Wednesday, July 7, 2010

हनुमान रस्ता - मुंबई ५७


'साडी में साडी पराग साडी' असेल आणि 'भाजीत भाजी मेथीची' असेल तर पार्ल्याच्या बाबतीत 'रस्त्यात रस्ता हनुमान रस्ता' असं म्हणावं लागेल. प्रत्येक गावात त्या गावाच्या संस्कृतीचा आरसा दाखवणारा असा एक तरी रस्ता असतोच असतो. पार्ल्यात नेहरू रोड आहे, दिक्षित रोड आहे, मालवीय रोड आहे, महंत रोड आहे, एम जी रोड आहे, नरीमन रोड आहे, पण हनुमान रस्त्याची मजाच काही और आहे. म्हटलं तर चार-'चौकां' सारखा तोही एक साधा डांबरी रस्ता आहे. पण या डांबरी रस्त्याखाली "bermuda triangle" आहे हे कित्येकांना माहित नसेल. खरंच ! ऑफिस मधून माझा घरी जायचा रस्ता रिजन्सी हॉटेल वरून सरळ पुढे अंधेरी फ्लायओवर कडे जातो. मी कित्येक वेळा वाट वाकडी करून (रिजन्सीला लेफ्ट घेऊन) - व्हाया हनुमान रस्ता - घरी गेलेलो आहे. कुठल्याही हेतू शिवाय, कुठल्याही कामाशिवाय. जसजसा हनुमान रस्ता जवळ येतो तसा मी माझ्या बाईकचा वेग कमी करू लागतो. महिला संघावरून सरळ पुढे आलं की हळूहळू हनुमान रस्ता दिसू लागतो. संध्याकाळच्या वेळी तिथल्या चौकात वाहनांचा नुसता काला झालेला असतो. तो भेदून उजवीकडे वळलं की मुख्य हनुमान रस्ता लागतो. मी हळूहळू "bermuda triangle" मध्ये शिरू लागतो.... गोकुळ चहावाल्याच्या उंबरठ्यावरून कोणीतरी गप्पिष्ट हाक मारतोय असा उगाचच भास होतो. 'पंकज' कडचे ताजे सामोसे, पणशीकर स्वीट्स मधले साबुदाणे वडे आपलं चित्त विचलित करण्यासाठी तेलकट-गरम वायू हवेत सोडत असतात. ओळखीचे चेहरे दिसतात. ओळखीचं हसतात. हात करतात. ... दोन मिनिटं थांबून गप्पा मारतात... लहान मुलांच्या गोष्टीत असतं तसं इथे मागे वळून पाहिलं की सगळा खेळ संपणार असतो, घरी जायला उशीर होणार असतो. मोहाचे एक एक अडथळे पार करत मी पुढे पुढे जात राहतो. कुठल्याही मोहाला बळी न पडता सरळ घरी जायचं म्हणजे सत्व परीक्षा असते. आणि त्यातही ही सत्वपरीक्षा नापास होण्यात जास्त आनंद आहे हे ओघाने आलंच!

विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशन आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारे मुख्य आणि एका रेषेत जाणारे असे पार्ल्यात दोन रस्ते आहेत. एक नेहरू रोड आणि दुसरा हनुमान रोड. नेहरू रोड नागमोडी जाणारा. हनुमान रस्ता नाकासमोर सरळ जाणारा. इतका की, या टोकावर उभं राहिलं की त्या टोकाचं दिसावं. हनुमान रस्त्याच्या एका टोकाला - म्हणजे हायवे च्या बाजूला – मारुतीचं देऊळ आहे म्हणून हा हनुमान रस्ता. एवढी एक गोष्ट सोडता मारुतीचा आणि या रस्त्याचा काही एक संबंध नाही. अर्थात, तो असायचीही गरज नाही.

पार्ल्याचा इतिहास तसा सर्वश्रुत आहे. 'इडले-पाडले' या मूळ गावाचे काळाच्या ओघात दोन भाग पडले. पश्चिमेला इडले -म्हणे आताचे इरले किंवा इर्ला राहिले. पूर्वेला पाडले म्हणजे आताचे पार्ले राहिले. त्याच 'पाडले' गावातला हा हनुमान रस्ता. पार्ले पूर्व स्टेशन पासून तेजपाल रोडचं बोट धरून चालत येणारा. पुढे उजवीकडे मोठं वळण दिसताच आपली स्वतःची वाट निवडून एका मार्गाला 'महामार्गात' विलीन करणारा ! आधी म्हटलं तसा नाकासमोरून सरळ जाणारा, पण निरनिराळ्या अर्थांनी पार्ल्यातला सगळ्यात 'रंगीत' रस्ता! बरोब्बर एक किलोमीटर लांबीचा, समान रुंदीचा - पण ‘क्षेत्रफळ' विचाराल तर मुसाफिरागणिक बदलत जाणारं!

या रस्त्याला आडवे छेद देणारे तीन रस्ते आहेत. पहिला पार्लेश्वर मंदिराजवळ. प्रार्थना समाज रोड संपतो तिथे दुसरा छेद. आणि संत जनाबाई मार्ग जिथे संपतो तो तिसरा छेद. असे तीन छेद जाऊनही हनुमान रस्ता अभंग राहतो. पण गम्मत म्हणजे, हे तीन छेद जाऊन हनुमान रस्त्याचे 'तीन स्वभाव' समोर येतात. एकाच घरात वाढलेली तीन मुले तीन वेगळ्या स्वभावांची असू शकतात तसाच काही हनुमान रस्त्याचं झालंय. कसा ते सांगतो.

'पार्ले' उद्योग समूहाच्या 'चौहान' कुटुंबियांचा "शांती कुंज" नावाचा टुमदार आणि देखणा बंगला जिथे आहे तिथून हनुमान रस्ता सुरु होतो. तिथपासून ते जैन मंदिरापर्यंतचा हनुमान रस्ता हा खूप वेगळा आहे. शांत - अलिप्त. 'मी बरा आणि माझं काम बरं' या प्रकारचा. पलीकडच्या 'मायावी' जगाशी नातं न जोडणारा. वारशात कमी मालमत्ता वाट्याला आलेल्या एखाद्या दुखावलेल्या भावासारखा. नोंद करावी अशा तीनच गोष्टी या रस्त्यावर आहेत. 'शांती कुंज' बंगला, जैन मंदिर आणि ‘वाघ-बकरी’ टी-लौंज.

'मैने जबसे होश संभाला है तबसे' या जैन मंदिराची डागडुजी चालू आहे. जैन मंदिराच्या तळाशी 'कबुतरखाना' आहे. शिवाय पैसे देऊन गायींना चारा द्यायची सोय आहे. त्याच्या समोरच्या बाजूला 'वाघ-बकरी' टी-लौंज आहे. आमचा एकेकाळचा शनिवार-सकाळ ग्रुपचा अड्डा. एसी लौंजमध्ये बसून कितीही वेळ गप्पा मारत चहा प्यायची तिथे सोय आहे. या रस्त्यावर काही विशेष घडत नसतं. माणसांपेक्षा कबुतरंच जास्त दिसतात.

ज्याला खराखुरा 'हनुमान रस्ता' म्हणता येईल तो 'बँक ऑफ इंडिया' पासून सुरु होतो. हा रस्ता घरातल्या मनमिळावू- हौशी-खोडकर-आनंदी मुलासारखा आहे. प्रसूतिगृह, पाळणाघर, शाळा, दवाखाना, हॉटेल्स, मैदान, ब्युटी पार्लर्स, पोलीस चौकी, बँका, दुकानं, मंदिर, खाण्याच्या गाड्या, लग्नाचा हॉल, कोचिंग क्लासेस अशा प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणारया गोष्टी या एवढ्याश्या रस्त्यावर आहेत. नावात 'हनुमान' असून संपूर्ण रस्त्यावर व्यायामशाळा मात्र कुठेच दिसत नाही. आज जिथे Cosmos Bank आहे तिथे पूर्वी म्हात्रे पुतळा कारखाना होता. त्याच्याच शेजारी पूर्वी भन्साळीवाडी होती. तिथे म्हणे दांडेकर आणि देवरुखकर अशी दोन कुटुंबे होती. त्यांच्या घरी गणपतीची खूप सुंदर आरास होत असे. इतकी की, बाहेरचे लोक सार्वजनिक गणपती बघायला आल्यासारखे त्यांच्या घरात येत असत. मुलांच्या ट्रिप्स येत असत. घरातल्या लोकांना स्वतःला राहण्यासाठी जागा नसे पण पाहुणचार जबरदस्त ! म्हणून मघाशी म्हटलं होतं ना की, इथलं क्षेत्रफळ माणसागणिक बदलणारं असतं ! याच रस्त्यावर सुप्रसिद्ध पार्ले टिळक शाळेचा काही भाग येतो. पूर्वी म्हणे या शाळेची कौलारू प्रयोगशाळा या रस्त्यावर होती. पार्ले टिळक शाळेसाठी ज्या गल्लीतून जावं लागतं त्या गल्लीच्या नाक्यावर "बाबूचा वडापाव" हे खवय्यांचं तीर्थक्षेत्र आहे. (ज्याच्याबद्दल मी मागे एका लेखात सविस्तरपणे लिहिलेलं आहेच. बाबूची वडापावची गाडी ज्या चौकात लागते त्या चौकाचं नाव "नरसिम्हन मामा चौक" आहे. आता बाबूची गाडी नरसिम्हन मामा चौकात लागते असं म्हणायचं की नरसिम्हन मामा चौक 'बाबू वडापाव' च्या बाजूला आहे असं म्हणायचं, हा वादाचा मुद्दा आहे. त्याच्या समोर "सन्मित्र सोडा" सेंटर आहे. 'रॉकेटसिंग' सिनेमात ज्या माणसाच्या गाडीवर रणबीर कपूर नेहमी डोसा खाताना दाखवलाय त्या माणसाचं हे डोसा सेंटर आहे. थोडं पुढे गेलं की दुकानांची खूप मोठी लाईन लागते. ते आहे नारायणनगर. 'शिवलीला' बार त्याच लाईनीत येतो. (आता बरोब्बर कळलं नं, नारायणनगर कुठे आहे ते!) त्या दुकानांच्या मागे, समोरून न दिसणारी अशी खूप मनुष्यवस्ती आहे. त्यात बहुतांशी गुजराती-मराठी लोकवस्ती. त्या वस्तीत आजही १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला प्रमुख पाहुणा बोलावून वगैरे झेंडावंदन केलं जातं. शिवलीलाच्या उजव्या बाजूला आतमध्ये खवय्यांसाठी आणखी एक तीर्थस्वरूप व्यक्ती असते. ती म्हणजे हनुमान रस्त्यावरचा भेळवाला ! गम्मत बघा, technically, हा भैया हनुमान क्रॉस रोड वर असतो, हनुमान रस्त्यावर नाही. तरी तो हनुमान रस्त्यावरचा एक म्हणून गणला जातो. पाकिस्तानी गायक आपल्याला जसे 'आपल्यातलेच' वाटू लागलेत तसंच काहीसं ! आपल्या जिभांना (पोटांना म्हणत नाहीये) आनंद देणाऱ्या या भैयारुपी सुगरणीच नाव किती लोकांनी आपणहून विचारलं असेल ? I ३२ वर्ष नुसती भेळपुरी विकून चरितार्थ चालवणाऱ्या माणसाचं नाव राजनारायण गुप्ता ! पुढच्या वेळी जाल तेव्हा गुप्ताजींना नावाने हाक मारली की पाणीपुरीची एक पुरी जास्त मिळते कि नाही ते बघा !

जगातल्या सगळ्या 'सेल-फिश' लोकांची पंढरी 'गजाली' याच रस्त्यावर! सचिन तेंडूलकर, राज ठाकरे, सुरेश वाडकर, आशा भोसले वगैरे मंडळींना गजालीच्या लौंजमध्ये बसून तोंडात सुटलेलं पाणी लपवताना मी या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. या गजालीच्या लौंज मध्ये संध्याकाळी अनुराधा पौडवालच्या आवाजातलं 'श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ' हा गजर सतत चालू असतो. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असं सांगणारे स्वामी समर्थ क्वचित प्रसंगी किचन मधील माशांच्या मागे उभे राहिले तर मात्र अनर्थ ओढवेल हे नक्की ! गजाली, पणशीकर स्वीट्स, गोकुळ, ICICI बँक, भोवतीचा सगळा परिसर हा मायावी आहे यात शंकाच नाही. माणसं तिथे नक्की काय करायला आलेली असतात आणि काय करत असतात हा एक संशोधनाचा विषय आहे. मी तर म्हणेन, विनाउद्देश तिथे उभं राहून गावगप्पा करण्यासारखं दुसरं सुख नाही. गोकुळच्या चहाचा ग्लास हातात धरूनआकाशाकडे बघत, तोंडातून सिगारेटचा धूर एका रेषेत सोडत माणसं जे काही बरळत असतात ते नुसतं ऐकत बसावं. ओबामा 'असं' म्हणायला नको होता, सचिन 'तसं' खेळायला नको होता, लताने आता गाऊ नये, property मार्केट कधीही पडू शकतं, समोरून येत्ये तिच्या बाबांना सोसायटीत जांबुवंत म्हणतात, पार्ल्यात आता पूर्वीची मजा राहिली नाही, करीना कपूर रोज एकशे पाच सूर्यनमस्कार घालते अशी कुठल्याही प्रकारची पौष्टिक माहिती इथे मिळू शकते. ओर्कुट, फेसबुक वगैरे ब्याद हल्लीहल्लीची. इथे समोरच्याला एक चहा पाजला कि एखादीचं पाहिजे ते प्रोफाईल मिळण्याची सोय इथे उपलब्ध आहे. थोडक्यात स्वर्गात लग्नाच्या गाठी मारायचं काम ब्रह्मदेवाने हल्ली अशा नाक्यांना outsource केलेलं आहे, असं म्हटलं तर ते चूक ठरू नये !

CCD पासून हनुमान रस्त्याचा तिसरा आणि शेवटचा भाग सुरु होतो. मधल्या 'भावाने' जर मेरे पास पार्ले टिळक है, गजाली है, पणशीकर है, जनता बँक है, बाबू का वडापाव है, शांती कुंज है, क्या है तुम्हारे पास... ? असं विचारताच हा तिसरा भाऊ शांतपणे म्हणेल - मेरे पास 'हनुमान मंदिर है !' कारण संपूर्ण रस्त्याचं अस्तित्व ज्यामुळे आहे ते हनुमान मंदिर या भागात आहे. आत्ता जिथे CCD आहे तिथे पूर्वी 'पितळे' यांची खानावळ होती. तिथे बऱ्यापैकी स्वस्तात जेवण मिळत असे. सगळ्या रिक्षावाल्यांचा तो दुपारच्या जेवणाचा अड्डा असे. CCD आल्यापासून ग्राहक वर्ग बदलला. एक कॉफी मागवून वाट्टेल तितका वेळ गप्पा मारत बसायचं. बिलात पैसे आकारले जातात ते त्या कॉफीचे नाहीत, तर काही तास जागा वापरली त्याचे. अर्थातच तरुण-तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय. त्याच्याच बाजूला 'dafodils' हे उड्प्याचे हॉटेल. अत्यंत लोकप्रिय. त्याच्याच बाजूला सत्कार बार. तिथे बसून माणसं गप्पांचे 'षटकार' मारतात असा पार्ल्यात एक जुना विनोद आहे. त्याच्या समोर दत्ताचं प्रशस्त मंदिर आहे. त्याच्या समोरच्या बाजूला चार दुकानं सोडून 'गणेश मिसळ' आहे. खूप कमी पैशात त्याच्याकडे 'बरी ' मिसळ मिळते. नोकरी लागायच्या आधी आम्ही गणेशकडे मिसळ खायला जात असू. तिथे बसलं की मिसळ खाता खाता १० मिनटात केस पांढरे होत असत. आम्हाला आधी वाटलं की तिखट खाऊन केस पांढरे होतात कि काय. नंतर त्याचं रहस्य उलगडलं. त्याच्या शेजारीच एक पिठाची गिरणी होती ! उरलेला हनुमान रस्ता पुढे पुढे बकाल होत जातो. नरेश सिरामिक, जनता फरसाण, पुखराज हिरालाल ज्वेलर्स, वगैरे मूळ पार्ल्याशी नातं न सांगणारी मंडळी इथे दिसतात. हनुमान रस्त्याच्या सीमेवर राहणारी ही मंडळी मला भारतातल्या आसाम-मेघालय सारखी वाटतात. मधल्या हनुमान रस्त्यावर गुढी पाडव्याची शोभा यात्रा निघो किंवा मारामारी होवो, या लोकांना त्याचं काही सोयर सुतक नसतं..!


या संपूर्ण रस्त्याचं माझ्या आठवणींच्या राज्यात खूप मानाचं स्थान आहे. चालत, बाईकवरून, गाडीतून असा या रस्त्यावर मी हजारो किलोमीटर प्रवास केला आहे. बायको प्रेयसी असताना सुखी संसाराची स्वप्नं इथेच रंगवली आहेत आणि ती प्रेयसी बायको झाल्यावर जमा-खर्चाची बेरीज वजाबाकी देखिल इथेच केली आहे. मित्रांबरोबर इथेच उनाडक्या केल्या आहेत. वजन कमी करण्याच्या शपथा घेऊन जिथे उभे आहोत तिथेच मागे वळून ‘पणशीकर स्वीट्स’ कडचा साबुदाणा वडा खाण्यासाठी जो निर्लज्जपणा लागतो तो रस्त्यावर फिरून कमावलेला आहे.. निर्लज्जपणा वरून आठवलं. फार फार फार वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र रोहन मुळे एकदा हनुमान रस्त्यावरील मारुतीच्या देवळासमोरून जात होतो. समोरून एक फारच सुंदर मुलगी चालत येत होती. मी रोहनला काही खुणावणार- सांगणार - बोलणार तेवढ्यात रोहन म्हणाला, "तुला हे माहित्ये ना कि आपल्या सुदैवाने हिला अशीच दिसणारी एक जुळी बहीण आहे !" मी हसून हसून त्या ब्रह्मचारी मारुतीराया समोर लोटांगण घालायचा बाकी होतो.

(अभूतपूर्वचे संपादक) अनिल हर्डीकर यांचं घरही याच रस्त्यावर आहे. चार-पाच वर्षांपूर्वी दोन ऑक्टोबरला आम्ही हनुमान रस्त्यावर एक आगळा वेगळा उपक्रम केला होता. मुख्य रस्त्यावर एका छोट्या टेबलावर त्या दिवसाची वर्तमानपत्रं ठेवली. बाजूला एका किटलीत चहा भरून ठेवला. तिथेच बाजूला प्लास्टिक ग्लास ठेवले. बाजूला पैसे टाकण्यासाठी एक रिकामा डबा ठेवला. एका छोट्या बोर्डावर 'सेल्फ-सर्विस' चं आवाहन होतं. बस्स. पहाटे सहा ते सकाळी दहा तिथे ज्या ज्या मजा झाल्या त्या खरं तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. सुदैवाने त्या सगळ्या मजा एका hidden camera ने बंदिस्त केल्या आहेत !

एखादी गोष्ट का आवडते किंवा नावडते याचा दोन अधिक दोन इतका सरळ हिशोब कधीच नसतो. शेपूची भाजी मागून मागून खाणारे आणि आंबा न आवडणारे या जगात आहेत. म्हटलं तर हनुमान रस्त्यावर जी काही मौज मजा आहे ती इतर काही रस्त्यांवर देखील मी अनुभवली आहे. उलट त्या बाबतीत काही रस्ते हनुमान रस्त्यापेक्षा कणभर उजवेही असतील. फाईव्ह स्टार हॉटेल मधली गुबगुबीत उशी आणि जिच्या शिवाय झोप लागत नाही अशी अभ्रे काळे पडलेली घरची खडबडीत उशी यांची तुलना कधीच करायची नसते. At the end of the day, आपल्याला शांत झोप कुठे लागते ते महत्वाचं !

माझ्या आयुष्यात घडलेल्या रंगीत आठवणींचा हा रस्ता साक्षीदार आहे. 'आंधी' मधल्या एका गाण्यात गुलझार लिहितो,

"ये सोचते बैठी हुं.. इक राह तो वह होगी.. तुम तक जो पहुच्ती है !

असाच हनुमान रस्ता देखील 'मुंबई ५७' पार करून माझ्या पर्यंत पोहोचतो आणि माझं बोट धरून मला पुढे नेतो.

4 comments:

  1. dafodils la mi javal javal 6 mahine dar ravivari jevayala jaat hoto. tithala chiku shek aani kofta amacha favorite hota.

    maja yayachi ... andheri (SIPZ) kadun bahudaa 155 ne mi yet hoto. aathavani jagyaa zalyaa...

    ReplyDelete
  2. its awesome mr navin..................

    ReplyDelete
  3. mi aaj prathamch vachat hoto, mitracha ha email tasa khup juna pan aaj vel bhetala online aslyane sarvach lekh vachale, manapasun aavadal, mhanun comment lihali. kale aadnavala shobhel aasch kahitari kartoyas, aamchya nashibi v. p. kale aata nahit mhanun tuza sahavas aavdel, aasach lihit ja khup khup shubhechha.

    ReplyDelete
    Replies
    1. manani kevach parlyala pohochlo!!!!!

      Delete