Monday, November 1, 2010

"... फिर वही फुरसत के रात दिन !"

एक 'क्ष' नावाचा मुलगा होता.
शाळा संपवून तो कॉलेजला गेला.
अडखळत का होईना त्याने कॉलेजच्या रंगीबेरंगी विश्वात स्वतःला सामावून घेतले.
मग तो 'सिनिअर कॉलेज' चा विद्यार्थी झाला . कॉलेजचा मोठ्ठा ग्रुप. इतका मोठा की, ग्रुपच्या आत पोरापोरींची लफडी, आपापसात भांडणं, मैत्री, असूया, द्वेष हे सगळं. वर्गात लेक्चरला बसणं 'शान के खिलाफ' वाटू लागलं. नाटकाच्या तालमी, कॉलेजमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मित्रांच्या पार्ट्या यातून काही वेळ उरलाच तर - परीक्षेच्या दोन आठवडे आधी- अभ्यास.
कॉलेजची वर्ष संपली. 'क्ष' चा सगळा ग्रुप फुटला. आधीच्या ग्रुप मधले मोजकेच जण हाकेच्या अंतरावर राहिले. कालांतराने 'क्ष' ला नोकरी लागली. 'वस्तूचा भाव' आणि 'मनातला भाव' यात नक्की कशाला भाव द्यायचा हेच कळेनासं झालं. पुस्तकं, गाणी, गप्पा, छंद, जवळची माणसं, निसर्ग, आरोग्य आणि निवांतपणा या सगळ्याचं गाठोडं दर महिन्याला 'गहाण' ठेवल्यावर बँकेत पगार जमा होऊ लागला.
यथावकाश 'क्ष' ला 'य' नावाची मुलगी आवडली. यथावकाश त्यांचं लग्न झालं. यथावकाश ते दोघे 'पालक' झाले. याचा 'गर्भित' अर्थ असा की 'क्ष' चा रिकामा वेळ बाजारातून पालक आणण्यात जाऊ लागला आणि 'य' चा मोकळा वेळ तो पालक निवडण्यात जाऊ लागला !
रोजमर्रा घामट जगण्यात मित्र मैत्रिणींच्या आठवणी थंड हवेच्या झुळकी पुरत्याच उरल्या.......

कथेच्या या वळणापर्यंत आपण एकत्र असू. पण पुढे कदाचित आपल्या वाटा थोड्या वेगळ्या व्हायची शक्यता आहे. माझ्या वाटेवरून मीही पालकाची जुडी आणायलाच जातो, फक्त फरक असा आहे या वाटेवर मी माझी काही 'आनंद स्थळे' निर्माण करून ठेवली आहेत.
त्यातल्या एकाबद्दल आज जरा विस्ताराने सांगणार आहे आणि त्याचा मुंबई सत्तावन्नशी, म्हणजे, पार्ल्याशी घनिष्ठ संबंध आहे.
एका वाक्यात सांगायचं तर गेली पावणे दोन वर्ष आम्ही मित्र दर शनिवारी 'भल्या पहाटे' सात वाजता पार्ल्यात खादाडी करायला जमतो !
अर्धे मेम्बर्स पार्ल्यातले आहेत आणि अर्धे गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीचे. म्हणजे बिगर पार्लेकर लोक
सात आठ किलोमीटर अंतर पार करून पार्ल्यात येतात.

ही नक्की कसली ओढ आहे ? ऑफिसच्या दिवशी 'पाच मिनिटं आणखीन' असं स्वतःला स्नूझ करत तासभर लोळत राहणाऱ्या आम्हाला, सुट्टीच्या दिवशी सकाळी सहा वाजता खडबडवुन उठवणारे हे घड्याळ कुठले? स्वतःच्या आया-बायकांच्या टोमण्यांचे विखारी बाण पचवण्याची ताकद आणि तयारी कुठून येते ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हा मित्रांच्या भूतकाळात दडली आहेत. कॉलेज नुकतंच पूर्ण झालं होतं. वेगवेगळ्या प्रसंगातून आम्ही काही समविचारी मित्र एकत्र आलो होतो.
‘समविचारी’ हा शब्द मोठमोठ्या चळवळी, उपक्रम यांच्याशी जोडण्याची पद्धत आहे. आमचं मात्र तसं काहीच नव्हतं. नंतर पश्चात्ताप होणार नाही असे सगळे आनंद मुक्तपणे उपभोगणे हा आमचा समान धर्म झाला होता.
लौकिक अर्थाची कुठलीच व्यसनं आम्हाला शिवू शकली नव्हती. परंतु दर शनिवारी गप्पांच्या मैफिली करून रात्र जागवायचं विचित्र व्यसन आम्हाला जडलं होतं. घरच्यांनी दोन तीन आठवडे सहन केलं. मग मात्र त्यांनी आमची अडवणूक सुरु केली. विचित्र वयातली पोरं काहीतरी भलतं करून बसतील अशी रास्त भीती त्यांना वाटली असावी. दारू सिग्रेट पिणारी मंडळी रात्री झोपायला निदान घरी तरी येतात. आम्ही तर पूर्ण रात्र मित्रांच्या घरी 'पडीक ' असायचो. त्यात आम्ही अशा अशा जागी राहायचो की त्यावर घरच्या मंडळींचा विश्वास बसत नसे. उदाहरणार्थ, आमच्या पैकी एक मित्र जिथे राहायचा त्या रामानंद सोसायटीच्या गच्चीवर आम्ही झोपायचो. एका थंडीच्या रात्री गच्चीवर गारठून मेलो असतो म्हणून आम्ही एकदा एका सोसायटीचा हॉल एका रात्रीपुरता भाड्याने घेतला होता ! एकदा तो हॉलही मिळाला नाही म्हणून मित्राच्या शेजारी एकट्या राहणाऱ्या आणि कमी ऐकू येणाऱ्या एका आजोबांकडे आम्ही राहिलो होतो. आमच्या या शनिवार व्रताची महती ऐकून आमच्यातला नसलेला एक मित्र त्याच्या भावाच्या बंद ब्लॉकवर एका शनिवारी आम्हाला घेऊन गेला होता. मला सांगा कुठले आई बाप यावर विश्वास ठेवतील ? बरं जमून तरी असं काय करत होतो आम्ही ? गोल करून बसायचं. लिम्का किंवा थम्स अप ने ग्लास भरायचे. मधे वेफर्स बीफर्स ठेवायचे. आणि अस्सल दारुड्या लोकांना लाजवतील असे भाव चेहऱ्यावर आणून लता-आशा-पंचम-जगजीत-किशोर-गुलजार-पुलं-वपु-शिरीष कणेकर-जावेद अख्तर ऐकत बसायचं. त्याचा मज़ा घ्यायचा आणि त्याच्यावर चर्चा करायची ! म्हणजे गुलजारच्या 'आंधी' वर आणि त्यातल्या गाण्यांवर इतकी चर्चा की आमच्या गप्पा जर कोणी रेकॉर्ड करून ठेवल्या असत्या तर त्याने 'आंधी' वर पीएचडी केली असती. (त्याने केली असती, आम्ही नाही. इस बात पे गौर फ़र्माए ! )
जसजशी एकेकाची लग्न होत होती तस तसे आमच्या शनिवार व्रतामध्ये खाडा पडेल की काय अशी भीती वाटू लागली. म्हणजे लग्नात सासरी जाताना एका बाजूला मुलगी तिच्या आई बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवत हुमसून हुमसून रडत असे आणि एका बाजूला 'शहीद' झालेल्या आमच्या मित्राला निरोप देताना आमचे गळे दाटून येत. 'दोस्त को विदा किया है अलविदा नही' अशी स्वतःची समजूत घालत उरलेले मावळे किल्ला लढवत राहिले. पण आमच्या गडाला खिंडार तेव्हा पडलं जेव्हा आमची सगळ्यांची लग्नं झाली. आमच्या बायकांच्या आवडी-निवडी जपता जपता नाकी नऊ येऊ लागले. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. आमच्या बायका म्हणजे औरंगजेबाच्या बहिणी नाहीत. त्याही रसिक आहेत. त्यांनाही वाचनाची आवड आहे. त्यांनाही चांगलं-चुंगलं ऐकायला आवडतं. पण त्यांचा एकच दोष आहे की त्या ‘मुली’ आहेत ! म्हणजे आम्ही त्यांना उत्साहाच्या भरात मिर्झा गालिब चा शेर ऐकवायला जावं तर त्यांना दुध उताला गेल्याचा वास येतो. आवडलेल्या पुस्तकातील काही चांगल्या ओळी यांना वाचून दाखवाव्यात तर त्यांना समोरच्या भिंतीवर पाल दिसते. त्यामुळे त्यांच्या सगळ्या आवडी या सब्जेक्ट टू - दुध उताला न जाणे, भिंतीवर पाल न दिसणे, उद्यासाठीचा साबुदाणा भिजत टाकायचं याची आठवण न होणे अशा बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतात. असो. दर शनिवारी गुलजारचं 'आज कल पाव जमीपर नही पडते मेरे' ऐकणारे आम्ही आता बायको बरोबर हॉटेल मध्ये जाऊन पावभाजी खायला लागलो. थेटरमध्ये बसून शाहरुख खान असलेले करण जोहरचे सिनेमे पाहणं नशिबी येऊ लागलं. एकेकाळी क्रिकेटची बॅट धरणारे आमचे हात आता साड्या, भाजा, फुलं यांच्या पिशव्या उचलण्यात वाया जाऊ लागले. सगळे मित्र बायका मुलांसोबत भेटलो तर जास्त त्रास होई. कारण आमचे मित्रांचे विषय चालू झाले तर बायका कंटाळत आणि त्यांचे (कशात काही नसलेले) विषय चालू झाले की आम्ही. बरं, शनिवारी रात्री चुकून माकून आम्ही एकटे मित्र भेटलो तर मला बायकोला एक नवा ड्रेस विकत घ्यावा लागायचा. तरी मी त्यातल्या त्यात सुखी. आम्ही एकटे भेटल्याची 'शिक्षा' म्हणून आमच्यातल्या एकाला त्याच्या बायकोने रविवारी भर दुपारी डोंम्बिवलीला तिच्या मैत्रिणीच्या डोहाळ जेवणाला नेलं होतं. शेवटी आमच्या असंतोषाचा कडेलोट झाला. आम्ही दर आठवड्याला भेटायचं ठरवलं. पण त्याला बरेच पण-परंतु होते. मुख्य म्हणजे आपण घरच्यांना वेळ देत नाहीयोत असं आपल्यालाच वाटू नये म्हणून म्हणून घरचे जागे नसतील तेव्हा भेटायचं ठरवलं.
शेवटी असं ठरलं की दर शनिवारी सकाळी सहा वाजता पार्ल्यात भेटायचं. इतक्या लवकर जिथे चहा-नाश्ता मिळेल अशा ठिकाणी जाऊन खायचं, भरपूर गप्पा मारायच्या आणि घरचे उठून आपल्या नावाने शंख करायच्या आत घरी परतायचं. आमची सात आठ सेशन्स झाल्यावर प्रवासात खूप वेळ जातो असं लक्षात आलं. शेवटी पार्ल्यात सकाळी सात वाजता उघडणाऱ्या हॉटेल्सचा शोध सुरु झाला. आमच्या पोटांची आणि गप्पांची भूक भागेल आणि जिथून आम्हाला 'जा' म्हणून सांगणार नाही अशी एक जागा सापडली. गुबगुबीत खुर्च्या, एसी, वाफाळलेला चहा आणि सोबतीला कुठेलेही निर्बंध नसलेले विषय हाताशी असताना तीन तास कसे जात ते कळत नसे. साडे नऊ दहा झाले की घरून फोन येऊ लागत - 'काय यायचंय की नाही घरी? मन अजून भरलं की नाही?’ आलो, येतो, निघालोच, बिलच भरतोय, बाईक वरच बसलोय अशी काहीतरी मोघम उत्तरं देऊन आम्ही आमच्या गप्पा पुढे रेटत असू. तीन तास बसायला मिळावं म्हणून आम्ही आमच्या समोरच्या डिशेस सतत भरलेल्या कशा राहतील याची दक्षता घेत असू. त्याचा परिणाम अर्थातच आमच्या बिलात दिसत असे. परंतु एकमेकांच्या ‘उबेत’ जो आनंद मिळत असे त्याच्या समोर आमच्या बिलाची रक्कम फारच नगण्य असे ! ‘चला पुन्हा जाऊया त्या क्षुद्र जगात !’ असं म्हणत जो तो पुढच्या शनिवारच्या ओढीने आपापल्या घरी जात असे. आमचा निलाजरेपणा आता घरच्या लोकांच्या अंगवळणी पडलाय. उलट आता ते हुशार झालेत. ‘पार्ल्याला जातोस आहेच तर जरा माझी बँकेची कामं करून ये, मोदकाची उकड घेऊन ये, चक्का आण, आजीला स्वेटर देऊन ये’ वगैरे कामांची लिस्ट खिशात घेऊन आम्ही पार्ल्यात न राहणारी मंडळी येतो. मी म्हटलं ना की या वाटेवर पालकाची जुडी आणणं चुकलेलं नाही. पण ती घेण्यासाठी मित्रांबरोबर पार्ल्यात यावं लागतं याचा आनंद मोठा आहे !

आम्ही तीन चार जणांनी सुरु केलेल्या या वेडेपणामध्ये आता आणखी काही वेडे सामील झाले आहेत. सुरुवातीला मी, अतीत महाजन, रोहन मुळे, रोहन आजगांवकर एवढेच होतो. आता त्यात उमेश जोशी, आशय महाजन, देव बोंद्रे, डॉक्टर भाटे, अनिल हर्डीकर ही मंडळी देखील आली आहेत. (विनीत गोरे चित्रपटातील पाहुण्या कलाकारासारखा कधीतरी येऊन जातो. यातील प्रत्येक जण वेगळ्या लेखाचा विषय आहेत. (डॉक्टरांविषयीचा लेख या सदरात आधी येऊन गेला आहे.) देव बोंद्रे, डॉक्टर, अनिल हर्डीकर हे खरंतर आमच्या पेक्षा वयाने वडील आहेत. त्यांच्या अनुभवांना ते आमच्या मजेत लुडबुड करू देत नाहीत म्हणून असेल कदाचित, ते आमच्यात रमतात. इथल्या गप्पांना कुठल्या विषयांचं बंधन नसतं. गाणी, गप्पा, साहित्य, विनोद, राजकारण, खेळ, माणसं या पैकी कुठल्याही विषयावर (इतर भारतीयांप्रमाणे) आम्ही (देखील) अधिकारवाणीने बोलू शकतो. आठवडाभर मुखवटे चढवल्यामुळे जे बोलता येत नाही ते सगळं इथे बोलतो. कधी गप्पा खूप रंगतात, कधी नाही रंगत. 'बुरा मत मानो, होली है' या न्यायाने कोणी कोणाची टोपी उडवायची याचे काही नियम नाहीत. 'मुळात कुठलेच नियम नाहीत हेच आमच्या यशाचं गुपित आहे' असं मी म्हणणार होतो. पण तो सगळ्यात मोठा विरोधाभास होईल. कारण आम्ही जे करतोय त्यात यशस्वी होतोय की नाही हा शोध ज्या दिवशी सुरु होईल तो कदाचित आमच्या भेटीचा शेवटचा दिवस असेल. सुदैवाने ‘ऑर्कुट-फेसबुकच्या’ पाळणाघरात आमची मैत्री मोठी झाली नाही. आमच्या मैत्रीचं बीज आम्ही प्रत्यक्ष भेटत राहून स्वतः मोठं केलं आहे याचं समाधान सर्वात जास्त आहे.

मी आमच्या ‘शनिवार सकाळ’ बद्दल बऱ्याच जणांना संधी मिळेल तेव्हा सांगत असतो.
असंच एका ओळखीच्या माणसाला मी याबद्दल सांगितलं. हे सगळं ऐकून त्याला खूप आनंद झाला. नंतर गप्पांना पंख फुटले आणि ‘पुनर्जन्माचा’ विषय निघाला.
माझा पुनर्जन्मावर फारसा विश्वास नसल्याचं मी त्याला सांगितलं. वाद चांगलाच रंगला.
वादाच्या भरात तो पटकन्‌ म्हणाला, “तुझे ते ‘शनिवारवाले’ मित्र पुढच्या जन्मात चेहरे बदलून, नावं बदलून तुझ्या समोर आले आणि समज, तुम्ही एकमेकांना नाही ओळखलंत.........”
या एवढ्या वाक्यानंतर तो माणूस काय बोलला याकडे माझं लक्ष लागणं शक्य नव्हतं.
तर्कनिष्ठ पुरावे देत वाद घालणाऱ्या मला त्या रात्री झोप लागली नव्हती !

1 comment: