Thursday, June 30, 2011

काहीतरी नविन ! ३० जून २०११

You live life only once. But if you live it right, once is enough.
- Unknown


फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घ्यायच्या आधी फोनमधल्याच घडाळ्यात पाहिलं. सव्वा पाच वाजले होते. इतक्या अवेळी फोन आला होता की ज्यांच्याबद्दल ‘वाईट’ बातमी ऐकू येऊ शकते अशी नावं झर्रकन स्मरून गेली. (अशा वेळी ‘अपराधी’ वाटून घ्यायचं नसतं. सनईचे सूर ऐकून मेंदू मंगल प्रसंगच डोळ्यासमोर आणतो, इतकं सहज असतं हे.) मी धडधडत्या छातीने फोन घेतला. खरं तर “कोण?” असंच विचारणार होतो पण सवयीने ‘हॅलो’ म्हणून गेलो.
‘नविन, अंशुमान बोलतोय....अंशुमान गुप्ते....’
‘हां हां....बोल रे...काय झालं ?’
‘अरे आपले समेळ सर गेले.’
हे नाव मघाशी सुचलेल्या यादीत नव्हतं.
‘काय सांगतोस? कधी?’ .
‘काल रात्री. ब्लाब्ला ब्लाब्ला....ब्लाब्ला ब्लाब्ला...
‘ओके. पोचतो मी.’

डोक्यात समेळ सरांच्या आठवणींचा बॅकग्राउंड ट्रॅक चालू ठेवत सगळे प्रातर्विधी यंत्रवत पार पाडले. सवयीने गिझर ऑन केला. मग आठवलं, आंघोळ ‘आल्यावर’ करायची असते. गिझर बंद करून बेडरूममधे आलो. वॉर्डरोब उघडला. इस्त्री केलेल्या शर्ट्समधून एक पांढऱ्याच्या जवळपास शर्ट निवडला. (हे संस्कार हिंदी सिनेमाचे !) माझ्या या खुडबुडीने अर्धवट जागी झालेल्या बायकोला कुठे जातोय ते सांगितलं आणि घराबाहेर पडलो. आठवणीच्या पसाऱ्यातले फक्त समेळ सरांच्या मालकीचे क्षण मृत्यू नावाच्या चुंबकाला चिकटत होते. सरांचा चेहरा, त्यांचा आवाज डोक्यात भुंगा घालत होते. मृत माणसाच्या आठवणी Recycle Bin मध्ये फेकायच्या आधीची मेंदूची ही यंत्रणा असावी.

सरांच्या बिल्डिंगपाशी गुप्ते उभाच होता. थोड्या थोड्या अंतराने माणसं घोळके करून उभी होती. गुप्ते बरोबर सरांच्या घरी गेलो. उदबत्तीच्या एका गोडसर वासाने आणि काही स्त्रियांच्या अस्फुट हुंदक्यांनी खोली भरून गेली होती. समेळ सर आम्हाला पीटी शिकवायचे. त्यांना नेहमी आमच्या बरोबर खेळताना बघायची सवय. शांतपणे पहुडलेल्या अवस्थेत सरांना प्रथमच पहात होतो. शाळेत असताना समेळ सर कर्दनकाळ वाटायचे. क्षणभर वाटलं, आत्ता उठतील सर आणि म्हणतील, ‘काळे, पंचवीस सूर्यनमस्कार घातल्याशिवाय घरी गेलास तर उल्टा टांगेन उद्या !’ अश्रुपिंड डचमळण्यासाठी एवढा विचार पुरेसा होता. मी सरांकडे बघत तसाच उभा होतो.
‘बॉडी कधी न्यायच्ये? कोणीतरी विचारलं.
‘नागपूरहून शकुताई आली की निघू.’ ज्याला प्रश्न विचारला होता तो म्हणाला.
एक एक काडी जमवून स्वतःचं घर घ्यायचं. घराबाहेर अभिमानाने स्वतःच्या नावाची पाटी लावायची. मिशीला तूप लावून ‘माझं घर माझं घर’ करत आयुष्यभर चारचौघात मिरवायचं आणि मेल्यावार आपल्याच घरात आपली ओळख काय ? – बॉडी ! मान गये यमराज !
सरांना नमस्कार करून खाली आलो.

गुप्ते बरोबर एका कडेला उभा राहिलो. शाळेतली आणखीही काही मुले आली होती. बिल्डींगच्या प्रवेशाजवळच ‘दुःखद निधन’ हेडिंगचा हार लटकवलेला एक फळा उभा केलं होता. जाणारे येणारे क्षणभर थबकत, फळा वाचत आणि पुढे जात. तिरडी बांधणे हा जणू पिढीजात व्यवसाय असल्याच्या उत्साहात काही माणसं अशा ठिकाणी वावरत असतात. गीतेमध्ये सांगितलेली स्थितप्रज्ञ माणसाची सगळी लक्षणं मला या माणसांमध्ये दिसतात. मला या माणसांचं प्रचंड कौतुक वाटतं. चेहऱ्यावर दुःखाची एक रेष उमटू न देता ही माणसं खाली मान घालून आपलं काम करत असतात. त्या पंथाची काही माणसं इथेही होती. बाकीचे घोळके करून उभे होते. गप्पांना ऊत आला होता.

‘परवा भेटलेले हो, जराही वाटलं नाही की आज अशी बातमी ऐकू येईल. चौधरी, तुम्हाला सांगतो, हल्लीच्या जगात माणसाचा काही भरवसा राहिलेला नाही.’
‘बाकी माणूस छान ! सकाळी मला हाक मारल्याशिवाय दिवस सुरु होत नसे यांचा ! प्रत्येक गोष्ट करताना मला विचारणार म्हणजे विचारणार. घरात काहीही नवीन गोष्ट घ्यायची म्हटली की माझा सल्ला घेणार म्हणजे घेणार. किती वेळा त्यांना सांगितलं माझ्याबरोबर ब्रह्मविद्येला चला. पण शेवटी तशी बुद्धी व्हावी लागते हो !’
‘आज आमच्या लाफ्टर क्लब मध्ये समेळ गेल्याचं समजलं. मग आम्ही काय केलं, समेळ काकांना आवडणारा लाफ्टर एक्सरसाइज करून त्यांना श्रध्दांजली वाहिली !’
‘पाणी आणायला म्हणून सुनबाई आत गेली आणि बाहेर यांनी प्राण सोडला. म्हणजे बघा ठाकूर, आपण दहा वर्षांनी अमुक होणार तमुक होणार वगैरे गप्पा मारतो पण (आकाशाकडे बोट दाखवत) ‘तिथून’ आमंत्रण आलं की त्याला अपील नाही. बाय द वे, ते म्युचल फंडाचे फॉर्म्स सह्या करून ठेवलेत. तुमच्या माणसाला सांगून ते कलेक्ट करा जरा.’
‘बरं झालं आज पाऊस नाहीये. नाहीतर च्यायला ती एक कटकट असते.’
‘त्यांचा भाऊ पाहिलात ? हां तोच हिरव्या शर्टातला. डोळ्यात पाण्याचा टिपूस नाहीये. त्याचं फार बरं नव्हतंच म्हणा ! आपल्या मराठी लोकांना भाऊबंदकीचा शापच आहे साला !’
‘बरं झालं स्वतःच्या पक्षातच राहिले. बाहेर कुत्रं विचारणार नाही, म्हणावं !’
‘मी सरळ सांगितलं अमोलला. या रद्दी परीक्षा देत राहिलास तर जास्तीत उत्तम दर्जाचा कारकून होशील. सरळ मला बिझनेसमध्ये जॉईन हो !’
गप्पा ऐकून उबायला झालं. जवळची चहाची टपरी शोधली आणि कटिंग पीत उभा राहिलो.

तसं पाहिलं तर जन्माला आलो तेव्हाच मृत्यू निश्चित झाला होता. म्हणजे, जन्मापेक्षा मृत्यूच अटळ.
निश्चित येणार पण कधी येणार हे अनिश्चित ! मृत्यू ही संकल्पना या दृष्टीने फारच थ्रिलिंग आहे. परीक्षेचा पेपर आपण घाईघाईने लिहित असावं, आणि 'टाईम आउट' म्हणत कुणीतरी खस्स्कन् पेपर खेचून घ्यावा तसाच मृत्यू येत असावा. पेपर किती लिहिला यापेक्षाही पेपर अपुरा राहिला याचीच बोच जास्त !
अशा प्रसंगी हटकून आठवणारी म्हाताऱ्या सुताराची गोष्ट आत्ताही आठवली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका सुताराला त्याच्या मालकाने एक घर बांधायचं काम दिलं. सुतार आधीच कामाला कंटाळला होता, त्यात आणखी एका कामाची भर ! अनेक दोषांकडे दुर्लक्ष करत त्याने ते घर कसंतरी बांधून पूर्ण केलं. त्या घराच्या बांधकामात खूप दोष होते पण ते फक्त सुतारालाच माहित होते. निवृत्तीच्या दिवशी सुतार मालकाचा निरोप घ्यायला गेला. सुताराने बांधलेल्या त्या ‘शेवटच्या घराची’ चावी मालकाने सुतारासमोर ठेवली आणि म्हणाला – ‘तुमच्या निवृत्तीनिमित्त ही माझ्याकडून भेट !’ सुताराच्या पायाखालची जमीन सरकली. सुतार मनात म्हणाला, ‘हे घर मी माझ्यासाठी बांधतोय हे जर आधी माहिती असतं तर मी ते जास्त छान आणि मजबूत बांधलं असतं !'

माझा फोन वाजला. 'हां बोल गुप्ते ! बॉडी नेतायत्? आलो दोन मिनटात !'

हे दरवेळचं आहे.
कोणीतरी मरणार-आपल्याला विरक्ती येणार-सुताराची गोष्ट आठवणार-मग समरसून वगैरे जगावंसं वाटणार.
त्या दिवशी घरी जाताना बायकोला गजरा घेऊन जाणार, घरी जाऊन मुलाच्या केसातून हात-बीत फिरवणार.
दुसरा दिवस उजाडणार. नीट घडी करून ठेवलेला 'अमरपट्टा' आपण पुन्हा बाहेर काढणार आणि पुढची ‘बातमी’ ऐकू येईपर्यंत आपल्या अंगावर मिरवत राहणार.
आपला स्वतःचा पेपर खस्स्कन् खेचून घेतला जात नाही तोवर हे असंच चालणार !

17 comments:

  1. Masta lekh lihila aahe...very practical...hats off to your writing

    Saurabh Shende
    saurabhsshende@gmail.com

    ReplyDelete
  2. lekh aavadla shewati he asech chalayache
    good writing skill

    ReplyDelete
  3. chhan lihila aahe..tiradi bandhaiche kam mipan karato..tyache ek shastra aste tyamule tithe concentrate karawe lagate..gharabaddal lihile aahe te apratim..good work...keep writing

    ReplyDelete
  4. Farach chan lihilayt. Pahila post wachla ani saglech wachat gele. Wish I could write like you. Keep writing!

    ReplyDelete
  5. तुमची लिखाणाची शैली आवडली . माणूस गेल्यावर त्याची बॉडी होते हा विचार कधी लक्षात आला नव्हता . असे का ? याचे विचारचक्र सुरु झाले कुणी गेल्यावर आपण समरसून जगायला हवे ही भावना खरेच काही काळच टिकते . मग पुन्हा सारे पहिल्यासारखे आपण जगत राहतो . माणूस जन्माला येताना पण रडतच येतो . निसर्गत: रडत जगणे हाच माणसाचा स्थायीभाव आहे का ? माणूस सातत्याने आनंदात नाही राहू शकत !

    ReplyDelete
  6. मस्त आहे छान आहे अस कौतुक करायचं आणि पुढे चालायचं... ह्याच्या पुढचा विचार करायला लावणारा लेख... अजून उतरत नाहीये मनातून.. थोडा वेगळा लेख वाचल्याची भावना नेहमी राहील मनात.. sarcastic statements have worked well and proper in this... अमरपट्टा फार आवडला ... लेखाचा शेवट हि नेमका... दगड झालेल्या आपल्या जीवनाला चांगला शेंदूर फासलाय... आभारी

    ReplyDelete
  7. मृत माणसाच्या आठवणी Recycle Bin मध्ये फेकायच्या आधीची मेंदूची ही यंत्रणा असावी... hi line mala phar awadli. Lekh uttamach jhala ahe.

    ReplyDelete
  8. sir very well written....

    ReplyDelete
  9. for once, i've read something different and something that makes a difference... in this world of superficial social networks, you seem to be one person, whose writings and thoughts i would earnestly look forward too... thank you for being the silver lining to the dark cloud that has set upon us all in this fast paced, rat raced existence... cheers, once again !!!

    ReplyDelete
  10. फारच छान. नवीन, शाळेत असताना तू फक्त चांगला गायक म्हणून माहिती होतास. पण गेले काही महिने तुझा ब्लॉग वाचून तू उत्तम लेखक आहेस हेही कळलं. तुझं हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
  11. very nicely written mitra!!!

    ReplyDelete
  12. Dear Writer,
    It is a good piece of practical writing. Really line by line till end everything touches to heart.

    ReplyDelete
  13. युधिष्ठीराने जगातलं सर्वात मोठं आश्चर्य हेच सांगितलं आहे.

    लेख नेहेमीप्रमाणे उत्तम!!

    - अथांग

    ReplyDelete
  14. Dear Writer,
    It is very really nice written and Great Thoughtfully.... It would be reflected to changed who his/her heart with mind to find good way with good path in life.

    -Anonymous.

    ReplyDelete
  15. parikshit mehendaleJuly 30, 2011 at 10:16 PM

    kharach masta...punha punha tech sangtoy...pan kay karnaar, aahech tasa ..! thanks

    ReplyDelete