Thursday, February 3, 2011

काहीतरी नविन ! - ३ फेब्रु. २०११

आपण सगळ्यांनी आज सकाळी पेपर उघडला आणि टेलिकॉम घोटाळ्याचा प्रमुख 'सूत्रधार' गजाआड गेल्याचं वाचलं.
टेलिकॉम सेक्टर आणि 'आदर्श' (?) घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका 'राजा' ची गोष्ट आठवली... ती शेअर करतोय.
एकदा एक राजा त्याच्या राजवाड्यामधून फेरफटका मारत होता. एक सेवक राजवाडा झाडत होता.
राजाने चौकशीच्या स्वरात त्याला विचारलं, "काय कसं चाललंय?"
अचानक आलेल्या प्रश्नाने सेवक अवघडून गेला आणि गडबडून जात म्हणाला, "मजेत चाललंय, महाराज."
राजा म्हणाला, "मजेत चाललंय ? म्हणजे तुझ्या आयुष्यात चिंता-बिंता, ताण-बीण काहीच नाही?"
सेवक म्हणाला, "नाही महाराज. मी खूप आनंदात आहे. मला जे पैसे मिळतात त्यात मी आणि माझे कुटुंबीय खूप समाधानी आहोत."
राजा निघून गेला पण त्याच्या डोक्यातून तो 'समाधानी' माणूस काही जाता जात नव्हता.
त्याने तात्काळ प्रधानजीना बोलावले.
"प्रधानजी, सकाळ पासून एका चिंता लागून राहिल्ये. आज मी एक समाधानी माणूस पाहिला. अशी माणसं समाजात असणं फारच धोकादायक आहे. काही तरी करा आणि त्याला 'आपल्यासारखं' बनवा." राजा म्हणाला.
प्रधान हसून म्हणाला, "मला त्या माणसाचे डीटेल्स द्यावेत. पुढचं मी पाहून घेतो."
सकाळी सकाळी 'समाधानी' सेवकाने आपल्या घराचा दरवाजा उघडला. त्याला दरवाजाशी एक पैशांची थैली मिळाली.
त्याने आतले पैसे मोजले. आत नव्व्याणव नाणी होती. सेवकाने विचार केला, शंभर नाणी का नाहीत ? एक नाणं कमी कसं?
त्या दिवसानंतर सेवकाचे आयुष्य बदलून गेले. सेवक दिवस रात्र काम करू लागला. (आपल्या भाषेत सांगायचं तर तो 'लेट सिटींग' करू लागला.) एक दिवस त्याला राजा भेटला. राजाने त्याला तोच प्रश्न विचारला, "काय कसं चाललंय?"
"काही विचारी नका महाराज.... घरी जायला रोज उशीर. गरजा वाढल्यात. त्यामुळे आहे तो पगार अपुरा पडतोय. घरात ताण तणाव, भांडणं..... पूर्वीसारखा आता कुटुंबाला वेळ देता येत नाही... ब्ला-ब्ला-ब्ला....."
अर्धा तास तो सेवक त्याची कर्म कहाणी सांगत राहिला.
सेवक दु:खी झाल्याचं पाहून राजा प्रचंड खूष झाला !
"प्रधानजी, तुम्ही अशी काय जादू केलीत ?" राजाने आनंदात विचारलं.
प्रधानजी (पुन्हा एकदा मंद स्मित करत) म्हणाले, "महाराज, मी त्याला आपल्या 'नाइनटी नाईन ' क्लब चा मेंबर केलंय. आता तो सेवक आयुष्यभर त्याच्याकडे नसलेल्या त्या 'एक रुपयासाठी' काम करत राहील आणि कधीच समाधानी राहणार नाही !"
राजा आणि प्रधान दोघेही मोठ्यांदा हसले.

मित्रांनो, राजकारणी मंडळी आणि आपण यात फरक इतकाच की ते घोटाळे करतात आणि आपण नाही करत.
पण तसं पाहिलं, तर राजकारणी आणि आपण या 'नाइनटी नाईन ' क्लब चेच मेम्बर्स ! फरक आहे तो फक्त भुकेचा !
आपले कुटुंबीय, आपला मित्र-परिवार, पुस्तकं, गाणी, लहानपणी-मोठेपणी जोपासलेले आपले छंद, निसर्ग (आणि आपलं सध्याचं उत्पन्न) हीच आपली ती 'नव्व्याणव नाणी' नाहीत का ?
हे एकदा उमजलं की मग तो 'एक रुपया' कमावण्यासाठी फार आटापिटा करावा लागणार नाही....

राजकारणी मंडळीना शिव्या देण्यापूर्वी उर्दू शायर निदा फाजली काय म्हणतात ते पाहूया -
जब किसीसे कोई गिला रखना
सामने अपने आईना रखना

काय वाटतं तुम्हाला ?

3 comments:

  1. Hi naveen,

    Y velecha mhnje 17 march cha lekh apratim aahe.... dolyatun tipus ladhlya shivaay rahaaat naahi.... hats offf...!!!!

    ReplyDelete
  2. Bhalcahndra PatankarMay 7, 2011 at 8:28 PM

    Hey Naveen,

    Aaj prathamach tumcha blog wachnyacha yog aala. Sagle post wachale. Sapmuch naye ase watat hote. Asech navin navin post karat raha. Mala yawar ek atishay changli serial / malika hoil ase watate. Pratekachya manatali khanta, awad, sukha, dukha tumha lekhak lokana nemki samajtat. Khup anand zala sagle post wachun. Punha ekda thanks for the posts. Ekhada producer wagaire milala serial karayala tar nakki call karen. :) Thanks n regards

    ReplyDelete
  3. Dhannyawad saheb... Mast lihita tumhi..

    Running through all ur blogs..
    Still a few to finish n want to read them, cant wait....

    Thanks alot...

    ReplyDelete