Thursday, June 9, 2011

काहीतरी नविन! - ९ जून

When the last tree is cut down, the last river poisoned, and the last fish caught,
Will we realize that we can't eat money?


तो 'एन्ट्री' घेणार म्हणून सगळा रंगमंच सजून तयार असतो.
सगळे प्रेक्षक अक्षरशः घामाघूम होऊन त्याच्या 'एन्ट्रीची' वाट पहात असतात.
प्रेक्षागृहात अचानक काळोख होतो.
प्रेक्षागृहात गार वाऱ्याची एक झुळूक येते. घामाघूम झालेले प्रेक्षक थोडे सुखावतात.
वावटळ झाल्याप्रमाणे रंगमंचावर धुरळा उठतो तशी सगळे म्हणतात - 'आता तो नक्की येणार'.
काही मिनिटं विलक्षण शांततेत जातात. प्रेक्षकांची उत्सुकता थोssडीशी ताणून अखेर तो 'एन्ट्री' घेतोच.
'तो' येतो. त्याला हात मिळवण्यासाठी मी माझा हात पुढे नेतो आणि मागून आवाज येतो,
'खिडकी बंद करा नाहीतर बसमध्ये पाणी येईल.'
मुंबईत पहिल्या पावसाचं स्वागत हे असं होतं !
--------------

पावसाबद्दल लिहिताना मेंदूला कितीही ताण दिला तरीही मला इंद्रधनूची कमान, हिरवीगार (डोलणारी) शेतं,
खळाळते निर्झर असे शब्द सुचतच नाहीत.
कारण मी माळशेज घाटात लहानाचा मोठा नाही झालोय.
कवितेतला पाऊस आमच्या शहरात भेटणं अशक्य.
शहरातला पाऊस शाम बेनेगलांच्या आर्टफिल्म सारखा पडतो – गद्य !
आपल्या जेवणात आपण जे गहू, तांदूळ, भाज्या वगैरे खातो ते आधी शेतात उगवतात आणि मग दुकानात येतात हे आम्ही एव्हाना विसरलो आहोत. घराच्या नळातून जे (काही थोडं फार) पाणी येतं ते कुठल्यातरी तलावात आधी आकाशातून पडतं हेही आम्ही विसरलो आहोत.
आमच्यासाठी पाऊस म्हणजे ब्राऊन रंगाच्या पाण्याने साचलेली डबकी, ट्राफिक जाम, छत्रीची अडगळ,
बुटाच्या आत पाणी जाऊन भिजलेले मोजे, गर्दी, पायाच्या मागच्या बाजूस उमटलेले चिखलाचे नक्षीकाम.
आमच्यासाठी पाऊस म्हणजे हेडेक. पाऊस म्हणजे मेस्स !
आणि तसंही मल्टीप्लेक्स, मॉल्स, मोबाईल फोन्स, केबल टीव्ही, डिश एंटेना, कम्प्युटर्स, एसी वगैरे पावसाच्या पाण्यावर कुठे चालतात ?
नाही पडला पाऊस, काय फरक पडतो ?

होल्ड ऑन. एका गोष्टीसाठी मात्र आम्हाला पाऊस हवा असतो.
आमच्यातली 'वाइल्ड साईड' जागी करायला आम्हाला पाऊस हवा असतो.
काळ्या प्लास्टिक पिशवीच्या आड स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी, आमच्या इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी
आम्हाला पाऊस हवा असतो.
आम्हाला पाऊस यासाठीही हवा असतो की जेणे करून
आम्ही ऑफिसला दांड्या मारण्याची अभिनव कारणं शोधून काढू शकु.


आम्हाला पाऊस यासाठीही हवा असतो की जेणे करून
आम्ही निसर्गाच्या कुशीत-बिशीत जात गोंगाट करून तिथली शांतता बिघडवू शकु.
तिथल्या हिरव्यागार गवतावर फ्रुटी आणि लेजच्या पाकिटांची रांगोळी काढू शकु.
निदान हे करण्याइतपतच पाऊस पडला पाहिजे.

आम्हाला हवा तेव्हाच पडेल आणि नको तेव्हा बंद होईल असा पाऊस
कुठल्या मॉलमध्ये मिळतो का याचा शोध आम्ही सगळेच शहरवासी घेत आहोत.
कुणाला यासंबंधी अधिक माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.
प्रत्यक्ष भेटून नको. इमेल किंवा एसेमेसने कळवा.
उगाच भेटण्यात वेळ कशाला खर्च करा !

इतकं सगळं असून....पाऊस कोडग्यासारखा पुन्हा पुन्हा शहरात येत राहतो.
आमच्या घराच्या छपरावरून ओघळत खिडकीशी येतो.
खूप जोराने खिडकी वाजवत-भिजवत राहतो.
त्याच्या आवाजामुळे टीव्ही सिरीयलमधील आमच्या लाडक्या कलाकारांचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
मग आम्ही खिडक्या बंद करतो.
एकेकाळी पाण्यात कागदी होड्या सोडणारं बालपण आता ‘पोगो’ चॅनल बघण्यात दंग असतं.
पण तरीही तो आमच्या रस्त्यांवर साचत राहतो.
सिमेंटच्या रस्त्यातून आत मुरायला ‘स्कोप’ नाही म्हणून आमच्या थुंक्यांशी, पानाच्या लालभडक पिचकारींशी, पिचलेल्या प्लास्टिक पिशव्यांशी अगतिकपणे खेळत राहतो.
गेट वे ऑफ इंडिया, मरीनलाईन्सजवळ पावसाचा ‘सवाई गंधर्व’ महोत्सव सुरु असतो पण
त्याचा ‘मझा’ घ्यायला मात्र मोजकेच चोखंदळ रसिक उपस्थित असतात.

उपरेपणाच्या या भावनेतून मग त्याचा ‘इगो’ दुखावतो. तो थैमान घालतो.
आमची रेल्वे, बस सेवा बंद पाडतो. आम्हाला गुडघाभर पाण्यात बुडवतो.
ध्यानीमनी नसताना आम्हाला सुट्टी मिळाली या आनंदापुढे हा त्रास गौण असतो.
सर्व सोयींनी सुसज्ज शहरात गैरसोयीला सरावलेले आम्ही या सगळ्याला हसत हसत तोंड देतो.
'खूप काही सांगायचं राहून गेलं' असं दरवर्षी म्हणत पाऊस हलक्या पावलाने निघूनही जातो.
--------------

एखाद्या घरातील अडगळीत पडलेल्या दुर्लक्षित वृद्धाकडे बघून यावी तशी मला पावसाची कणव येते.
मागच्या सीटवर बसलेला माणूस काय म्हणेल याची पर्वा न करता मी बसची खिडकी उघडतो.
माझा हात खिडकीबाहेर नेतो आणि ओंजळीत त्याच्या सरी साठवू पहातो.
माझ्या ओंजळीत आलेला त्या अनादी वृद्धाचा 'गार पडत जाणारा हात'
मला माणूस जातीच्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जातो !

12 comments:

  1. खरेच शहरी लोकं पावसाबद्दल किती कोडगे होत चालले आहेत ! पोस्ट आवडली.

    ReplyDelete
  2. आम्हाला पाऊस फक्त यासाठीच हवा असतो की जेणे करून,आमच्या बकाल शहरात अक्राळ विक्राळ वाढलेल्या लोकसंख्येला,पुढच्या पावसाळ्या पर्यंत प्यायला नि धुवायला फक्त पाणी मिळावं म्हणून... आम्हाला पाऊस फक्त यासाठीच हवा असतो की,दुष्काळा मुळे अन्न धान्यांच्या किमती वाढून फक्त आमचा बँक बॅलन्स कमी होऊ नये म्हणून ... आम्हाला पाऊस फक्त यासाठीच हवा असतो की जेणे करून आम्ही निसर्गप्रेमी कसे आहोत हे दाखविण्याच्या निमित्ताने लोणावळा,खंडाळा,महाबळेश्वर,अणे माळशेजला जाऊन फक्त दारू पिऊन दंगा करून नंगा नाच करण्या साठी.
    शहरी माणसाच्या बदललेल्या काळानुसार झालेल्या संकुचित विचारांचे हे काही प्रातिनिधिक नमुने... चांगल्या घरातील नि संस्कृती मध्ये वाढलेल्या लोकांना खास करून तरुण मुलांना हे जरा अतिशयोक्ती पूर्ण वाटेल,पण पावसाळ्यात दर शनिवारी ,रविवारी पुणे-लोणावळा लोकल मध्ये सकाळी लोणावळ्याला जाताना नि संध्याकाळी लोकलने परत येताना हे दरवर्षी जे नियमित चित्र दिसते,ते ह्या ही पेक्षा भयानक असते.सर्व धर्म समभाव म्हणजे काय ह्याचे मूर्तिमंत उदाहरण.लोणावळ्याला जाताना दारूच्या बाटल्या,सिगारेटची पाकीट नि गुटक्याच्या पुड्या घायची लगबग नि येताना अगदी फर्स्ट क्लासच्या डब्यात सुद्धा विना तिकीट प्रवास करत, सीट वर ओकून,दारात, इकडे, तिकडे, थोडक्यात वाट्टेल तिथे नि वाट्टेल त्या अवस्थेत बेधुंद अवस्थेत पडलेले,लोळलेले तरुण तरुणी,आणि झक मारली नि तिकडे जायची दुर्बुद्धी झाली हे चेहेर्यावर भाव घेऊन ,आपल्या कुटुंबा सोबत घरी परतणारे संसारी प्रवासी..... थोडक्यात काय तर पाउस म्हणजे जीवन हे समीकरणच आताशा बाद झालंय.

    ReplyDelete
  3. sundar, apratim, manala vichar karayala lavnara lekh.

    ReplyDelete
  4. नमस्कार,
    एका मित्रानं ईमेलने पाठविलेला तुमचा लेख वाचनात आला. आणि तो आवडल्यानंतर तुमचा ब्लॉगवरील शब्द अन्‌ शब्द एका बैठकीत अधाशासारखा वाचून काढला.
    एखादा लेख वाचल्यावर "अरेच्च्या ! आपल्याला पण हेच तर सांगायचं होतं !", किंवा "आपल्यालाही असंच लिहिता आलं असतं तर . . . ? " असं जेव्हा वाचकाला वाटतं ना; माझ्या दृष्टीनं तीच लेखकाला मिळणारी सर्वांत मोठी पावती असते.
    तुमचं लेखन हे सोपं असूनही विचारप्रवर्तक आणि सुटसुटीत असूनही नाविन्यपूर्ण आहे यात शंकाच नाही, परंतु ते वाचतांना जो एक ‘आपुलकीचा’ भाव मनात उत्पन्न होतो, त्यामुळं ते थेट हृदयाला भिडून ‘सर्वांगसुंदर’ वाटतं.
    पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  5. शाम बेनेगल बघतोय अस वाटल... काहीतरी नवीन नक्कीच! :)

    ReplyDelete
  6. Faarach chaan ahe. Malaahi kaahi karaayche ahe, pan me vaktaa nahi. Maazaa blog pahilyaas andaaz yeil.

    Yaa vishayaavar barach kahi lihinyaasarkhe ahe, pan shabda sapdat nahit, Koni madat karil kaay?

    ReplyDelete
  7. खूप दिवसांनी पावसाबद्दल लिहिलेलं खरं काहीतरी वाचलं :)
    ...‘माझा आवडता ऋतु पावसाळा’ असा कोणाच्या मनचा निबंध लिहायचो आपण शाळेत?? तो आपल्याला ‘शिकवलेला’ पावसाळा होता, तुम्ही ज्याच्याबद्दल लिहिलंत तो अनुभवायला मिळणारा पावसाळा आहे!

    ~ अर्निका
    arnika-saakaar.blogspot.com

    ReplyDelete
  8. tumhi ashakya chhan lihita... 16 June ch tumach article mail madhe forward mhanun aal.. ani mag n rahvun he blogs open kele.. ajun khalparyant gele nahiye..pan ha particular blog .. ektar pavsabaddal.. tyaat kiti khara khara ahe.. Khoop aavdala... :)

    ReplyDelete
  9. kay jabardast entry......wah...majja aali.
    khup divasani manala bhidanar vachayala milatay.
    khup avadala tumach lekh, aani suruvat tar pahilya pawasachya sari etakich aalhadadayak hoti.
    tumachya likhanala manapasun khup khup shubhechha.

    ReplyDelete
  10. va pu kale yanchya nantar tumhich !!! kharokhar sangto !!!

    ReplyDelete