा आणि मग लिमोझोन स्पेशल पोहे खाऊन बघ.'
लिम्याने बेल दाबताच एक वेटर आत येऊन 'येस सर...' म्हणाला.
'साहेबांसाठी एक फ्राईड बबल्स घेऊन या. आणि मग गोल्डन पेटल्स.' लिम्याने आज्ञा सोडली.
'लिम्या - लिमये - संतोष - अरे मला खिचडी आणि पोहे... ' मी पुढे काही बोलायच्या आत लिम्याने मला थांबवलं.
'तू तेच खाणार आहेस, जे तुला खायचं आहे.' लिम्या हसत म्हणाला.
माझ्या मनात उभं राहिलेलं प्रश्नांचं वादळ लिम्याने जोखलं असावं. लिम्या बोलू लागला...
'नविन, दहा वर्षांपूर्वी 'लिमये उपहारगृह' नावाने व्यवसाय सुरु केला. आपण 'मराठी पदार्थ' विकतो याचा खूप अभिमान वाटायचा. पण मग लक्षात येऊ लागलं की माझ्याकडे येणारा कस्टमर वडापावला काही पन्नास रुपये मोजणार नाही. कारण त्याने आधीपासूनच 'मराठी पदार्थ म्हणजे स्वस्त पदार्थ’ हे समीकरण मनाशी ठरवून टाकलेलं असतं. मुंबईत मराठी पदार्थ विकणारी अनेक उपहारगृह मी जवळून पाहिली. तिथे बसून खाऊन पाहिलं. मग लक्षात आलं की आपले मराठी पदार्थ चविष्ट आहेत पण आपण त्यांना नीट सजवून 'पेश' करत नाही. आपल्या जुन्या पिढ्यांचे संस्कार असतील कदाचित, पण आपण 'जेवण' या क्रियेचा 'उत्सव' साजरा करत नाही. ताटात जे वाढलंय त्याच्याशी आपली बांधिलकी 'उदरं भरणं' इतकीच सीमित असते. म्हणूनच आपल्याला अमिबाच्या आकाराचं थालीपीठ खाताना काही वाटत नाही. परंतु मराठी नसलेली माणसं या बाकीच्या गोष्टींचा विचार करतात. तो पदार्थ दिसतो कसा, तो ताटात वाढलाय कसा, तो सजवलाय कसा, त्याला काय म्हणतात या बाबतीत ते सजग असतात. मग त्यासाठी ते भली मोठी किंमत मोजायला तयार असतात. जग झपाट्याने बदलतंय. आता माणसांना फक्त पोट भरायचं नसतं. त्यांना खाण्याच्या 'प्रक्रियेचा अनुभव' घ्यायचा असतो. लोक त्या 'अनुभवाचे' कितीही पैसे मोजायला तयार असतात. मग ठरवलं, आपला approach बदलायचा. ‘लिमये उपहारगृहा’चं 'लीमोझोन' केलं. मेन्यू कार्ड नव्याने तयार केलं. पदार्थांची नावे बदलली. त्यांचं 'रुपडं' बदललं. अमिबासारखं दिसणारं थालीपीठ मी इथे 'kharpoos platter' नावाने नव्वद रुपयाला विकतो - आणि लोक ते खातात ! पण मग मी कंजुषी नाही करत. थालीपिठाचा बेस करून त्यावर किसलेल्या चीजचा भडीमार करतो आणि वर एक लालभडक चेरी लावून देतो ! काय ‘नाही’ म्हणतील नव्वद रुपये द्यायला ! ताजा भात फोडणी घालून देतो. त्याला फोडणीचा भात नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं - Golden Rice ! शेव गाठ्या पेरून दिलेला हा Golden Rice खायला लोकांच्या उड्या पडतात !
मी आवक झालो होतो. पण तरीही माझ्यातला 'मराठी माणूस' जागा झालाच.
'लिम्या हे सगळं ठीक आहे. पण यामुळे 'आपण जे खातोय ते मराठी पदार्थ आहेत' हे लोकांना कधीच कळणार नाही. त्याचं काय ?'
लिम्या म्हणाला, 'माझ्या आईवर माझं प्रेम आहे' असा बॅनर लावतोस का तू? तसंच आहे हे. कुठलीही भेसळ न करता मी लोकांना चांगल्या दर्जाचे मराठी पदार्थ देत आहे हे समाधान माझे एकट्याचे आहे. आणि ते फक्त माझ्यापुरते आहे. मी माझ्या हॉटेलमध्ये पुलंचा 'माझं खाद्यजीवन' मधील एक उतारा चांगल्या गुजरातीत, हिंदीत आणि इंग्रजीत अनुवादित करून लावलाय. ‘भाषेचा अभिमान’ म्हणून मला तो मराठीत लावता आला असता पण इथे येणाऱ्या बिगर मराठी लोकांना तो कळला नसता. माझे पुलं काय म्हणताहेत ते इतरांपर्यंत ‘त्यांना समजेल’ अशा भाषेत पोहोचणं जास्त महत्वाचं ! फ्राईड बबल्स, गोल्डन राइस हे सगळे 'अनुवाद' आहेत! आपली खाद्य-संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून 'लिमोझोन' हा छोटासा प्रयत्न आहे. एक सांगू का? मी तर आता अशा निष्कर्षाला पोहोचलो आहे की केवळ 'वाद' घालून नव्हे तर ‘अनुवादा'मुळे संस्कृती टिकत असते!’

लिम्याला अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक अनुवादाची 'उधारी' आता फक्त माझ्यावरच नाही, तर फ्राईड बबल्सना 'साबुदाणा खिचडी' म्हणणाऱ्या प्रत्येकावर आहे !

Thursday, April 21, 2011

काहीतरी नविन ! - २१ एप्रिल

The person you are with most in life is yourself and
if you don't like yourself you are always with somebody you don't like !



त्या दिवशी माझ्या पावणे तीन वर्षांच्या मुलाबरोबर - अमृतबरोबर - खेळत होतो.
खेळ साधाच. गादीवर एक उशी ठेवली होती. अमृतने उभं राहून आणि मी ढोपरावर उभं राहून स्वतःला उशीवर झोकून द्यायचं. असं पडायचं की उशीवर नाक आपटायला पाहिजे. एकदा अमृत आपटायचा, एकदा मी. अमृत हसून हसून बेजार झाला होता. मलाही मजा येत होती.
हा खेळ खेळताना एक गोष्ट लक्षात आली.
अमृत स्वतःला बिंधास झोकून देत होता. उशीवर नाक आपटल्यावर हसत होता. मी काय करत होतो, मी स्वतःला झोकून द्यायचो. पण उशी जवळ यायच्या आत स्वतःचे दोन्ही हात उशीच्या बाजूला टेकवत होतो आणि तोंड 'बेमालुमपणे' एका बाजूला फिरवत गालावर आपटत होतो. तसं पाहिलं तर, मऊ मऊ उशीवर तोंड आपटून मी काही रक्तबंबाळ वगैरे होणार नव्हतो. पण कशाला रिस्क घ्या ! माझा conditioned मेंदू माझ्या शरीराला जणू हाच संदेश देत होता. साधं उशीवर पडताना आपला मेंदू इतकी काळजी घेतोय तर बाकी मोठे निर्णय घेताना वगैरे मेंदू स्वतःचा इन्शुरन्स काढत असेल !
यालाच 'एजिंग प्रोसेस' म्हणत असतील का ?
निसर्ग प्रत्येक माणसाकडून वय वाढल्याची ही किंमत मोजून घेत असेल का ?
आत्ता उशीवर नाक आपटून खिदळणारा अमृत काही वर्षांनी 'अनुभव कमावून' माझ्यासारखाच चाचपडत जगेल का?
जगजीत सिंगच्या एका गज़ल मधील ओळी आठवल्या -
लोग हर मोड़ पे रुकरुक के सम्हलते क्यूँ है, इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यूँ है !
पण काही माणसं याला अपवाद असतात. निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून ती माणसं मनाने 'लहान मुल'च राहतात.
काय असेल याचं रहस्य ?..........
***********************************************
'उशीच्या खेळाला' आठवडा लोटला होता.
ऑफिसमधून घरी चाललो होतो. मोबाईलवर रेडियो ऐकत होतो.
'3 Idiots’ मधलं माझं आवडतं गाणं लागलं होतं – ‘बहतीं हवाँ सा था वों’...
रेडियोवरचं गाणं संपलं. पुन्हा ऐकायचं म्हणून मोबाईल मध्ये स्टोअर केलेलं गाणं ऐकू लागलो.
पुन्हा एकदा... पुन्हा एकदा... पुन्हा एकदा... पाच वेळा ऐकलं.
स्वानंद किरकिरेचे शब्द आता डोक्यात घुमू लागले होते.
.... आणि अचानक गाणं ऐकता ऐकता बंद झालेले माझे डोळे खाडकन उघडले.
बहतीं हवाँ सा था वों
उडती पतंग सा था वो
कहाँ गया उसे धुन्ड़ो...
मला असं वाटलं की प्रत्येक मोठया माणसाने स्वतःसाठी म्हणायचं हे गाणं आहे !

स्वानंद किरकिरे यांनी सिनेमासाठी हे गाणं लिहिलं आहे. सिनेमात त्याला एक विशिष्ट संदर्भही आहे.
परंतु माझी खात्री आहे की हे गाणं लिहिताना स्वानंद यांना हाच अर्थ अभिप्रेत असेल की प्रत्येक माणसाने आपल्यात लपलेला 'रांचो' शोधावा आणि तो जपावा. 'कहाँ गया उसे धुन्ड़ो'... असं म्हणताना दुसऱ्या कुणाला शोधायचं नाहीये तर दुनियादारीच्या धबडग्यात हरवलेल्या ‘स्वतःलाच’ शोधायचं आहे.

'काहीतरी नविन' ची दोन-पानी परंपरा मोडून या वेळी एक तिसरं पान समाविष्ट केलं आहे. त्या तिसऱ्या पानावर हे अख्खं गाणं लिहून दिलं आहे. तिसऱ्या पानावर जाऊन ते अख्खं गाणं कविता वाचावी तसं वाचा. ज्या माणसाला ते शोधत आहेत त्या माणसाचं वर्णन त्यात आहे. तो माणूस तसा होता आणि आम्ही असे आहोत. तो तसं करायचा आणि आम्ही असं करतो, वगैरे. त्या गीतातला "वो" म्हणजे 'पाच वर्षांचे तुम्ही' आहात. आणि "हम" म्हणजे 'आजचे तुम्ही' आहात.
आता तडक तिथे जा, प्रत्येक शब्द वाचता वाचता स्वतःला शोधा आणि पुन्हा या इथे !

भेटलात स्वतःला ? कसं वाटलं ?
प्रामाणिकपणे सांगा, 'मोठं' होण्याच्या नादात हातातून बरंच काही निसटून गेलं असं नाही वाटलं ?
लहान होतो तेव्हा किती 'प्युअर' होतो आपण ! शाळेची चार बुकं काय शिकलो आणि केवढी पुटं चढत गेली आपल्यावर !
आपल्यात लपलेला 'तो' कसा होता त्याचं वर्णन त्या गाण्यात आहेच. आणि आपण आता तसे उरलेलो नाही हेही एव्हाना आपल्याला कळले आहे.
काळाची चाके मागे फिरवून पुन्हा लहान होणे आता शक्य नाही. लहानपणी आपल्या गाठीशी जितका मोकळा वेळ होता तो मिळणं तर आता बाप जन्मात शक्य नाही. मग प्रश्न उरतो, आपण करायचं काय ? जुन्या आठवणी काढून रडत बसायचं? आपल्या करत असलेल्या नोकरी धंद्याला नावं ठेवत ते 'फुरसत के रात दिन' आठवून झुरत बसायचं ? की आपल्या समोर वाढणाऱ्या लहान मुलांचा हेवा करत जगत राहायचं?
मला विचाराल तर यातलं काहीही एक न करता आपल्याला पुन्हा लहान होता येईल !
या जादुई फॉर्म्युलाचं उत्तर एका वाक्यात दडलेलं आहे.
आजपासुन 'स्वतःवर' प्रेम करायला शिकायचं !
मध्यंतरी एक सुंदर एसेमेस आला होता.. त्यातली एक ओळ खूप आवडली होती. –
'ख़ुदही को फोन लगाओ, तो सारी लाईने व्यस्त है' !
आपण इतरांशी होणाऱ्या संवादात इतके बुडून गेलो आहोत की आपल्याला स्वतःशीच बोलायला वेळ नाही.
कसं जडणार आपलं आपल्यावर प्रेम ?
'तुका म्हणे होय मनासी संवाद' सुरु झाला की तुम्हालाच पटू लागेल एक नवी ओळख, तुमची तुमच्याशीच.
तुम्हाला उमगू लागेल की तुमचा खरा पिंड काय आहे, तुमची खरी स्वप्ने काय आहेत ते.
एकदा ते उमगलं की अर्धी लढाई जिंकलीत म्हणून समजा.. मग I don't 'find' time ही नेहमीची एक्सक्युज नसेल. You will 'make' time for doing the things which you always loved to do or wanted to do. स्वतःचा अभिमान वाटेल अशा गोष्टी करून दिवस भरू लागला की 'वो बस 'आज' का जशन मनाता' ही ओळ तुम्ही अक्षरशः जगू लागाल !

एक सांगायचं राहिलं. तिसऱ्या पानाचा एक प्रिंट-आउट घ्या. त्या पानावर जिथे ते गाणं लिहिलं आहे त्यावर एक रिकामी चौकट ठेवली आहे. तुम्ही सर्वात मस्तीखोर दिसत असाल असा एक लहानपणीचा फोटो त्या चौकटीत चिकटवा. तुमच्या ऑफिस डेस्कवर किंवा तुमच्या बेडरूम मधल्या भिंतीवर फोटो चिकटवलेला हा प्रिंट-आउट लावा. हा प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या 'ध्येया’ची सतत आठवण करून देत राहील!

एकदा का जगण्याचा असा 'रियाझ' सुरु झाला की या गाण्याचा खरा भावार्थ तुमच्यामध्ये 'इन-प्रिंट' होऊ लागेल आणि मग या 'प्रिंट-आउट' ची गरज भासणार नाही !

स्वानंद किरकिरे यांना या गाण्यासाठी जितके पुरस्कार मिळाले असतील त्यापेक्षा 'हा' पुरस्कार कितीतरी पटीने मोठा असेल !

__________________________________________________________________



बहतीं हवाँ सा था वों
उडती पतंग सा था वों
कहाँ गया उसे धुन्ड़ो.....


हम को तो राहें थी चलाती
वो ख़ुद अपनी राह बनाता
गिरता, सम्भलता
मस्ती में चलता था वों
हम को कल की फ़िक्र सताती
वो बस आज का जशन मनाता
हर लम्हे को खुलके जीता था वों


सुलगती धुप में छावोंके जैसा
रेगिस्तान में गावोंके जैसा
मन के घाव पे मरहम जैसा था वों
हम सहमेसे रहते कुवेंमे
वो नदियांमे गोते लगाता
उल्टी धारा चीर के तैरता था वों
बादल आवारा था वों,
यार हमारा था वों

कहाँ गया?....उसे धुन्ड़ो.....!


--स्वानंद किरकिरे

Thursday, April 14, 2011

काहीतरी नविन ! - १४ एप्रिल

The greatest battles of life are fought out daily in the silent chambers of the soul.
- David O. McKay



मागचा सगळा आठवडा ‘अण्णा हजारे’ या साडेपाच अक्षरांनी व्यापुन टाकला होता.

खूप वर्षांनी आपल्या देशात एक अनोखी घटना घडली. एका अ-राजकीय छत्रीखाली या देशातील आबाल-वृध्द मंडळी एका गोष्टीविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र जमली. बेदाग़ चारित्र्य असलेल्या अण्णांच्या एका हाकेला 'ओ' देत लाखो माणसं या लढाईत सामील झाली. इंटरनेट (फेसबुक आणि तत्सम), इमेल, एसेमेस अशा अत्याधुनिक माध्यमांनी या आंदोलनात महत्वाचे योगदान दिले. असं म्हणत असतानाच मी हे देखील सांगू इच्छितो की या माध्यमांनी आपल्या अंगभूत मर्यादांचेही प्रदर्शन केले. इंग्रजीमध्ये ज्याला candy floss feeling म्हणतात ते देण्यात ही अत्याधुनिक माध्यमे यशस्वी ठरली. घरबसल्या किंवा ऑफिसबसल्या एक मिस्ड कॉल करून, एक एसेमेस पाठवून, एक इमेल फोरवर्ड करून किंवा एक ऑनलाईन पिटीशन भरून आपण आपली ‘कर्म’ करायला मोकळे झालो यात जी एक 'सोय' होती तीच या माध्यमांची सर्वात मोठी मर्यादा आहे. भ्रष्टाचारासारखा एक जटील आणि सर्वव्यापी प्रश्न आपण आपल्या 'मोकळ्या वेळात' निकालात काढला. माझा या माध्यमांवर आक्षेप नाही. पण या माध्यमांद्वारा आपण एखाद्या समस्येचं जे (सोयीस्कर) 'सोपेकरण' करतो ते मला फार मजेशीर वाटतं.

वृत्तपत्रे, टीव्ही ही माध्यमे देखील स्वतःला आवरू शकली नाहीत. सतत लपून-छपून अण्णांची टिंगल करणाऱ्या माध्यमांनी अण्णांना एका रात्रीत ‘देशनायक’ करून 'दुसरे गांधी' वगैरे किताब देऊन टाकले ! तथाकथीत सेलिब्रिटी मंडळींनी अण्णा हजारे यांना पाठिंबा देताच जणू अख्खा देशच अण्णांच्या पाठीशी उभा राहिला आहे असं काहीसं चित्र प्रसार माध्यमांनी उभं केलं. (नाही म्हणायला देश पाठीशी होता, पण तो 'अण्णा आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है' या टाइपचा होता. अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्याचाच हा प्रकार होता.) ‘पेज-थ्री’ मंडळीनी डोक्यावर 'मै अण्णा हजारे हुं' असं लिहिलेल्या गांधीटोप्या घालून आणि हातात 'मेरा नेता चोर है' असं लिहिलेली पोस्टर्स घेऊन मोर्चे काढले. आपल्या देशात एखाद्या गोष्टीत 'Form over Substance' किती पराकोटीचा असू शकतो याचं हे (आणखी एक) उदाहरण होतं. अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध गेली अनेक वर्षे एकाकी लढा देत आहेत. पण त्यांना यावेळी मिळाला तसा ‘अभूतपूर्व प्रतिसाद’ पूर्वी कधी मिळाल्याचं ऐकिवात नाही. जंतर मंतर येथे उभ्या राहिलेल्या या आंदोलनावर निर्विवादपणे नुकत्याच झालेल्या इजिप्त मधील क्रांतीची छाया होती. लोकपाल बिलाच्या जडणघडणीत संयुक्त समितीची स्थापना होताच जणू हा देश भ्रष्टाचारमुक्त झाला आहे अशा अर्थाचे मथळे वृत्तपत्र आणि टीव्हीवाल्यांनी दिले. वर्ल्ड-कप जिंकल्याप्रमाणे एक 'विजयी' वातावरण निर्माण करण्यात माध्यमे यशस्वी ठरली. माझ्या दृष्टीने तोच सर्वात मोठा धोका आहे. कारण या सर्व माध्यमांना हे पक्कं ठाऊक आहे की जोवर या पृथ्वीवर ‘माणूस’ नावाचा प्राणी आहे तोवर 'भ्रष्टाचार' ही गोष्ट समूळ नष्ट होणं केवळ अशक्य आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन या इतकीच भ्रष्टाचार ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. माझ्या या विधानावर तीच माणसे हसतील ज्या माणसांनी भ्रष्टाचाराची व्याख्या सोयीस्कररित्या 'भ्रष्टाचार म्हणजे पैशांचा गैरव्यवहार' अशी केली आहे. अगदी जेमतेम मराठी कळणारा कुठलाही माणूस सांगू शकेल की भ्रष्टाचार म्हणजे 'भ्रष्ट-आचार'. मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल किंवा अगदी वैयक्तिक पातळीवर असेल. मग प्रश्न उरतो की एखादा आचार हा भ्रष्ट आहे की नाही हे ठरवायचं कोणी आणि कसं ?
... सांगतो.

प्रत्येक माणसाचा एक 'आतला आवाज' असतो. इंग्रजीत त्याला 'conscience' असं म्हणतात. आपल्या ‘मनाच्या’ आत जे आवाज उमटत असतात त्याला Self-Talk म्हणतात. त्याच्या पलीकडे, खूप खोल, हा 'आतला आवाज' असतो. नीट विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जसजसे आपण मोठे होत गेलो, शाळा कॉलेजात जाऊन शिकत गेलो तसतसा हा ‘आतला आवाज’ खूप क्षीण होत गेला आणि आपल्या मनाचा आवाज मोठा होत गेला. तुम्ही जर आतल्या आवाजाचा कौल घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमीच objective असतो. या उलट आपलं मन नेहमी rationalize ('rational -lies' ! ) करत असतं. गोड खायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यावर (किंवा तुम्ही स्वतः तसं ठरवल्यावर) जेव्हा पार्टीत गुलाबजाम दिसतात तेव्हा काय होतं ते आठवून पहा. ‘गुलाबजाम खाऊ नकोस !’ असं आपला 'आतला आवाज' ओरडून ओरडून सांगत असतो. मग हळूहळू आपण मनाच्या आवाजाचा volume वाढवू लागतो. गुलाबजाम मला किती आवडतात, एक गुलाबजाम खाऊन काय फरक पडतो, उद्या कोणी पाहिलाय ? वगैरे गोष्टींचं स्वतःलाच rationalization देऊन आपण एकदाचा तो गुलाबजाम खातो. हाच भ्रष्टाचार ! एका वाक्यात सांगायचं म्हणजे आपल्या ‘आतल्या आवाजाशी’ आपण केलेली प्रतारणा म्हणजे भ्रष्टाचार ! It needs tremendous courage and solid character to listen to your inner voice and follow it.

एकदा का भ्रष्टाचाराची व्याख्या इतकी रुंद झाली की मग आपल्या लक्षात येतं की 'राजकारणी मंडळी भ्रष्टाचारी आहेत' असं म्हणण्याचा अधिकारच आपण गमावून बसतो. 'मेरा नेता चोर है' असं लिहिलेली पोस्टर्स हातात घेऊन मोर्चे काढणं मग हास्यास्पद होऊन बसतं. आपल्या भोवताली जी काही परिस्थिती आहे ते आपलंच प्रतिबिंब आहे. आपण सगळेच थोडे थोडे 'भ्रष्ट' आहोत म्हणून आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, ही यंत्रणा भ्रष्ट आहे. समजा, तुमच्या नाकाला डाग लागला. आरशात बघताना तुमचं नाक पुसाल, की आरशात दिसणारं नाक पुसाल ? आरशाची analogy जर इथे लावायची झाली तर आपलं प्रतिबिंब - म्हणजे आपले लोकप्रतिनिधी - सुधारायचे की स्वतःला सुधारायचं हे आपणच ठरवायचं आहे. अर्थात आपल्या लोकप्रतिनिधींना सुधारण्यापेक्षा स्वतःला सुधारणं खूप सोपं आहे, ही गोष्टच खूप आशादायी आहे ! 'आपण पांढरे स्वच्छ आणि सरकार भ्रष्टाचारी' असा आपला जो एकंदरीत आव असतो त्यात आपण 'सरकार' या यंत्रणेपासून तुटल्याची ती खूप मोठी खुण असते, जे धोकादायक असतं. खरं तर लोकशाहीत 'सरकार' म्हणजे आपणच असतो. परंतु आपल्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यावर लादण्यासाठी आपल्याला 'परमेश्वराप्रमाणे' सरकारची गरज भासते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायचा असेल तर तो प्रत्येक माणसाला आधी स्वतःशी आणि मग इतरांशी द्यावा लागेल. सिग्नल तोडायचा नाही असं एकदा ठरवलं की मग मोकळ्या रस्त्यावर आणि पोलीस नसताना सिग्नल न तोडणं ही आपली आपल्याशीच लढाई होऊ शकेल. मागची माणसं जोर जोरात हॉर्न वाजवतील. हा कसोटीचा क्षण असेल. कारण या अन्यायाविरुध्द आवाज उठवायला तिथे अण्णा हजारे नसतील, तुम्हाला पाठिंबा द्यायला तिथे आमीर खान नसेल. तुमचे फोटो घ्यायला कोणी रिपोर्टर नसेल. तुम्ही सिग्नल तोडला नाहीत याची बातमी उद्या पेपरमध्ये येणार नसेल. At the end of the day, कायद्याची अंमलबजावणी करून तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहिलात याचं जे समाधान असेल ते महत्वाचं असेल ! (‘किती समाधानी वाटलं’ हे विचारायला तिथे पत्रकार नसतील हेही लक्षात असू दे ! ) या देशातल्या प्रत्येक माणसाने लढलेला भ्रष्टाचाराविरुद्धचा हा एकाकी लढाच सर्वात परिणामकारक असेल. हे सगळं एका रात्रीत होईल इतका भाबडा आशावाद माझ्याकडे नक्कीच नाही. पण एक नक्की की, उद्याच्या पिढीसाठी हा अख्खा देश नव्याने बांधावा लागणार आहे. आपले हे कर्तव्य आणि स्वप्न असू दे की ती पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा त्यांना सिग्नल न तोडणे, रस्त्यावर न थुंकणे, लाच न देणे, रांगेचा आदर करणे, वेळ पाळणे या गोष्टी ‘चांगल्या सवयी’ वाटणार नाहीत तर श्वास घ्यावा इतक्या सहज आणि नैसर्गिक वाटतील.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी माझ्या मित्रांबरोबर अण्णा हजारेंच्या गावाला (राळेगणसिद्धी) गेलो होतो. अण्णांच्या प्रेरणेने त्या गावाचा झालेला कायापालट पहात होतो. समोरून अण्णा चालत येताना दिसले. आम्ही शिस्तीत उभे राहिलो. त्या दिवशी खरं तर अण्णांचं मौनव्रत होतं. पण अण्णांपुढे आमचीच बोलती बंद झाली होती. त्यांच्या कर्तुत्वाचा म्हणा वा साधेपणाचा म्हणा, एक aura आम्ही अनुभवत होतो. आमच्या खिशात पैसे होते, क्रेडीट कार्ड्स होती. पण स्वतःच्या नावावर एकही मालमत्ता नसलेल्या अण्णांसमोर आम्हाला त्या दिवशी प्रचंड ‘गरीब’ असल्यासारखं वाटलं होतं ! मला त्यादिवशी खूप वाटलं होतं की अण्णांनी आपलं मौन काही वेळासाठी मोडावं आणि आमच्याशी दोन शब्द बोलावं. पण अण्णांनी आपला निश्चय मोडला नाही. काही क्षण तिथे थांबून, हाताच्या खुणांनी आमची विचारपूस करून ते तिथून निघून गेले. एकही शब्द न बोलता आम्ही दोघांनी काही क्षण का होईना, एकमेकांशी 'संवाद' साधला होता. मी तो दिवस विसरू शकत नाही.
गंमत अशी आहे की, इतक्या वर्षांनंतर, नियतीने नेमका तोच प्रसंग आज काळाच्या पडद्यावर पुन्हा एकदा उभा केला आहे.
अण्णा तसेच समोरून चालत येत आहेत. फक्त आज आम्हा मित्रांच्या जागी अण्णांचे विरोधक आणि अजस्त्र मिडिया उभी आहे.
ही सर्व मंडळी टपून बसली आहेत की अण्णांनी मौन न धरता खूप खूप बोलावं. पण माझी इच्छा आहे की, 'त्या' दिवसासारखंच अण्णांनी आपलं 'मौन' कायम ठेवावं आणि मंडळींना उपचारापुरता एक नमस्कार करून आपल्या कामाला निघून जावं.

आदरणीय अण्णा,
एका नव्या भारताचं 'भूमिपूजन' नुकतं कुठे पार पडलंय. पण सेलिब्रेशनची ‘ही’ वेळ नाही.
अजून बरीच कामं उरकायची आहेत.
तुम्हालाही... आणि आम्हालाही !

Thursday, April 7, 2011

काहीतरी नविन ! ७ एप्रिल

If A is success in life, then A equals X plus Y plus Z.
Work is X; Y is play; and Z is keeping your mouth shut.
- Albert Einstein


एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही
तब्बल बावीस वर्ष, अख्खं जग त्याच्यामागे पागल होऊन राहतं..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण एका खेळामागे 'पागल' होऊन
स्वतःच्या आयुष्याची तीन दशके समर्पित करणं - यात त्याचं यश असावं !


तो शतक ठोकतो -
अख्खा देश त्याची पाठ थोपटतो
त्याचं शतक हुकतं -
अख्खा देश आपलं काम-धाम बाजूला ठेवून त्यावर चर्चा करतो
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण यशातही त्याचा ‘कान धरणारी’ आणि अपयशात त्याच्या पाठीशी उभी राहणारी
माणसं त्याच्या आयुष्यात आहेत - यात त्याचं यश असावं !


त्याच्या सोनेरी कारकीर्दीचा त्यालाच नाही
तर संपूर्ण देशाला अभिमान वाटतो
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या यशाला, कर्तुत्वाला गालबोट लागेल
अशी एकही कृती त्याच्या हातून घडत नाही - यात त्याचं यश असावं !


इतकी लोकमान्यता, इतके मानसन्मान, इतका पैसा
आता तर ‘विश्वचषक’...
... हे सगळं वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी !
इतक्या मुदलावर फक्त तोच काय, त्याच्या पुढच्या सात पिढ्या सुखात लोळू शकतील
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण कुठलेही मोहपाश त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत - यात त्याचं यश असावं !


त्याच्यावर स्तुतिसुमने उधळायला शब्द अपुरे पडतात
त्याच्या धावा मोजता मोजता आकडेही दमून जातात
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
...माहित नाही !
पण स्वतःच्या 'भरपूर' किंवा 'कमी' धावांवरून तो त्याचं यश किंवा अपयश ठरवत नाही...
‘कमी परिश्रम’ हे त्याला त्याचं अपयश वाटतं..
कारकीर्दीच्या या टप्प्यावर ‘असं वाटणं’ - यातंच त्याचं यश असावं !


क्रिकेट समजणारे- न समजणारे, क्रिकेट खेळणारे-न खेळणारे
त्याला 'क्रिकेटचा देव' मानतात..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.
पण आकाशातलं 'देवपण' मिळून देखील
त्याची ‘मुळे’ जमिनीत खोल-खोल जाऊन आणखीनच घट्ट होत आहेत - यातंच त्याचं यश असावं !


इतकं यश, इतकं यश
की त्या यशाचं मोजमाप करणंही शक्य नाही..
यश यश म्हणतात ते हेच असेल का ?
....माहित नाही.

पण एक गोष्ट नक्की.
... ‘त्या’ रात्री त्याच्या हातात विश्वचषक पाहून
‘त्याचा’ आनंद 'आपल्या' डोळ्यातून पाझरला...
यात त्याचं यश असेलच,
पण एक 'माणूस' म्हणून ‘आपलं’ देखील यश असावं !

Thursday, March 31, 2011

काहीतरी नविन - ३१ मार्च

Don't simply retire from something; have something to retire to.
- Harry Emerson Fosdick



कारखानीस बाई ऑफिसमधील आपल्या टेबलाशी आल्या आणि खुर्चीत बसल्या. सवयीप्रमाणे त्यांनी आपली पर्स टेबलाच्या उजव्या बाजूला ठेवली. सवयीप्रमाणे त्यांनी पाण्याने भरून ठेवलेला ग्लास उचलला आणि कोरडा झालेला आपला घसा ओला केला. सवयीप्रमाणे त्यांनी टेबलावर ठेवलेल्या गणपतीच्या फ्रेमला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि क्षणभरासाठी डोळे बंद केले. सवयीप्रमाणे त्यांनी डोळे उघडले. सवयीप्रमाणे त्यांनी टेबलाच्या वरच्या खणात ठेवलेली 'आजची कामं' लिहायची डायरी बाहेर काढली. सवयीप्रमाणे त्यांनी आजची तारीख उघडली - '३१ मार्च'. त्यांचा हात तिथेच थबकला आणि किंचित थरथरलाही. त्याच थरथरत्या हातांनी डायरीच्या 'आजच्या पानावर' त्यांनी मोठ्या अक्षरात लिहिलं – Farewell to Mrs. Urmila Karkhanis at 4 pm !

ऑफिसमधली मिटिंग रूम पावणेचार वाजल्यापासूनच भरून गेली होती. माणसं घोळके घोळके करून उभी होती. त्यात कारखानीस बाईंबरोबर काम केलेली माणसं फारच थोडी. तरुण पोरं पोरी चिक्कार. फेअरवेलच्या निमित्ताने लोकांना अधिकृत ब्रेक मिळाला होता. त्यामुळे सगळेच जरा सैल झाले होते. चहाच्या कपात बिस्किटे बुडवत गप्पांना उधाण आले होते. कालची भारत-पाकिस्तान मॅच, नेल पॉलिशच्या शेड्स,मनमोहन सिंग, फेसबुक, बॉसला शिव्या, मुलांचे शाळेतले प्रोजेक्ट्स, लिंकिंग रोड वरच्या स्वस्त चपला, क्रीम बिस्किटे पोटाला वाईट वगैरे चौफेर गप्पा चालू होत्या.
अचानक चोर आवाजात कोणीतरी म्हणालं, 'मॅडम आल्या, मॅडम आल्या...' सर्वांनी दरवाज्याकडे पाहिलं.
एकच शांतता पसरली आणि त्याच शांततेला छेदत टाळ्यांचा कडकडाट झाला.
कारखानीस बाईंचे बॉस साठे कारखानीस बाईंना घेऊन आत आले होते. त्यांनी बाईंना खुर्चीवर बसायची विनंती केली.
मग आधी साठयांनी बसायचं की कारखानीस बाईंनी यात दहा बारा सेकंद गेली.
'मॅडम, आज तुमचा मान'. कारखानीस बाईंपेक्षा दहा वर्ष लहान असलेल्या साठयांनी हे वाक्य म्हणताच साठयांचे काही 'खास लोक' उगाचच मोठ्यांदा हसले.ठेवणीतली पैठणी नेसून आलेल्या कारखानीस बाई अवघडून खुर्चीवर बसल्या. बाईंना इतकी गर्दी कदाचित अपेक्षित नसावी.
कारखानीस बाईंशी जी आजवर दहा मिनिटाहून जास्त बोलली नसेल त्या एच.आर.च्या सुलक्षणाने मधाळ इंग्रजी भाषेत प्रास्ताविक केलं. इंटरनेटवर मिळणाऱ्या रेडीमेड 'फेअरवेल पोएम्स'मध्ये व्यक्तीच्या नावाच्या जागी तिने 'मृदुला' शब्द पेरताच कारखानीस बाईंसकट सगळेजण 'उर्मिला, उर्मिला' असे ओरडले. सुलक्षणाने मग उरलेली कविता 'मृदुला -उर्मिला' च्या गोंधळात एकदाची पार पाडली. त्यानंतर पुढे आल्या कारखानीस बाईंच्या लंच ग्रुप मधल्या शेजवलकर बाई. प्रसंगानुरूप गाणी म्हणायची यांना कोण हौस. 'निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता' हे गाणं त्यांनी या 'उर्मिलेसाठी' का म्हटलं याचा उलगडा अनेक ज्येष्ठ मंडळींना झाला नाही. 'गीत रामायण' हा कारखानीस बाईंचा weak point असल्यामुळे त्या तल्लीन होऊन ऐकत होत्या, मधे मधे स्वतःही गुणगुणत होत्या. उरलेली तरुण मंडळी मात्र कंबोडिया देशाचं लोकगीत ऐकावं या उत्साहात ते गाणं ऐकत होती.
(एकदाचं) गाणं संपलं.
'Anybody? who wants to say few words about Karkhanis Madam ?' सुलक्षणाने लोकांकडे बघत विचारले.
माणसं स्वतःच्या मृत्यूपेक्षा लोकांसमोर उभं राहून बोलायला घाबरतात. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. सुलक्षणाची नजर चुकवून माणसं इकडे तिकडे, वर-खाली पाहू लागले.
मघाशी जागा न मिळाल्यामुळे मागे उभे असलेले लोक आता स्वतःला लकी समजू लागले.
शेवटी 'हो-नाही' करत दोन तीन लोक कारखानीस बाईंविषयी बोलले. ज्या गोष्टींविषयी कारखानीस बाईंची त्यांच्या मागे टिंगल केली जात असे त्याच गोष्टींचं आज कौतुक चालू होतं. कुणी त्यांच्या कामाविषयी बोललं, कुणी मनमिळावू स्वभावाविषयी, तर कुणी त्यांच्या डब्यातल्या आंब्याच्या लोणच्याविषयी!
त्यानंतर भिडे सर उभे राहिले. बाईंविषयी भरभरून बोलले. 'नोकरी चालू असताना हे शब्द कानावर पडले असते तर काम करायचा उत्साह आणखी वाढला असता' वगैरे वाक्य बाईंच्या मनात येत असावी असं बाईंचा चेहरा सांगत होता. भिडे सर बहुदा भाषणाची तयारी करून आले होते. भाषणात ठिकठिकाणी पेरलेल्या कवितांच्या ओळींनी,शायरीने उपस्थितांच्या टाळ्या कमावल्या. भाषण संपताना त्यांनी सुलाक्षणाला
केक आणायची विनंती केली. बाईंनी केक कापला. टाळ्या वाजल्या. सुलक्षणाने पुढे होऊन केकचं क्रीम बाईंच्या गालाला लावलं तसे सगळे हसले. बाई लाजल्या. सुलक्षणाने आता बाईंना चार शब्द बोलायची विनंती केली.
टाळ्यांच्या कडकडाटात बाई 'चार शब्द' बोलण्यासाठी उभ्या राहिल्या.
बाईंनी घसा खाकरला आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली.
'श्री भिडे साहेब आणि ऑफिसमधले माझे सगळे सहकारी मित्र मैत्रिणी.....'
बाईंनी एक छोटा पॉज घेतला आणि शांतता अधिकच हळवी झाली.
बाई पुढे बोलू लागल्या, 'तुमची सगळ्यांची हरकत नसेल तर आज मी मराठीतून बोलणार आहे. तोडकं मोडकं हिंदी-इंग्रजी मधून बोलण्यापेक्षा मला माझ्या भावना मराठीतून व्यक्त करायला आवडतील. अडतीस वर्षांपूर्वी मी या कंपनीत एक ट्रेनी म्हणून जॉईन झाले. तेव्हा ही कंपनी खूप लहान होती. आता सारखे computers, emails, internet वगैरे त्या काळी नव्हते. सगळे व्यवहार कागदावर चालत. तुमच्या देशपांडे सरांना विचारा, आम्ही सगळे मिळून उत्सव- सण उत्साहात साजरे करत होतो. माणसं साधी होती. दिवसभर भांडून चार वाजता चहा प्यायला एकत्र जमायची. हळूहळू कंपनी मोठी होत गेली. कामाच्या वेगाला महत्व आलं. काम करायच्या पद्धतीत बदल होत गेले. बदलाला विरोध करणारी आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं मागे पडू लागली. खूप उशिरा लक्षात आलं की बदलाला विरोध करण्यात जितकी एनर्जी खर्च केली त्याहून आणखी थोडी एनर्जी बदल स्वीकारण्यात खर्च केली असती तर अधिक भलं झालं असतं. पण तसं सहसा होत नसतं. जुने विचार आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याचा आकस यांना 'अहंकार' नावाचा रबरबॅण्ड घट्ट बांधून ठेवतो. असो. मला आनंद आहे की आम्ही केलेल्या चुका तुम्ही तरुण मुलं करत नाही. तुम्हा तरुण मुलांना बदलाचं आकर्षण आहे आणि वेगाचंही. परंतु या वेगात आपण किती वहावत जायचं याचं भान असू द्या. कुटुंबाला वेळ द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. या कंपनीने आणि त्यामधील माणसांनी मला आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. त्याचं मोल माझ्या रिटायरमेंट फंडापेक्षा खूप पटीने जास्त आहे.' बाईंचा कंठ दाटून आला.
वातावरण हलकं व्हावं या उद्देशाने भिडे साहेबांनी पटकन विचारलं, ' मॅडम, रिटायर झाल्यावर कंटाळा नाही येणार ?'
कारखानीस बाई हसून म्हणाल्या, 'साहेब, बाई कधी रिटायर्ड होते का ?' सगळ्यांच्या हळू हसण्याचा आवाज आला.
बाई म्हणाल्या, 'जोक्स अपार्ट. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगते. माझ्या वडिलांनी सांगितलेली. कदाचित या गोष्टीत साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एक राज्य असतं. त्या राज्याचा एक नियम असतो. कुठलाही राजा पाच वर्षाहून जास्त काळ राज्य करू शकत नसतो. त्या राज्याचा आणखी एक विचित्र नियम असतो. पायउतार झालेल्या राजाला एका होडीतून घेऊन जाण्यात येत असतं. नदीच्या त्या काठावर एक घनदाट जंगल असतं. त्यात जंगली प्राणी देखील राहत असतात. अशा जंगलात त्या राजाला सोडून देण्यात येत असतं. एकदा अशाच एक राजाची पाच वर्षाने मुदत संपते. नियमाप्रमाणे तो 'त्या' होडीत बसतो. होडी नदीच्या मध्यभागी येते तरी तो निवृत्त राजा शांत बसून असतो. होडीचा नाविक अस्वस्थ होतो. तो हळूच राजाला म्हणतो, महाराज माफ करा. मी आत्तापर्यंत इतक्या राजांना या होडीतून समोरच्या जंगलात सोडलेलं आहे. प्रत्येक राजा होडीत बसल्यावर किती घाबरलेला असायचा ! तुम्हाला त्या जंगलाची जराही भीती वाटत नाही?' तो निवृत्त राजा शांतपणे म्हणाला, 'मी ज्या दिवशी या राज्याचा पदभार सांभाळला त्या दिवशीच मला हा 'जंगलाचा नियम' सांगण्यात आला होता. पाच वर्षांनी मला या ठिकाणी जाऊन राहायचं आहे यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली होती. नुसतीच मनाची तयारी नाही तर माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत मी त्या जंगलाचे रुपांतर एका सुंदर नगरीत केले आहे. आणि म्हणूनच मला आता तिथे राहायची भीती वाटत नाही उलट आनंद होतो आहे !’.......... माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट माझ्या मनावर इतकी कोरली गेली की त्या दिवसापासून निवृत्तीनंतरच्या त्या भयावह जंगलाचे सुंदर नगरीत रुपांतर करण्यास मी सुरुवात केली. माणसं जोडून, छंद जोपासून ! त्यामुळेच असेल कदाचित, सुदैवाने, उद्यापासून घरी बसून काय करायचं हा प्रश्न मला पडलेला नाही. माझ्या घरच्यांना आणि इतरांना माझा उपयोग होऊ शकेल अशी बरीच कामे माझ्या लिस्टमध्ये आहेत !'.............................

टाळ्यांचा कडकडाट कानात साठवत आणि हातात बुके, भेटवस्तू घेऊन कारखानीस बाई आपल्या टेबलाशी आल्या. आपल्या टेबलावरून-खुर्चीवरून त्यांनी मायेने हात फिरवला. आपल्या 'जागेला' नमस्कार करून त्या निघाल्या. ऑफिसच्या लोकांनी कारखानीस बाईंना घरी सोडण्यासाठी आज 'एसी-टॅक्सी' बुक केली होती. टॅक्सीजवळ सोडायला आलेल्या सगळ्यांचा निरोप घेत बाई टॅक्सीमध्ये बसल्या. टॅक्सी पुढे निघाली तशी बाईंनी मागे वळून आपल्या ऑफिसच्या इमारतीकडे पाहिलं. पण तिथे इमारत नव्हतीच...........
.....कशी असेल ? कारखानीस बाईंच्या डोळ्यात ती अख्खी इमारत बुडून गेली होती !

Thursday, March 24, 2011

काहीतरी नविन - २४ मार्च

He is the Richest whose pleasures come cheapest.
-Unknown


Chin Shengt’an नावाचे एक चीनी विद्वान अतिवृष्टीमुळे त्यांच्या मित्राबरोबर एका देवळात दहा दिवस अडकून पडले होते. नुसतंच बसलोय तर करायचं काय ? लेखक महाशयांनी त्यांच्या 'सुखांची' एक यादी बनवली. Chin's 33 Happy Moments या नावाने ती प्रसिध्द आहे. सुखांची ती यादी नुकतीच वाचनात आली. विचार केला, आपण पावसामुळे अडकून पडण्याची वाट कशाला पहायची ? चीनच्या 'चीन' साहेबांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची यादी बनवायची ठरवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, बराच वेळ काहीच सुचेना. मग ठरवलं, जसं आठवेल तसं लिहून ठेवायचं. चार पाच दिवसांच्या या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली. तिखट-गोड भेळ खाताना मधेच कैरीची फोड दातात यावी आणि जिभेवरचा सगळा 'समा' बदलून जावा तसंच सुखाचं असावं. सुख 'शोधत' बसलो तर हाताला लागत नाही. खिशात एक छोटा कागद ठेवू लागलो. जगता जगता जिथे 'कैरी' लागली ते प्रसंग टिपून ठेवले, काही अनुभवलेले प्रसंग आठवून लिहिले. त्यातील काही निवडक शेअर करतोय...

• घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो.

• डावीकडे....थोडं वर...इतकं वर नाही गं...थोsssडं खाली...हा, बरोबर. तिथेच...! माझा हात पोचू न शकणारी, माझ्या पाठीवरची 'खाज सुटणारी' जागा बायकोला बरोब्बर सापडते. समाधी लागल्यासारखे माझे डोळे आपसूक बंद होतात.

• मी आणि माझा शाळेतला वर्गमित्र खूप वर्षांनी शाळेजवळ भेटतो. मित्राला सिगरेट ओढायची लहर येते. आम्ही शाळेजवळच्या एका दुकानात जातो. आमच्या वेळचा दुकानदार आता नसतो. मी सहज विचारतो, 'अजूनही तो पिशवीतला पेप्सी-कोला मिळतो का?.... मिळतो ? मग एक ऑरेंज, एक कालाखट्टा द्या...दुकानदार फ्रीज उघडतो. फ्रीजमध्ये पेप्सी कोलाचे जितके नग असतात ते सगळे विकत घेण्याइतके पैसे पाकिटात असतात. मला शाळेचे दिवस आठवतात. पेप्सी कोलासाठी खिशात जपून ठेवलेलं पन्नास पैशाचं नाणं आठवतं. मी खिशातल्या पाकिटातून एक नोट काढतो. दुकानदार म्हणतो, सुट्टे पैसे द्या. मी पाकिटाची चेन उघडतो आणि सुट्टे पैसे देतो. मी दाताने पेप्सी-कोलाची पिशवी फोडतो तशी ऑरेंज सरबताची एक चिळकांडी मित्राच्या शर्ट वर उडते. मी सॉरी म्हणतो. मित्र म्हणतो, सुधारणार नाहीस साल्या ! तिशी पार केलेले आम्ही दोन टोणगे पेप्सी-कोला खात खात दुकानातून बाहेर पडतो.

• रस्त्यात एक माणूस दिसतो. कुठे तरी पाहिलंय याला...पण जाम आठवत नाही..दातात पेरूची बी अडकावी, ती बराच वेळ निघू नये आणि त्याहून कहर म्हणजे आपली जीभ सारखी-सारखी दाढेच्या त्याच फटीकडे जात रहावी तसा या माणसाचा चेहरा दिवसभर छळत राहतो. चार दिवसांनी, काहीही संदर्भ नसताना, त्या चेहऱ्याचा धनी अचानक आठवतो. ऑफिसातला एक कलीग विचारतो, 'काय रे आज खूष दिसतोयस.' मी म्हणतो, 'नाही, काही विशेष नाही.' मी चक्क खोटं बोलतो.

• दोन दिवसांची ऑफिस टूर आटपून मी संध्याकाळी घरी येतो. घरी शुकशुकाट. वॉचमन सांगतो की सगळे शेजारच्या बागेत गेलेत. मी बागेशी जातो. माझा अडीच वर्षांचा मुलगा घसरगुंडीवर खेळताना दिसतो. मी त्या दिशेने चालत जातो. माझ्या मुलाचं माझ्याकडे लक्ष जातं. बाबाssssssssss ! असं तिथूनच ओरडून तो माझ्या दिशेने धावत सुटतो आणि माझ्या पायाला घट्ट मिठी मारतो. बागेतले सगळे माझ्याकडे बघायला लागतात. मी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करतो. मुलाचं बोट धरून घसरगुंडीशी जातो. 'डॅडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेरला जितका आनंद झाला असेल त्याच्या दहा पट आनंद मला आत्ता होत असतो.

• बायकोच्या साडीला मॅचिंग ब्लाउज घेण्यासाठी मी बायको बरोबर 'मॅचिंग सेंटर' मध्ये जातो. आज नशीब माझ्या बाजूने असतं. बायकोला हवी असलेली हिरव्या रंगाची शेड ‘फक्त’ चौतीस मिनिटात सापडते.

• एक पावसाळी रविवार सकाळ. आई म्हणते, 'जेवण झाल्यावर ठाण्याला जायचंय. अमुक तमुकच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी आहे.' बाहेर टोम पाऊस पडत असतो. आमची जेवणं होतात. जड अंगाने (आणि जड अंतःकरणाने) मी पार्टीला घालायचे कपडे बाहेर काढतो. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो. ठाण्याहून फोन असतो. पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला असतो. मनात नाचणाऱ्या आनंदाच्या कारंजाचे पाणी बाहेर जराही न सांडता मी इस्त्री केलेले कपडे निमुटपणे कपाटात ठेवतो. खिडक्यांचे पडदे लावून घेतो. खोलीत अंधार होतो. पंखा मध्यम गतीने चालेल असा ठेवतो. अंगावर पांघरूण घेतो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज कानात साठवून घेतो. भीमसेनजींचा 'रामकली' लावतो. पंडितजी पहिला 'सा' लावतात आणि अंगावर काटा येतो. रविवार दुपार, पावसाळी काळोख, डोक्याखाली उशी, डोक्यावर पंखा, अंगावर पांघरूण, झाडाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज, पंडितजींचा रामकली, आणि जडावून मिटत जाणारे डोळे हे सगळं एक तरफ और बाकी दुनिया एक तरफ..!

• मी काहीतरी लिहायला बसतो. सुचत नाही तेव्हा बराच वेळ खिडकी बाहेर बघत बसतो. काहीतरी सुचतं, पण ते लिहिल्यावर इतकं ग्रेट नाही असं वाटतं. मी लिहिलेलं खोडून टाकतो. बायको बाहेर येण्याबद्दल विचारते. मी नाही सांगतो. ती मुलाला घेऊन बाहेर जाते. वाटतं, आता एकटाच आहे - मस्त लिहित बसेन. काहीतरी खर्डेघाशी करतो पण मजा येत नसते. कोऱ्या कागदांकडे मी बराच वेळ नुसताच पाहत राहतो. बेल वाजते. 'खूप बोलणारे' बिल्डींग मधले एक काका दरवाजात उभे. मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून 'या' म्हणतो. ते खरोखरीच आत येतात. ते बोलू लागतात. आणि अचानक कुठल्यातरी संदर्भावरून मला लिखाणाला विषय मिळतो. काका रंगात येऊन भ्रष्टाचार, वर्ल्ड कप वगैरे वर बोलत असतात, पण माझं त्याकडे लक्षच नसतं. माझ्या डोक्यात लेखाची मांडणी सुरु होते. सुरुवात अशी करूया.. नको अशी करूया... म्हणता म्हणता सगळा लेख डोक्यात तयार होतो. आता फक्त जाऊन कागदावर उतरवायचा बाकी असतो. तासभर बोलून झाल्यावर काका उठतात आणि जाऊ लागतात. चपला घालता घालता मी काहीतरी बोलेन या अपेक्षेने माझ्याकडे बघतात. माझ्या नकळत मी patkanबोलून जातो - 'बरं झालं काका, आलात ते !’

• मंगळवार. सकाळचे दहा वाजलेले. चर्चगेटचा गजबजलेला अंडरग्राउंड सबवे. भोवताली माणसांचा समुद्र. फेरीवाले-भिकारी यांच्या मधून वाट काढत मी चालत असतो. अंगातून घामाच्या धारा. एका दुकानात लावलेल्या रेडियो मधून काहीतरी कानावर पडतं - वक़्त ने किया, क्या हसीं सितम | तुम रहे न तुम, हम रहे न हम....
कैफ़ी आज़मीचे शब्द, सचिनदेव बर्मनची चाल आणि गीता दत्तचा स्वर मला कैद करतात. मी जागच्या जागीच थिजून जातो. एका जागी स्वस्थ उभा राहून मी ते अख्खं गाणं ऐकतो. स्वतःला या 'क्षुद्र' जगात परत आणतो आणि माझ्या कामाला निघतो.
‘जायेंगे कहाँ, सुझता नहीं | चल पडे मगर, रास्ता नहीं | क्या तलाश है, कुछ पता नहीं !’......
...या ओळींसाठी चर्चगेट स्टेशनपेक्षा अधिक योग्य जागा आणखी कुठली असू शकेल ?

मी माझ्या 'सुखांच्या यादीवरून' पुन्हा एकदा नजर फिरवतो. सुखाचे हे सगळे अनुभव त्या त्या वेळी उपभोगुन एकही अनुभव आत्ता, या क्षणी माझ्या मुठीत नसतो. मग नक्की खरं काय? सुखाचा 'तो' अनुभव ? की त्या सुखाची नुसती 'आठवण' ?... मी विचार करत असतानाच माझा मुलगा अमृत माझ्याजवळ येतो. 'बाबा, चल, घोडा-घोडा खेळूया.' मी कागद पेन बाजूला ठेवून निमूटपणे अमृत बरोबर चालू लागतो. मी घोडयासारखा ओणवा बसतो. अमृत माझ्या ओणव्या पाठीवर बसतो. मी जरा हललो की अमृत खिदळत राहतो. मी मागे वळून अमृतचा खिदळणारा चेहरा बघतो. अमृतच्या हास्यात मला माझं ‘आणखी एक’ सुख गवसतं आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही !

Thursday, March 17, 2011

काहीतरी नविन - १७ मार्च २०११

Death is not the greatest loss in life.
The greatest loss is what dies inside us while we live.

- Norman Cousins



|| श्री ||

१७ मार्च २०११

प्रिय तात्या,
स.न.वि.वि.
तू रत्नागिरीस सुखरूप पोचल्याचे कळले.
तू इथे असताना सात-आठ दिवस कसे गेले ते कळले सुद्धा नाही. तू घरी नसल्यामुळे तुझी नात (नाव विसरलो ! ) आणि वहिनीचा 'गजरा' अगदीच सुकून गेले असतील !
असो. खूप वर्षांनी भेटलो. निवांत गप्पा झाल्या. कित्ती वर्षांनी जुन्या आठवणी निघाल्या. आपल्या गावाच्या, शाळेच्या, मित्रांच्या (आणि न झालेल्या मैत्रिणींच्या) आठवणी येत राहिल्या आणि गप्पांसाठी आठ दिवसही कमी पडले असे वाटू लागले. तू सुद्धा किती वर्षांनी मुंबईस आलास ! तुला मुंबईचे कौतुक वाटणे सहाजिक आहे. पण मला विचारशील तर,
एक छोटी बरणी झुरळांनी भरून त्यात आणखी झुरळे भरत राहण्याचा 'अट्टाहास' म्हणजे मुंबई !
इथे माणसं उतू जात आहेत पण जिव्हाळा आटलाय. सुखाचा सुकाळ पण समाधानाचा दुष्काळ आहे.
तुमच्या रत्नागिरीच्या पेपरात बातमी आली होती का माहित नाही. मागच्या आठवड्यात मुंबईत एका सुशिक्षित मुलीने आपल्या दोन पिल्लांसह आत्महत्या केली. मुलगी चांगली सीए होती.
मुलांना शाळेचे कपडे घालून लिफ्टने वरच्या मजल्यावर घेऊन गेली. आधी मुलांना खाली टाकून दिलं आणि मग स्वतः... ! मृत्यूचे तांडव तेवढ्यावर थांबले नाही. जपान मध्ये भूकंप-सुनामी येऊन दहा हजाराच्या वर माणसं मेली. आयुष्यात मृत्यू खूप पाहिले, खूप ऐकले. पण आता वय वाढलं आणि मृत्यूचे आघात पचवायची ताकदच हरवून बसलोय बघ. तरी बरं, आपण आता अशा जगात राहतो की आता माणसाला कुठल्या गोष्टीत रेंगाळायला वेळ नाही. म्हणजे असं की, शुक्रवारी जपानमध्ये भूकंप-सुनामीचा प्रकार झाला. टीव्ही वर तिथली दृश्य बघून आम्ही हळहळलो.
सकाळी पेपर वाचून पुन्हा हळहळलो. दुपारी भारत-दक्षिण आफ्रिका मॅच सुरु झाली. जपान-भूकंप-सुनामी...आम्ही सगळं विसरलो. शेवटच्या ओव्हरपर्यंत नखं कुरतडत मॅच पाहिली. भारताचा पराभव झाला. आम्ही भारताच्या संघासाठी हळहळलो.
सगळं काही क्षणिक ! आमचे आनंद, आमची दुःख, आमचे स्वाभिमान, आमचे अपमान - सगळं क्षणिक !
आपले इंग्रजीचे पटवर्धन मास्तर सांगायचे आठवतंय ? 'This too shall pass!' या वाक्याचा अर्थ यापूर्वी इतका नीट समजला नव्हता ! अर्थात यात आमचं तत्वज्ञान कमी, आणि ‘सोय’ जास्त ही गोष्ट वेगळी ! Good is not good when better is available या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या भावनांची क्रमवारी करतो. माणूस म्हणून ते स्वाभाविक असेलही. पण शहरात राहू लागलं की ते जास्त जाणवतं.
जपान मध्ये सुनामी आली आणि लोक म्हणू लागले - जगबुडी जवळ आली. तात्या मला काय वाटतं सांगू का, निसर्ग अधून-मधून त्याचा खेळ दाखवणारच. आपल्यासाठी तो भूकंप, सुनामी वगैरे. पण निसर्गाच्या अफाट अडगळीत या गोष्टी फारच मामुली आहेत. घरात लहान मुलं मस्ती करू लागली की त्यांचा बाप त्यांच्यावर जसा ओरडतो, तसंच निसर्गाचं आहे. 'रोज सकाळी उठून माझा नाश करताहात. वेळीच सावध व्हा, नाहीतर विनाश अटळ आहे.' हे सांगण्यासाठी निसर्ग अधूनमधून भूकंप-सुनामी वगैरेची भीती घालतो. निसर्गाच्या कालचक्राच्या तुलनेत या सगळ्या नित्याच्या घटना आहेत !
निसर्गाचं हे असं अक्राळ-विक्राळ रूप पाहिलं की आपण माणसं किती कस्पटासमान आहोत याची पुन्हा एकदा जाणीव होते. हीच जाणीव खूप वर्षांपूर्वी हिमालयात गेलो होतो तेव्हा झाली होती. विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपल्या पृथ्वीचं अस्तित्व एका बिंदू एवढं देखील नाही. जो क्षण येऊन गेला तो भूतकाळ, पुढचा क्षण येणार की नाही ते माहित नाही.. तेव्हा आत्ताचा 'क्षण' हेच आपलं खरं आयुष्य. तरी या एका 'क्षणात' आपण राग, मत्सर, द्वेष, अहंकार कोंबतो... 'हे माझं-हे तुझं' करतो, खाद्यपदार्थ ‘फ्रीज’ मध्ये ठेवावेत तसे अबोले, भांडणं वर्षानुवर्षे ताजे ठेवतो. जमा केलेली ही सगळी 'मालमत्ता' फक्त एका क्षणासाठी ! आपण कधीतरी मरणार हे माहित असून सुद्धा जो 'अमर' असल्यासारखा जगत राहतो तो माणूस ! जगबुडी येईल नाही तर काय ! पण मला सांग तात्या, आता आणखी काय जगबुडी यायची बाकी आहे ? आपल्या पोटच्या पोरांचा जीव घेऊन एका सुशिक्षित मुलीवर आत्महत्या करायची वेळ येते, ही जगबुडी नाही का ?.......आत्महत्या केलेले ते तीन मृतदेह स्वीकारण्यास त्या दोन बछड्यांचा बाप नकार देतो ही जगबुडी नाही का ?......... 'अप्पा तुम्ही कशाला एवढा विचार करताय, आपल्या घरात झाल्यात का आत्महत्या ?' असं माझ्या घरचे मला सांगतात - ही जगबुडी नाही का ?......
तात्या तू कदाचित हसशील, पण हल्ली मधून मधून जरा spiritual वाचन करत असतो. त्या वाचनात आलेलं काहीबाही धूसरसं आठवत आहे. निसर्गातील इतर कुठलाही सजीव 'आत्महत्या' करत नाही. 'आत्महत्या' हा माणसाचा 'शोध' आहे.
माणूस निसर्गापासून किती दूर गेला आहे याची 'आत्महत्या' ही शेवटची पायरी ! असो.

मी आता रिकामा असतो, म्हणून असेल. पण लहान लहान गोष्टींवर खूप विचार करत बसतो. लहान लहान
गोष्टी मनाला चटकन लागतात. दिवस कसातरी ढकलतो. पण संध्याकाळ खायला उठते. अशाच एका संध्याकाळी तुला पत्र लिहायला बसलो आहे. पत्र लांबले आहे. थोडेसे गंभीर झाले आहे. पण त्याला इलाज नाही. हा सगळा 'संध्याछायेचा' परिणाम !
तीन वर्षांपूर्वी सुलभा गेली. मुलगा, सूनबाई, नातवंडे माझी चांगली काळजी घेतात हे तू पाहिले आहेसच. पण 'म्हातारपण' कळण्यासाठी त्यांना अजून बराच अवकाश आहे.

आता जीव जाण्याची भीती वाटत नाही....... आपला कुणाला उपयोग नाही याची जाणीव हाच मृत्यू !.... रोज रोज येणारा ! म्हणूनच दर दोन-तीन दिवसांनी कुणाकुणाला पत्र लिहित बसतो आणि त्यांच्या उत्तराची वाट पहात बसतो.

तुझ्याही उत्तराची आणि हापूसच्या पेटीची आतुरतेने वाट पाहतो आहे.

वहिनींना नमस्कार आणि लहानांना आशिर्वाद !

तुझा,
अप्पा
-----xxxx----

Thursday, March 10, 2011

काहीतरी नविन ! - १० मार्च २०११

If you don’t like the way world is, you have an obligation to change it.

- Marian Edelman

परवा माझ्या एका मित्राने त्याच्या ऑफिस मध्ये घडलेली एक गोष्ट सांगितली. कंपनीच्या नेदरलॅण्ड स्थित ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका डच मॅनेजरने त्यांच्या जगभर पसरलेल्या शाखांमध्ये एक इमेल पाठवली.
त्या इमेलचा सारांश असा होता: "सर्वात प्रथम तुमची माफी मागतो. कारण आता मी जे सांगणार आहे त्याचा संबंध ऑफिसच्या कामाशी नाही आणि त्याहीपेक्षा मी तुम्हाला काही क्षणांसाठी गंभीर मूड मध्ये घेऊन जाणार आहे. झालंय असं की, माझ्या ओळखीच्या एका सात वर्षांच्या मुलीला कँसर झाला आहे आणि दहा दिवसांपूर्वी तिची केमोथेरपी सुरु झाली आहे. तिच्या आजोबांनी आणि तिने मिळून त्यांच्या घराच्या भिंतीवर एक जगाचा नकाशा लावला आहे. ती मुलगी काय करते, तिला ज्या ठिकाणाहून पत्र येतं, त्या ठिकाणी - जगाच्या नकाशावर - ती एक छोटा झेंडा लावते. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या देशातून तिला एक पोस्टकार्ड पाठवा...म्हणजे नकाशावर फक्त 'नेदरलॅण्ड' च्या जागेवर झेंड्यांची गर्दी होणार नाही! आपली कंपनी जगभर पसरली आहे म्हणून माझी ही छोटीशी विनंती आहे! "
हे सगळं ऐकल्यावर पाच मिनिटं निपचित बसून राहिलो. डोळ्यासमोर दिसत होतं नेदरलॅण्ड मधलं एक घर...घरातली एक भिंत...भिंतीवर लटकणारा झेंड्यांनी खचाखच भरून गेलेला एक नकाशा...प्रेमाचं हे एवढं मोठं ओझं पेलू न शकणारे एक आजोबा...आणि...जगणं काय असतं हे कळायच्या आधीच मरणाला रोज सामोरी जाणारी..... बस्स.. थोडया वेळाने भानावर आलो. कामात बुडालो. घरी जाताना पुन्हा नेदरलॅण्ड मधला नकाशा आठवला. मनात आलं, विचारांच्या प्रक्रियेत 'results' वर किती जास्त भर देतो आपण ! मग मला तो डच मॅनेजर आठवला. अशा प्रकारची इमेल पाठवायचं 'का' सुचलं असेल त्याला? जगभर पसरलेल्या आपल्या कंपनीच्या शाखांचा असाही उपयोग होऊ शकतो हे 'कसं' सुचलं असेल त्याला ? या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. पण जेव्हा त्याला ही कल्पना 'क्लिक' झाली असेल तो खरा सोनेरी क्षण ! Creative माणसं या क्षणाला 'germ' म्हणतात. एखाद्या किड्याप्रमाणे त्या कल्पनेने त्या डच मॅनेजरचा मेंदू पोखरून काढला असेल. 'मी असं काय करावं ज्याने त्या मुलीची जगण्याची उमेद वाढेल' या विचाराने त्याला कदाचित रात्र रात्र झोप लागली नसेल.....

तुमचं झालंय असं कधी ?
झालं असेल तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच !
झालं नसेल तर मी म्हणेन, अजूनही संधी गेलेली नाही.
जगजीत सिंग एका ग़झल मध्ये म्हणतो - 'जिंदगी को क़रीब से देखो, इसका चेहरा तुम्हे रुला देगा !'
आपल्या भोवतालचं आयुष्य आनंदी करण्यासाठी आपल्याला केवढा वाव आहे !
त्यासाठी खूप पैशांची गरज नाही, खूप वेळ द्यायचीही गरज नाही.
गरज आहे ती 'creative charity'ची. जे त्या डच मॅनेजरने केलं.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काय 'बेस्ट' आहे ते आपण ओळखायचं. आणि आपल्याकडे असलेल्या त्या 'बेस्ट' गोष्टीची कोणाला गरज आहे ते शोधात राहायचं ! As simple as that !
(माझे आवडते आणि) प्रख्यात लेखक अनिल अवचट यांना माझे बाबा एकदा भेटायला गेले होते. दोघेही एकमेकांना प्रथमच भेटत होते. कामाचं बोलून झाल्यावर अनिल अवचट बाबांना म्हणाले, 'तुम्ही एवढ्या लांबून मला भेटायला आलात, तुम्हाला मी भेट म्हणून काय देऊ..?......मी तुम्हाला बासरी वाजवून दाखवू ?'
बाबांनी 'नाही' म्हणायचा प्रश्नच नव्हता. अवचटांनी बाबांना छान बासरी वाजवून दाखवली.
केवढी आगळी-वेगळी भेट होती ही ! व्वा !

खरंच सांगतो, इतरांसाठी करण्यासारखं खूप आहे.
काही उदाहरणं देतो. यातून तुम्ही clue घेऊ शकता....भोंगा वाजत जाणारी अम्ब्युलंस दिसली तर मनापासून 'गेट वेल सुन' म्हणा,घरी पेपर टाकणाऱ्या मुलाला, दुधवाल्याला, तुमच्या सोसायटीच्या वॉचमनला त्याचं 'नाव' विचारा, हॉटेल मधून बाहेर पडताना बाहेर 'तो' पाव-भाजीच्या तव्यावर भाजी 'कुटत' असतो ना, त्याला एक मिनिट थांबून 'पाव भाजी' मस्त झालेली असं सांगा, उन्हामध्ये उभं राहून ट्राफिक हाकणाऱ्या पोलिसाला एक थंड पाण्याची बाटली द्या, तुमच्या घरी नियमित येणाऱ्या पोस्टमनला चपलांचा एक चांगला जोड भेट म्हणून द्या....
......तुमच्या या अनपेक्षित कृतीमुळे समोरची व्यक्ती कदाचित गोंधळेल. तुम्हाला कदाचित 'thank you' म्हणायलाही विसरेल. दोष त्या व्यक्तीचा नाही. कोणी चांगुलपणा दाखवला की आपल्याला त्याचा संशय येतो हे सध्याचं वास्तव आहे. पण आधी म्हटलं त्या प्रमाणे 'results' वर भर देऊ नका.. आपण दुसऱ्यासाठी काहीतरी 'छान' करतोय ही प्रोसेस एन्जॉय करा ! तुम्हालाच किती मस्त वाटेल ते बघा !

काही वर्षांपूर्वी एक गोष्ट ऐकली होती. त्या एका गोष्टीने माझा 'charity' विषयी बघायचा दृष्टीकोन बदलला. ती गोष्ट सांगतो आणि थांबतो.

गोष्ट आहे परदेशातील. एक प्रसिद्ध खेळाडू होता. एका स्पर्धेत तो पहिला आला. लाखो डॉलर्सचा चेक त्याला बक्षीस म्हणून मिळाला होता. तो जिंकून घरी जात असताना त्याची गाडी सिग्नलपाशी उभी राहिली. एक बाई त्याच्या गाडीशी आली. म्हणाली, 'माझा मुलगा खूप आजारी आहे. माझ्याकडे औषधालाही पैसे नाहीत. काही मदत केलीत तर खूप उपकार होतील.'
त्या खेळाडूने खिशातून त्याच्या बक्षिसाचा चेक बाहेर काढला. मागचा-पुढचा विचार न करता तो चेक त्याने त्या
बाईच्या नावाने endorse करून तिला दिला !
दहा बारा दिवसांनी त्या खेळाडूचा एक मित्र धावत धावत त्या खेळाडूकडे आला. म्हणाला, 'मागे तू ज्या बाईला लाखो डॉलर्सचा चेक दिलास ती लोकांना खोटं-नाटं सांगून पैसे उकळत होती. मुलगा आजारी आहे, औषधाला पैसे नाहीत हे सगळं झूठ होतं… तुझे आणि बऱ्याच लोकांचे पैसे घेऊन ती बाई गायब झाली आहे. पोलीस तिच्या शोधात आहेत.'
काही क्षण स्वतःशीच विचार करत तो खेळाडू हसून म्हणाला, 'मला हे ऐकून आनंद झाला की जगात एक लहान मूल आजारी नाहीये !'

अशा प्रकारच्या 'संत' पदापासून आपण सगळेच कोसो दूर आहोत, याची जाणीव आहे मला.
पण 'जगण्याच्या' या दिंडीत आपण एक वारकरी म्हणून सामील व्हायला काय हरकत आहे ?

Thursday, March 3, 2011

काहीतरी नविन ! - ३ मार्च २०११

Education is what survives when what was learned has been forgotten.
- B F Skinner


मागच्या आठवड्यात काही कामासाठी बंगलोरला गेलो होतो. मी आणि सध्या तिथे राहणारी माझी काही भावंडं असे काही वेळासाठी भेटलो होतो. मुलांच्या शाळेचा विषय निघाला. काकडी कापता कापता तिला जसं पाणी सुटत जातं तसं काहीसं झालं. प्रत्येक 'पालका'कडे बोलण्यासाठी भरपूर मटेरीअल होतं. गम्मत म्हणजे, संपूर्ण गप्पांमध्ये ‘शाळेत काय शिकवतात’ हा मुद्दाच नव्हता. शाळेच्या 'फीया' कश्या भरमसाठ वाढल्यात हीच चर्चा रंगली होती. बंगलोरमध्ये ज्या भागात माझी भावंडं राहतात त्या भागात नर्सरी-केजीची फी किती असेल ? काही अंदाज? ....साठ ते सत्तर हजार रुपये! काही शाळांमध्ये मुलांच्या कार्यक्रमांना जर पालक उपस्थित राहणार असतील तर पालकांना चक्क अडीचशे रुपये वगैरे देऊन तिकीट काढावं लागतं ! एका शाळेत तर पालक आपल्या मुलांना webcam वरून पाहू शकतात - त्याबद्दल पालकांना रीतसर सभासद व्हावं लागतं - याचे फक्त दोन हजार रुपये ! अर्थात मुंबई मध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही. काही हजार इकडे तिकडे...!
क्लासेस चालवून चैनीत जगणारा माझा एक मित्र मला म्हणाल्याचं आठवलं. 'तुझा मित्र म्हणून एक सल्ला देतो. तुझ्या मुलाला अजिबात शिकवू नकोस. तो शाळा-कॉलेजला नाही गेला तरी काही बिघडत नाही. तुझ्या मुलाला आयुष्यात शिक्षणासाठी किती पैसे लागतील याची एकदा बेरीज कर. मुलाच्या नावाने तेवढ्या पैशांची एक FD काढ. त्या FD च्या व्याजात तुझा मुलगा आयुष्यभर काहीही काम न करता आरामात जगू शकेल.'

मला ‘माझ्या’ शाळेचे दिवस आठवले. LIC, MTNL आणि SSC ला पर्याय नसण्याचे ते दिवस होते.
मी मराठी माध्यमात शिकलो. पाचवीत पाच रुपये, सहावीत सहा रुपये अशी ‘महिन्याची’ फी होती. युनिफोर्मचे दोन(च) जोड होते. दप्तरात Camlin ची कंपास पेटी असणं हे स्टेटस सिम्बॉल होतं. ती पेटी उघडली की झाकणाच्या आतल्या सोनेरी पत्र्यावर आपला चेहरा दिसे. पेटीच्या आत कर्कटक, कंपास, छोटी प्लास्टिकची पट्टी, दोन बॉल पेन्स आणि टोक काढलेल्या लाल रंगाच्या दोन पेन्सिली, एक खोड-रबर आणि शार्पनर असले की केवढं 'श्रीमंत' वाटायचं !
या सगळ्यावर कळस म्हणजे जीव तोडून शिकवणारे शिक्षक होते. यातले बरेचसे गुरुजन मुलांच्या भावविश्वात गुंतलेले असत. मुलांच्या शाळेतल्या प्रगतीवर तर लक्ष असेच पण त्याशिवाय घर ते शाळा या प्रवासात मुलं कशी वागतात याकडेही लक्ष असे. (मुलं आणि शिक्षक दोघेही शक्यतो चालत प्रवास करत हेही त्यामागचं कारण असू शकेल.)
मी नववी-दहावी मध्ये कोचिंग क्लासची मदत घेतली होती. तोही कसा क्लास ते ऐका. गिरगावात एका चाळीत डॉक्टर वसंत माईणकर नावाचा एक 'वयोवृद्ध ऋषी' राहतो. ते आमचे क्लासेस घेत असत. आम्ही त्यांना 'डॅडी' म्हणत असू. डॅडी अमेरिकेमध्ये शिकवून आले होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी physics मध्ये Phd केली होती. गिरगावातल्या त्यांच्या घरात मुलांना इंग्रजी-विज्ञान-गणित शिकवताना त्यांना कमालीचं समाधान मिळत असे. त्यांच्या विषयांवरचं त्यांचं प्रभुत्व वादातीत होतं. आज मागे वळून पाहताना वाटतं की आमचीच झोळी फाटकी होती. आमच्या समोर पंचपक्वानांनी भरलेलं ताट होतं, कुठलाही पदार्थ पोटभर खाण्याची मुभा होती. आणि त्यातला एकही पदार्थ न खाता त्या पदार्थांचा नुसता सुवास घेण्यात आम्ही धन्यता मानली होती. आमच्या या शिक्षकाची अशी अपेक्षा होती की अभ्यासाची एखादी शंका विचारण्यासाठी अगदी मध्यरात्री त्याचं दार ठोठवावं. आम्ही इतके करंटे की आम्हाला सकाळी भरणारा क्लासच अंगावर यायचा. या क्लासची महिन्याला शंभर रुपये एवढी फी होती. कोणी किती पैसे दिले, नाही दिले याचा काही हिशेब नसायचा.
हीच कथा गिरगावात राहणाऱ्या जोशी नावाच्या एका सरांची. हे सर कुठेतरी नोकरी करायचे आणि संध्याकाळी आवड म्हणून मुलांना स्वतःच्या घरी गणित आणि विज्ञान शिकवायचे. फी किती ? शून्य रुपये !
आजच्या काळात मी जे सांगतोय ते खोटं वाटेल अशी परिस्थिती आहे.
जाता जाता राहवत नाही म्हणून एक आठवण सांगतो. थोडीशी वैयक्तिक पण तरीही या विषयाशी निगडीत. खोटी वाटेल इतकी खरी आठवण !
सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. माझ्या बालवाडीच्या शिक्षिका - सुषमाताई एक दिवस फोन करून घरी आल्या. दीड तास प्रवास करून. माझा मुलगा 'अमृत' त्यावेळी दोन वर्षांचा होता.
सुषमाताई अमृतला भेटायला आल्या होत्या. त्यांनी एक भली मोठी पिशवी आणली होती. मला वाटलं काहीतरी खाऊ आणला असेल त्याच्यासाठी.
पिशवीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. त्यात रंगांची, आकारांची ओळख करून देणारे निरनिराळे तक्ते होते. वेगवेगळ्या मोटारींची चित्र असलेले पुठ्ठे होते. खूप चित्र होती, कविता होत्या.... कार्डपेपरनी तयार केलेले रंगीबेरंगी घोटीव कागद लावलेले चौरस होते, लंबगोल होते, गोल होते... आम्ही सगळे पहातच बसलो. सुषमाताईंनी हे खास अमृतसाठी बनवून आणलं होतं. मला म्हणाल्या, 'अमृत मोठा झाला की याचा वापर करून त्याला शिकव. पटकन शिकेल तो.'
काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं, 'सुषमाताई, एवढं सगळं कशासाठी ?'
सुषमाताई हसल्या आणि म्हणाल्या, 'तरी अजून बरंच द्यायचं होतं रे.... कामाच्या धावपळीत इतकंच जमलं !'
त्यानंतर तास-दोन तास गप्पा झाल्या. तीस वर्षांपूर्वी घडलेल्या माझ्या बालवाडीतल्या गोष्टी मी विसरलो होतो पण सुषमाताई विसरल्या नव्हत्या.
सुषमाताई निघाल्या. मी, माझी बायको आणि अमृत त्यांच्या पाया पडलो.
म्हणाल्या, 'केवढी छोटी छोटी होतात, तुम्ही मुलं! आज केवढे मोठे झालात ! आमच्या नविनला दोन वर्षांचा मुलगा ! बापरे, विश्वासच बसत नाही !
मी म्हटलं, 'बाई, तुमच्यासाठी आम्ही अजूनही दोन वर्षांचेच आहोत !'
सुषमाताई मोठ्यांदा हसल्या आणि ओले झालेले त्यांचे डोळे चष्म्याच्या काचेमुळे आणखीनच चमकले.

अमृत आता अडीच वर्षांचा झालाय. प्लेग्रुप मध्ये जातो.
हजारो रुपये मोजल्यावर शाळेकडून काही पुस्तकं-खेळणी दिली जातात. सुषमाताईंनी स्वतः चा लाखमोलाचा वेळ खर्च करून बनवलेली खेळणी मी त्याला आत्ता दाखवणार नाहीये. कारण त्याचं महत्व कळण्याच्या दृष्टीने तो अजून लहान आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या उत्कृष्ट शिक्षकांच्या आठवणींचे प्रतिक म्हणजे ती खेळणी आहेत.
सध्या शिक्षणाला 'प्राईस टॅग' लावायचे दिवस आहेत. ही चांगली गोष्ट आहे की वाईट हे त्या शिक्षणाचे 'प्रोडक्ट्स' म्हणजे आजची मुलं ठरवतील.मुलांना वातानुकुलीत वर्ग नको असतात, हाय फाय खेळणी नको असतात. त्यांना घडवणारे ‘चांगले शिक्षक’ ही प्रत्येक मुलाची आणि काळाची गरज असते.

माझ्या आयुष्यात जसे माईणकर सर, जोशीसर, सुषमाताई आले तसे अमृतच्या आयुष्यात देखील ‘हाडाचे शिक्षक’ येतील याची मला खात्री आहे. आणि ही आशा जोवर जिवंत आहे तोवर अमृतच्या नावाने 'FD' उघडायची मला गरज वाटत नाही !