Sunday, April 11, 2010

अमृत



भूक लागली की तो त्याचं अन्न मागून घेतो
हेच हवं, ते नको असे चोचले नसतात..
कारण भूक त्याच्या पोटात लागते, 'जीभेत' नाही.

झोप आली की तो झोपतो.. जागरणं करत नाही
जाग आली की तो उठतो... लोळत पडत नाही
त्यामुळे 'डोकं दुखणे'..'घशाशी येणे' असे अनुभव त्याच्या डिक्शनरीत नाहीत।

पार्क अव्हेन्यू, अॅरो, असले ब्रांडेड कपडे सोडा,
मुळात कपडे असावेत हाच त्याचा कधी आग्रह नसतो
कपडे मिले तो खुश, ना मिले तो ज्यादा खुश !

शेजाऱ्याने नवी गाडी घेतली तरी त्याला त्या शेजाऱ्याचा हेवा वाटत नाही
शेअर मार्केट मध्ये आपल्या बाबांचे पैसे बुडाले याची त्याला खंत नसते
कारण 'सोने नाणे आम्हा मृत्तिके समान' आहेत.

घरात काम करणाऱ्या बाईंकडे पाहून तो निरागस हसतो
शेजारच्या बंगल्यातले आजोबा पाहून तो निरागस हसतो
डबल निरागस नाही हसत !

काल काय घडलं याची खंत नाही
उद्या काय घडणार याची काळजी नाही
मात्र 'आत्ता' जे घडतंय ते सगळा डोळ्यात साठवायचं आहे !

माझा 'अमृत' खरं अध्यात्म जगतो !

तो रोज मला दाखवत असतो आरसा
आणि त्यात दिसत असतो..
विकारांनी आणि दोषांनी बरबटून गेलेला माझाच आत्मा.

स्वार्थापोटी का होईना, मी अमृतला रोज खेळवतो
आकाशातल्या 'त्या' बापाशी मला जोडण्यासाठी
आणि एकचं गाऱ्हाणं मागण्यासाठी की..
'सरत्या काळाप्रमाणे पुसट होत गेलेलं माझं देवत्व मलाही गवसू दे
कधी तरी........'




12 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. You are blessed with amazing writing skills :)Can I chat with you on this blog?

    ReplyDelete
  3. अप्रतिम... तुमचे सगळेच लेख वाचतेय एक एक करून... ज्या ब्लॉगच्या सुरूवातीचा लेखच इतका सुंदर आहे त्यातले पुढले लेखही आवडतील याबद्दल शंका नाही....

    तूर्तास अमृतला अनेक आशिर्वाद!!

    तन्वी

    ReplyDelete
  4. खूपच छान लिहिता तुम्ही! खूप आवडलं!

    ReplyDelete
  5. wa wa wa ....... kub..... ajun liha...... andand watla.....

    ReplyDelete
  6. तुमचा १० मार्च २०११ चा लेख एका मित्राने email केला. तो आवडला म्हणून blog पाहिला.
    इकडे पाहिल्यावर लक्षात आले कि बरेच लेख वाचण्या सारखे आहेत; म्हणून पहिल्या पासून सुरुवार करतो.
    एकंदर तुमचे लिखाण आणि तुमचे विचार अगदी भावले माझ्या मनाला.

    ReplyDelete
  7. Khupach niragas vatala,

    ReplyDelete
  8. खूप छान. ... मोठ्यांच्या लहानांकडे असलेल्या ओढ्यामागील अनादिकालापासून असलेलं रहस्यच तुम्ही शेवटच्या परिच्छेदामधे उलगडलं आहे.
    - धन्यवाद

    ReplyDelete
  9. >>डबल निरागस नाही हसत >>
    आई शपथ! अगदी नेमकं!

    ReplyDelete