Thursday, February 17, 2011

काहीतरी नविन ! - १७ फेब्रु २०११

Whenever people agree with me I always feel I must be wrong.
- Oscar Wilde
_____________________________________________________
ही गोष्ट आहे अडीच वर्षांपूर्वीची.
मी रिक्षात बसलो होतो. माझ्या बाबांचा फोन आला. गुजरात मध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाले होते.
मी फोन ठेवला. बातमीचं ओझं सहन होईना, म्हणून माझ्या रिक्षावाल्याला ती बातमी सांगितली. त्याने 'चक-चक' केलं.
म्हणाला, ' मेरे सब रिश्तेदार सुरत में है '
'आप गुजराती हो ?' मी आश्चर्याने विचारलं. मी 'गुजराती चालकाच्या' रिक्षात प्रथमच बसत होतो.
'जी हां. मै पार्ला रहता हुं '
पार्ल्यात राहणारा गुजराती माणूस रिक्षा चालवतोय ? मला हे interesting वाटलं. मला यात एका लेखाचा विषय दिसू लागला.
आमचं पुढचं हिंदीतून झालेलं संभाषण सोयीसाठी मराठीत देत आहे.
'रिक्षा चालवणारा गुजराती माणूस मी पहिल्यांदा पाहिला.' मी म्हणालो.
'साहेब, सगळे तेच म्हणतात.' रिक्षावाला.
'पार्ल्यात कुठे राह्ता?' मी.
'मी पार्ला वेस्ट ला राहतो. आत्ता आपण ज्या सिग्नलशी आहोत त्याच्या समोरच्या गल्लीत.' रिक्षावाला.
'हो बरोबर, तिथे आत त्या चाळी आहेत.' मी.
'तिथे नाही साहेब. त्या चाळी समोर एक बिल्डींग आहे. त्या बिल्डींगचं re-development करायचं चालू आहे.' रिक्षावाला.
'मग नंतर किती जागा मिळेल तुम्हाला ?' मी.
'साहेब, माझा आत्ता ६०० एरिया आहे. टू बीएचके आहे.' रिक्षावाला.
मी रिक्षात कोसळायचा बाकी होतो. माझ्यातला ‘माणूस’ ओरडला - नको विचारूस 'तो' प्रश्न.... पण माझ्यातला ‘लेखक’ आणखी जोरात ओरडला – ‘विचार बिंधास! तोंड उघडलं नाहीस तर लिहिणार काय ?'
'माणूस' नविन काळे हरला. सगळी लाज-शरम बाजूला ठेवून लेखक महाशयांनी विचारलं - 'पार्ल्यात टू बीएचके असून रिक्षा चालवता ?'
त्या रिक्षावाल्याला माझ्या सुमार विचारांची दया आली असणार. तो म्हणाला, 'हाही प्रश्न माझ्यासाठी नवीन नाही. साहेब, actually हे घर माझ्या वडिलांनी चाळीस वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं. आमचा एक छोटा कारखाना आहे. बुफे जेवणात शेगडीत जे wax टाकतात ना, त्याचा. फाइव-स्टार हॉटेल्सना आम्ही ते wax पुरवतो. त्या मालाची ने-आण करण्यासाठी ही रिक्षा बरी पडते. उरलेल्या वेळात मी रिक्षाची भाडी घेतो. मी रिक्षा चालवतो म्हणून माझे नातेवाईक-मित्र मला हसतात. पण साहेब तुम्हीच सांगा, रिक्षा चालवतोय, चोरी तर नाही करत ना? मी मिठीबाई कॉलेज मधून बी कॉम केलं आणि वडिलांना आणि भावाला मदत म्हणून या wax च्या धंद्यात पडलो. सकाळी सहा ते रात्री दहा रिक्षा चालवतो. तुम्हीच सांगा साहेब, उद्या माझ्या कुटुंबाला जर काही झालं तर मला हसणारे किती लोक पुढे येऊन मदत करतील ? मला माहित्ये, कोणीच नाही करणार. मेहनत करतोय मी, त्याची 'लाज' का वाटून घेऊ? मी बरोबर बोलतोय ना साहेब ?' तो रिक्षावाला त्याच्या समोरच्या आरशातून माझ्याकडे बघत म्हणाला.
एवढं सगळं ऐकून मीच आता त्याला 'साहेब' म्हणावं असं वाटू लागलं.

'घरी कोण कोण असतं?' लेखक महाशयांची आता भूक चाळवली होती.
'मी, माझे वडील, माझा लहान भाऊ, माझी बायको आणि माझी मुलगी. मुलगी झाल्यावर बायकोला सांगितलं, दुसऱ्या मुलासाठी चान्स घ्यायचा नाही. या मुलीलाच भरपूर शिकवायचं आणि मोठं करायचं. माझी मुलगी आत्ता पाचवीत आहे. उत्पल संघवी शाळेत जाते. माहित्ये ना साहेब, जुहूला अमिताभच्या बंगल्यासमोरची शाळा. तिचा महिन्याचा खर्च तीन हजार वगैरे येतो. पण मी ठरवलंय की कितीही खर्च येऊ दे, मुलीला उत्तम शिक्षण द्यायचं.’
मी काही दिवसातच बाप होणार असल्याचं त्याला सांगितलं.
तो म्हणाला, 'तुम्ही बाप होणारात म्हणून सांगतो. मुलांना तुमचा पैसा नको असतो, खेळणी नको असतात. त्यांना तुमचे संस्कार हवे असतात-तुमचा वेळ हवा असतो.'
माझं घर आलं. मीटर प्रमाणे पन्नास रुपये झाले होते. का कुणास ठाऊक, मी त्याला दहा रुपये जास्त दिले. तो आनंदाने thank you म्हणाला.
मी म्हटलं, 'तुमचा मोबाईल नंबर द्या. मी बाप झालो की कळवेन.' त्याने त्याचा नंबर दिला. मी नंबर सेव केला आणि मोबाईलवर नाव टाईप केलं - विजय जेठवा !
विजय म्हणाला, 'आप को all the best. जो भी होगा वो healthy होगा'
त्यानंतर चार-पाच दिवसातच मी बाप झालो. त्या दिवशी मी आठवणीने त्याला फोन केला. 'मुलगा' झाल्याचं सांगितलं. बातमी ऐकून विजय जेठवा खूष झाला. 'काहीही लागलं तर सांगा' असंही वर म्हणाला.

त्या दिवसानंतर आम्ही ना एकमेकांना भेटलो, ना एकमेकांशी बोललो.
विजय जेठवा मला नक्कीच विसरला असेल, पण मी त्याला विसरणं शक्य नाही.
विजय जेठवासारखी लाखो अनाम माणसं अपार कष्ट उपसत असतील. आयुष्यातला कडवटपणा थुंकून रोजच्या जगण्याला भिडत असतील.
त्यांचा चेहरा भले टीव्ही, वृत्तपत्रात झळकत नसेल पण त्यांच्या पासून जगण्याची प्रेरणा घेणारी त्यांची चिमुरडी मुलंच त्यांचे प्रेक्षक - वाचक असतील.


माझी खात्री आहे की विजय जेठवाला भेटून माझ्या इतकंच तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.
मला वाटतं, हे आश्चर्य वाटण्यातच खरी गोची आहे !
आपण एखाद्या माणसाच्या 'कामधंद्या' वरून त्या माणसाची जात -भाषा ठरवतो. त्याची आर्थिक मिळकत ठरवतो. त्याच्या घराचा एरिया ठरवतो. त्याने कसा विचार करायचा तेही आपणच ठरवतो.... एखाद्याला लेबल फार चट्कन लावतो आपण.
कारण आपण 'गर्दी' असतो !
'गर्दी' ला स्वतंत्र विचार नसतो. Rather कुणी काही वेगळा विचार करू नये याची चोख काळजी 'गर्दी' घेत असते. जे तुरळक लोक वेगळा विचार करतात त्यांना 'गर्दी' बाहेर फेकून दिलं जातं. विजय जेठवा सारखी माणसं 'गर्दी' ला न जुमानता स्वतः चा रस्ता तयार करतात. ते त्यात अपयशी झाले तर 'गर्दी' च्या चेष्टेचा विषय बनतात. पण जर (गर्दीच्या मापदंडाप्रमाणे) यशस्वी ठरले तर तीच 'गर्दी' त्या माणसांना शेंदूर फासून त्यांचा उदो उदो करते.

माझ्या आयुष्यात 'गर्दी'वेगळं करायचे जे काही थोडेफार प्रसंग आले असतील त्यात विजय जेठवाच्या त्या अर्धा तास भेटीचा मोठा वाटा आहे.
'माणूस' नविन काळेला विजय जेठवाचा हात हातात घेऊन हे कधीतरी सांगायचंय !

6 comments:

  1. Good Navinji
    Ajj prathamch tumcha blog vachnat ala ni ithparyant 10 march te 17 feb paryant sagale vachale
    Khup chann
    Asech navin navin kahitari det raha amhala

    ReplyDelete
  2. Navin Saheb ... Mast lihita tumhi...

    One more of the fabulous writings.
    Thanks again.

    ReplyDelete
  3. You giving real valuable thoughts about life in each article.

    ReplyDelete
  4. Excellent Saheb !!

    ReplyDelete
  5. Too good Navin 'Saheb'!

    ReplyDelete