Thursday, February 24, 2011

काहीतरी नविन ! - २४ फेब्रु २०११

Sports do not build character। They reveal it।
- Heywood Broun
_______________________________________________________
राजीवची आई चहा-बिस्किटांचा ट्रे घेऊन आत आली. वर्ल्डकप आणि वर्ल्डकपच्या मॅचेसवर चाललेली चर्चा चांगली तासभर रंगली होती. राजीवच्या आईने 'टी-टाइम' घोषित केला नसता तर ती चर्चा आणखी तासभर सहज चालली असती. राजीवची आई आत येताच जमिनीवर अजगरासारखा पसरलेला दिनेश जरा सावरून बसला. दोन माणसं गप्पा मारताना तिसरी व्यक्ती आली की कितीही म्हटलं तरी लिंक तुटतेच. धबाधबा पाणी वाहणाऱ्या नळाच्या वरची चावी डावीकडे फिरवल्यावर त्या पाण्याचा आवाज जसा कमी होत जातो तसं त्यांच्या गप्पांचं झालं. कॉलेज संपल्यावर बऱ्याच वर्षांनी दोघे भेटले होते त्यामुळे ती समंजस माता जराही न रेंगाळता बाहेर निघून गेली.
अख्खं मारी बिस्कीट कपातून चहात जात नसल्यामुळे दिनेशने बिस्किटाचे दोन तुकडे केले.
बिस्किटाची चंद्रकोर चहात बुडवत दिनेश म्हणाला, 'क्रिकेट मध्ये पूर्वीची मजा नाही राहिली.'
'एवढी वर्ष खेळून तो तेंडल्या नाही कंटाळला आणि तुला काय झालं एकदम ?' राजीव चहाचा घोट घेत म्हणाला.
‘तू त्याला मध्ये आणू नकोस रे ! मी मर्त्य माणसांविषयी बोलतोय. सगळा पैशाचा तमाशा झालाय नुसता.' चहात भिजून मऊ झालेलं बिस्कीट तोंडात टाकत दिनेश म्हणाला.
'अरे तसं सगळ्याच क्षेत्रात झालंय आता. तू-मी अपसेट होऊन काय होणारे ? Let's face the reality.' मांडीवर उशी चढवत राजीव म्हणाला.
'यामुळे कोणीच अपसेट होत नाहीये हे बघून मी अपसेट होतोय. लहानपणी आपण पेपर मध्ये खुनाच्या, चोरी-मारीच्या बातम्या वाचायचो तेव्हा कमी त्रास व्हायचा. कारण मनात यायचं की या वाईट गोष्टी आपले आई-बाबा नाही करणार, शाळेतले शिक्षक नाही करणार. तसंच काहीसं माझं खेळांविषयी होतं. क्रिकेट मध्ये मॅच फिक्सिंग होतं हे खूप उशिरा कळलं. पण Wत्याच्या खूप आधी WWFच्या मारामाऱ्या खोट्या असतात असं एकाने सांगितलं होतं तेव्हा केवढा भांडला होतो मी त्याच्याशी. कारण तो माझ्या विश्वासाला तडा होता....’
दिनेश आणखी काही बोलणार तेवढ्यात राजीव म्हणाला, 'म्हणजे राजेश खन्ना म्हणतो तसं? 'सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये !'
'हो तसंच. आणि राजेश खन्ना नाही, आनंद बक्षी म्हणतो ! राजीव, म्हणजे कसं झालंय माहित्ये का? आता 'टीव्ही चॅनल्स' सत्ता केंद्र बनले आहेत. वर्ल्ड कप हा त्यांच्यासाठी फक्त एक इव्हेंट आहे. Just Another Event ! त्यांच्या लेखी राखी का स्वयंवर, युनियन बजेट, सारेगम, दंगली, जोर का झटका, क्रिकेटची मॅच, लोकसभा निवडणुका हे सगळं सारखंच आहे. त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची - viewership !
उद्या तू अखिल-दादर लगोरी स्पर्धा ठेव आणि कोटी रुपये मोजून रणबीर आणि कतरिनाला बोलाव. टीव्ही वर न्यूज येईल की नाही?'
दिनेश टिचकी वाजवत म्हणाला.
'दिन्या, हे जरा अति होत नाहीये का ?' राजीव कळवळून म्हणाला.
'अरे, खरंच सांगतोय मी. मागच्या आठवड्यातली गोष्ट. पेपरमध्ये सानिया मिर्झाचा फोटो आणि खाली बातमी - सानिया पराभूत ! हा काय टाईमपास आहे ? म्हणजे महत्व आहे ते न्यूज-मेकर्सना, 'न्यूज' ला नाही. आयपीएलच्या यशाचं तेच गमक आहे.....तुला हसायला काय झालं ?’
दिनेश ने आश्चर्याने विचारलं.
' अरे काही नाही, कपातला चहा संपलाय आणि बोलण्याच्या नादात तू रिकाम्या कपात बिस्कीट बुडवत होतास ! आणखी हवाय का तुला चहा ? घे रे ! आई, ए आईssss, दिनेशला चहा हवाय गं ! आणि करतेच आहेस तर मला पण टाक थोडा !' चहाच्या निमित्ताने गप्पांमध्ये खंड पडू द्यायचा नाही ही खास 'राजीव स्टाईल' !
'दिनेश मला सांग, तुझी बायको आता किराणा सामान कुठून घेते ?
'मॉल मधून.'
'आणि तू लहान असताना तुझी आई कुठून घ्यायची सामान?'
'गल्लीतल्या वाण्याकडून.'
'तो वाणी अजूनही असेल पण तरी तुझ्या बायकोला मॉलमधून सामान घ्यायला 'आवडत' असेल. कारण मॉल्स फक्त वस्तू विकत नाहीत. They also sell the shopping 'experience'. आजच्या क्रिकेटचंही तेच आहे. खेळ आणि ग्लॅमर यांचं हे चकाचौंध पॅकेज कोणालाही मोहात पडेल असंच आहे. आणि यामुळे होतंय असं की, तू म्हणतोस त्या प्रमाणे, मनोरंजनाच्या सगळ्या चाव्या आता क्रिकेट आणि पर्यायाने टीव्हीकडे आहेत.
मनोरंजन विकणाऱ्या बाकीच्या 'दुकानदारांना' आपल्या 'दुकानाच्या' वेळा त्याप्रमाणे adjust कराव्या लागत आहेत.'
'राजीव, त्या दिवशी मी हाच विचार करत होतो. इजिप्त मध्ये सत्तेविरुद्ध जसं बंड झालं तसं आपल्या देशात होईल का ? आपला सामान्य माणूस रस्त्यावर उतरेल का ? मीच मला उत्तर दिलं, नाही उतरणार आपण. कारण आपल्याला किती कामं आहेत ! वर्ल्डकप आहे, 'शीला की जवानी' आहे, बिग-बॉस आहे, पवित्र रिश्ता आहे, IPL आहे.....! म्हणजे निदर्शनं, दगडफेक करायचे प्रसंग आपण मॅच 'नसलेल्या' वेळात घडवून आणू !'
दोघेही हसले.
राजीवची आई 'दुसरा' चहा घेऊन आत आली. दोघांकडे बघत म्हणाली, 'मी मधून मधून तुमचं बोलणं ऐकत होते. मला काय वाटतं सांगू का ?
आपण सगळे आता फक्त क्रिकेटचे ‘प्रेक्षक’ तरी झालोय किंवा 'क्रिकेट' विकत घेणारे ‘ग्राहक’ तरी झालोय. कारण प्रत्यक्ष खेळण्यापेक्षा ते जास्त सोप्पं आहे. एकदा का आपण तेंडूलकरला 'देवाचा' दर्जा दिला की मग आपली जबाबदारी संपते. एकशे वीस कोटी लोकांच्या अपेक्षांचं ओझं त्या बिचाऱ्या एकट्या माणसाच्या पाठीवर टाकलं की आपण ‘केसांमध्ये वर्ल्ड कप कोरून घ्यायला’ मोकळे होतो.आणि काहीच नाही तरी नुसत्या चर्चा करण्यात आपला हात कोण धरू शकेल ? म्हणजे मला तर गमतीने वाटतं की या देशात आता फक्त अकरा माणसंच क्रिकेट खेळतात - आणि बाकीचे क्रिकेट 'बोलतात'! तुम्ही दोघांनी सुद्धा मघाच पासून बोलण्यातून इतकी वाफ वाया घालवलीत की त्या वाफेवर एक इंजिन सहज चाललं असतं!..... राजीव, मी देवळात जात्ये, तुम्हाला आणखी चहा हवा असेल तर सांग, मी जाण्याआधी करून जाईन.’
'नको काकू, तुम्ही जा. आम्हाला नकोय चहा.' काकूंच्या 'स्ट्रेट-ड्राईव्ह' ने भांबावलेला दिनेश पट्कन म्हणाला.

'आई म्हणजे ना..... !' तोंड वेंगाडत राजीव पुन्हा आडवा झाला.
पाच मिनिटं शांततेत गेली.
दिनेशला अचानक काय झालं माहित नाही. ' राजीव उठ, खाली जाऊन थोडं खेळूया.'
'एवढं मनावर घेऊन नकोस रे तिचं !' राजीव आळस देत म्हणाला.
' राजीव, कॉलेजच्या दिवसात गहाण टाकलेली 'लाज' मी नोकरी करून परत मिळवल्ये..... चल उठ.'


दोन तासांनी राजीव घरी आला तेव्हा त्याचा चार वर्षांचा मुलगा पीसी वर 'क्रिकेट' खेळत बसला होता.
त्याने राजीवकडे पाहिलं. घामेजलेले कपडे, मातीने भरलेले पाय, हातात बॅट... स्वतःच्या बापाचं हे 'असं' रुपडं तो प्रथमच पाहत होता.
'बाबा, केवढा डर्टी झालायस तू ?'
'रियली ?' राजीवने स्वतःला आरशात पाहिलं.
खूप वर्षांनी त्याला 'खेळून' घाम आला होता.
अंगातून टी शर्ट काढताना आलेला घामाचा 'गंध' आणि हाता-पायावर माखलेली माती राजीवला त्याच्या बालपणीच्या दिवसात घेऊन गेले.
'माउस' हातात घेऊन ‘क्रिकेट’ खेळणाऱ्या आपल्या मुलाकडे राजीवने क्षणभर पाहिलं...आणि स्वतःशीच किंचित हसून तो आंघोळ करण्यासाठी निघून गेला.

5 comments: