Thursday, June 2, 2011

काहीतरी नविन ! - २ जून २०११

You don't have to burn books to destroy a culture. Just get people to stop reading them.
-Ray Bradbury



'लिमोझोन'.
बरोब्बर! हेच नाव. मी पत्ता लिहिलेला कागद खिशात ठेवला आणि दरवाजा उघडून आत गेलो.
चिक्कार गर्दी. मी एकवेळ शांत बसलेली दहा लाख माणसं सहन करेन. पण मचमच करणारी दहा डोकीसुद्धा माझ्या डोक्यात जातात.जिभेला खाज सुटली म्हणून इतक्या लांब आलो होतो. वाट पाहण्यावाचून आता पर्याय नव्हता.
एक रिकामा कोपरा निवडला. माझ्या घामेजलेल्या अंगावर एसीचा झोत येत राहील अशा बेताने उभा राहिलो. काउंटरवर बसलेल्या माणसाने माझं नाव लिहून घेतलं. मला दहा मिनिटं थांबायची विनंती केली. माझ्या समोरून वेटर्स लगबगीने खाण्याच्या प्लेट्स घेऊन जात येत होते. त्यांच्या हातात जे पदार्थ दिसत होते ते काही अनोळखी वाटत नव्हते. माणसं मिटक्या मारत खात होती.
सगळ्या पदार्थांचा मिळून एक सामाईक वास त्या बंद-एसी जागेत भरून राहिला होता.
पाच मिनिटं वाट बघून निघायचं असं मनात म्हणतोय न म्हणतोय, तोच पाठीवर कुणीतरी हलकेच थोपटलं.
मी मागे वळून पाहिलं. तो लिमये होता. माझा कॉलेज-मित्र. जराही बदलला नव्हता. मी त्याला तसंही विसरणं शक्य नव्हतं. कारण तो नेहमी माझ्याकडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये खायचा. महत्वाचं म्हणजे त्याने मला बरेच पैसे देणं होतं.
रिझल्ट लागला आणि तो कुठेतरी लांब शिकायला गेला इतकंच माहित होतं.
.......'लिम्या तू ? कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस?' मी एका दमात विचारलं.
'मी मजेत. तू कसा आहेस ? काय करतोस ?' लिमयेने हसत विचारलं.
मी विचारलेल्या चार प्रश्नांपैकी त्याने एकाच प्रश्नाचं उत्तर देऊन बाकीचे प्रश्न टाळले हे विसरून मी माझ्याबद्दल सांगत राहिलो. लिमये माझं ऐकता ऐकता तिथे बसलेल्या लोकांना हात-बीत करत होता.
माझं पुराण संपल्यावर मी मस्करीच्या स्वरात विचारलं, 'लिम्या, तुझी ही रोजची जागा दिसत्ये. अजूनही उधारीवर खातोस?'
मला जोरदार टाळी देत लिमये हसुन म्हणाला, 'देवाच्या कृपेने आता उधारीवर खात नाही. मीच या हॉटेलचा मालक आहे ! चल माझ्याबरोबर !'

मी आता लिम्याच्या एसी केबिनमध्ये होतो. माझ्यासमोर एका ग्लासात थंड कोकम सरबत आणि बाजूला मेन्यू कार्ड.
'काय खाणार साहेब ? फक्त हुकुम करा.'
मी मेन्यू कार्ड उघडलं. एकही पदार्थ ओळखीचा वाटत नव्हता.
मेन्यू कार्ड लिम्या समोर फेकत मी म्हटलं 'लिम्या हे काय आहे? एकही पदार्थ ओळखीचा नाही. इसापनीतीच्या गोष्टीतला तू करकोचा आणि मी कोल्हा आहे का ?'
लिम्या जोरात हसला आणि म्हणाला, ‘मला माहित्ये तुला साबुदाण्याची खिचडी जाम आवडते. आधी ती खा आणि मग लिमोझोन स्पेशल पोहे खाऊन बघ.'
लिम्याने बेल दाबताच एक वेटर आत येऊन 'येस सर...' म्हणाला.
'साहेबांसाठी एक फ्राईड बबल्स घेऊन या. आणि मग गोल्डन पेटल्स.' लिम्याने आज्ञा सोडली.
'लिम्या - लिमये - संतोष - अरे मला खिचडी आणि पोहे... ' मी पुढे काही बोलायच्या आत लिम्याने मला थांबवलं.
'तू तेच खाणार आहेस, जे तुला खायचं आहे.' लिम्या हसत म्हणाला.
माझ्या मनात उभं राहिलेलं प्रश्नांचं वादळ लिम्याने जोखलं असावं. लिम्या बोलू लागला...
'नविन, दहा वर्षांपूर्वी 'लिमये उपहारगृह' नावाने व्यवसाय सुरु केला. आपण 'मराठी पदार्थ' विकतो याचा खूप अभिमान वाटायचा. पण मग लक्षात येऊ लागलं की माझ्याकडे येणारा कस्टमर वडापावला काही पन्नास रुपये मोजणार नाही. कारण त्याने आधीपासूनच 'मराठी पदार्थ म्हणजे स्वस्त पदार्थ’ हे समीकरण मनाशी ठरवून टाकलेलं असतं. मुंबईत मराठी पदार्थ विकणारी अनेक उपहारगृह मी जवळून पाहिली. तिथे बसून खाऊन पाहिलं. मग लक्षात आलं की आपले मराठी पदार्थ चविष्ट आहेत पण आपण त्यांना नीट सजवून 'पेश' करत नाही. आपल्या जुन्या पिढ्यांचे संस्कार असतील कदाचित, पण आपण 'जेवण' या क्रियेचा 'उत्सव' साजरा करत नाही. ताटात जे वाढलंय त्याच्याशी आपली बांधिलकी 'उदरं भरणं' इतकीच सीमित असते. म्हणूनच आपल्याला अमिबाच्या आकाराचं थालीपीठ खाताना काही वाटत नाही. परंतु मराठी नसलेली माणसं या बाकीच्या गोष्टींचा विचार करतात. तो पदार्थ दिसतो कसा, तो ताटात वाढलाय कसा, तो सजवलाय कसा, त्याला काय म्हणतात या बाबतीत ते सजग असतात. मग त्यासाठी ते भली मोठी किंमत मोजायला तयार असतात. जग झपाट्याने बदलतंय. आता माणसांना फक्त पोट भरायचं नसतं. त्यांना खाण्याच्या 'प्रक्रियेचा अनुभव' घ्यायचा असतो. लोक त्या 'अनुभवाचे' कितीही पैसे मोजायला तयार असतात. मग ठरवलं, आपला approach बदलायचा. ‘लिमये उपहारगृहा’चं 'लीमोझोन' केलं. मेन्यू कार्ड नव्याने तयार केलं. पदार्थांची नावे बदलली. त्यांचं 'रुपडं' बदललं. अमिबासारखं दिसणारं थालीपीठ मी इथे 'kharpoos platter' नावाने नव्वद रुपयाला विकतो - आणि लोक ते खातात ! पण मग मी कंजुषी नाही करत. थालीपिठाचा बेस करून त्यावर किसलेल्या चीजचा भडीमार करतो आणि वर एक लालभडक चेरी लावून देतो ! काय ‘नाही’ म्हणतील नव्वद रुपये द्यायला ! ताजा भात फोडणी घालून देतो. त्याला फोडणीचा भात नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं - Golden Rice ! शेव गाठ्या पेरून दिलेला हा Golden Rice खायला लोकांच्या उड्या पडतात !
मी आवक झालो होतो. पण तरीही माझ्यातला 'मराठी माणूस' जागा झालाच.
'लिम्या हे सगळं ठीक आहे. पण यामुळे 'आपण जे खातोय ते मराठी पदार्थ आहेत' हे लोकांना कधीच कळणार नाही. त्याचं काय ?'
लिम्या म्हणाला, 'माझ्या आईवर माझं प्रेम आहे' असा बॅनर लावतोस का तू? तसंच आहे हे. कुठलीही भेसळ न करता मी लोकांना चांगल्या दर्जाचे मराठी पदार्थ देत आहे हे समाधान माझे एकट्याचे आहे. आणि ते फक्त माझ्यापुरते आहे. मी माझ्या हॉटेलमध्ये पुलंचा 'माझं खाद्यजीवन' मधील एक उतारा चांगल्या गुजरातीत, हिंदीत आणि इंग्रजीत अनुवादित करून लावलाय. ‘भाषेचा अभिमान’ म्हणून मला तो मराठीत लावता आला असता पण इथे येणाऱ्या बिगर मराठी लोकांना तो कळला नसता. माझे पुलं काय म्हणताहेत ते इतरांपर्यंत ‘त्यांना समजेल’ अशा भाषेत पोहोचणं जास्त महत्वाचं ! फ्राईड बबल्स, गोल्डन राइस हे सगळे 'अनुवाद' आहेत! आपली खाद्य-संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून 'लिमोझोन' हा छोटासा प्रयत्न आहे. एक सांगू का? मी तर आता अशा निष्कर्षाला पोहोचलो आहे की केवळ 'वाद' घालून नव्हे तर ‘अनुवादा'मुळे संस्कृती टिकत असते!’

लिम्याला अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक अनुवादाची 'उधारी' आता फक्त माझ्यावरच नाही, तर फ्राईड बबल्सना 'साबुदाणा खिचडी' म्हणणाऱ्या प्रत्येकावर आहे !

24 comments:

  1. Lay Bhaari!!!patale buvaa amhaalaa...Amit

    ReplyDelete
  2. खूप छान लेख आहे हा....!
    बदल हे नेहमीच हवेत आणि ते जर positive कडे झुकत असतील तर त्या पेक्षा सुंदर ते काय......!
    आपल्या रूढी परंपरेचा अभिमान तर हवाच पण त्या मध्ये काळाप्रमाणे थोडे चांगले बदल करायला काहीच हरकत नाही...!
    'वाद' घालून नव्हे तर ‘अनुवादा'मुळे संस्कृती टिकत असते!’ हे मात्र १००% खरे आहे.
    Hats off लिमये सर....! तुमच्या 'लिमोझोन' ची ख्याती दिवसेंदिवस वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्राथना..!
    नविन सर खरच "काहीतरी नविन" हवंच.....!

    अमोल...!

    ReplyDelete
  3. खरच खूप सुंदर लेख आहे. आज काल च्या मुलांचा पिझ्झा पास्ता बर्गर वैगेरे पदार्थ खाण्याकडे जास्त कौल असतो अश्या अनुवादा मुळे आणि थोड्या वेगळ्या presentation मुळे त्यांना मराठी पदार्थ खायला पण आवडतील.

    ReplyDelete
  4. चाबुक पोस्ट आहे...लय भारी.

    ReplyDelete
  5. प्रचंड आवडला लेख .. सुंदर !!

    ReplyDelete
  6. "काही तरी नवीन" वाचल्याचं नक्की समाधान मिळालं नि त्या साठी एप्रिल नंतर मे महिना मधे जाऊन जून उजाडावा लागला तरी त्याचे वैषम्य वाटले नाही यातच सारे, सारं आले नि बऱ्याच दिवसा नंतर स्वतःच्या स्वतंत्र शैलीतील असे लिखाण मराठी ब्लॉग मध्ये वाचल्याचा एक छान अनुभव देऊन गेला. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. छान. इथे आम्हीही मुलांना मराठी पदार्थ म्हणजे तिळाच्या वड्यांना एनर्जी बार, थालीपिठाला स्पायसी पाय अशी नावं देवून व्यवस्थित खायला लावतो :-) केव्हा केव्हा मुलंच तसंलं एखादं नाव सुचवितात.

    ReplyDelete
  8. मार्केटींग मंत्र!

    मस्त जमला आहे लेख! :)

    ReplyDelete
  9. आयडियाची कल्पना मस्त... छान आहे लेख !

    ReplyDelete
  10. Masta aahe lekh :) Apratim

    ReplyDelete
  11. दादा.. तुम्ही लई भारी लेख लिहिता बघा ... एकदम अंगाशी ...... :)

    ReplyDelete
  12. What i like out of link and content is "माणसांना फक्त पोट भरायचं नसतं. त्यांना खाण्याच्या 'प्रक्रियेचा अनुभव' घ्यायचा असतो. लोक त्या 'अनुभवाचे' कितीही पैसे मोजायला तयार असतात."

    ReplyDelete
  13. Ek farach sundar anubhuti aani drushtikon 'LIMOZINE', madhun milala. Aajakalchya jalpolichya yugat, sanskruti tikavanyasathicha 'CHANGE', pratyekane aavarjun karun pahanyasathi, ha lekh sarvanparyant pohachava.

    Dhanyawad, kahitari navin dilyabaddal.....

    yogesh manjrekar

    ReplyDelete
  14. lekh awadala...wichar patale...

    ReplyDelete
  15. खरच खूप सुंदर लेख !!!

    ReplyDelete
  16. खरोखरच सुंदर लेख.

    ReplyDelete
  17. namaskaar !
    I would really like to visit "LIMOZONE"...
    I am really having a "mouth watering" experience just by reading this article... And that is your real success, i guess ! I TOTALLY AGREE WITH YOUR VIEWS... अनुवादाची खरेच गरज असते... आणि आपण मांडलेली संकल्पना खरोखरीच "नावीन्यपूर्ण" आहे.. Thank you..!

    ReplyDelete
  18. ekdam bhaari...
    haan limozone cha patta milaala tar sonya hum pivla! :P

    ReplyDelete
  19. layi bhari....sahich...patala buva aplyala

    ReplyDelete
  20. I only regret that this wonderful information dated 2nd June is seen by me nearly 3 months late. What does this convey? Best results shall emerge from even worst situations PROVIDED one changes the way one looks at it. उधारीवर रहाणारा हा विचारी तरुण वेगळ्या दिशेने विचार करतो, स्वप्न पहातो, कल्पना रंगवतो आणि जादू करून दाखवतो...सारेच आश्चर्यकारक! सांस्कृतिक अनुवादाची 'उधारी'हा शब्दसमूह सुद्धा बरच कांही सांगून जातो.Many thanks for sharing this.

    ReplyDelete
  21. Apratim! Pan mala sanga... hee goshta khari ahe ki kalpanik.. Ani khari asel tar please Limozone cha patta dya.. mala jayla awdel.. mi google karun pahila pan nahi sapadla..

    ReplyDelete
    Replies
    1. खर आहे मी पण शोधायचा खूप प्रयत्न केला पण किमान नेट वरती तरी माहिती मिळाली नाही. सर्च ला हा ब्लॉग मात्र समोर येतो.

      Delete